जगावं तर वाघासारखं…! असं का म्हणतात?
वाघ म्हटलं की, डोळ्यांसमोर येतो तो जंगलात मुक्तपणे फिरणारा देखणा, रूबाबदार प्राणी! शक्तिशाली, चपळ, वेगवान असा अन्नसाखळीतील वाघ हा महत्त्वाचा घटक ! वाघाचा डौल आणि रुबाब पाहूनच आपण म्हणतो की, जगावं तर वाघासारखं…! वाघांची संख्या हा गेल्या काही वर्षातील चिंतेचा मुद्दा राहिला आहे. कारण वाघांची संख्या सातत्याने कमी झाल्यास त्याचे विपरित परिणाम निसर्गावर, मानवावर होतील. त्यामुळे वाघांची संख्या कमी होऊ न देणं, त्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. याबाबत जागृती होण्यासाठीच दर वर्षी २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो.
वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी
वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.वाघ हा निसर्ग साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. दुर्गादेवीचे वाहन म्हणून सन्मान मिळालेला हा रुबाबदार वाघ आपल्या देशात वाघ, व्याघ्र, टायगर, बाघ, पूली, कडुवा व हुली आदी नावांनी विविध भाषांमध्ये ओळखला जातो. जगात वाघाच्या (पँथेरा टायग्रीस) सहा उपजाती अस्तित्वात आहेत. भारतीय (बंगाल), सायबेरियन, इंडो-चायनीज, मलायन, दक्षिण चिनी व सुमात्रन या जाती सध्या अस्तित्वात आहेत तर कॅस्पियन, जावन व बालिनीज जाती नष्ट झाल्या आहेत. भारतात उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक ,गोवा आणि केरळ राज्यांमध्ये वाघ आहेत.
हे देखील वाचा: The wonderful cave of Baba Amarnath : बाबा अमरनाथ यात्रा मार्ग : अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम; यात्रा 19 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणार
जगातील 75 टक्के वाघ एकट्या भारतात
जगातील 75 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. गेल्या दशकात वाघांची संख्या दुप्पट झाली आहे. व्याघ्र संरक्षण प्रकल्पांच्या निर्मितीमुळे चांगला अधिवास उपलब्ध झाल्याने वाघांची संख्या झपाट्याने वाढते आहे. 1973 मध्ये वाघांची संख्या केवळ 268 होती. व्याघ्र योजनेला 50 वर्षे पूर्ण होणे हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. 1973 मध्ये नऊ व्याघ्र प्रकल्पांसह सुरू झालेली व्याघ्र संवर्धन योजना 53 राखीव क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. 23 व्याघ्र संरक्षित क्षेत्रांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. मध्य प्रदेशानंतर, कर्नाटक, उत्तराखंड आणि नंतर महाराष्ट्र आघाडीवर आहे.
1973 नंतर 2008 मध्ये पहिल्यांदा वाघांची गणना करण्यात आली. त्यानंतर त्याची संख्या 1401 होती. देशांत 2022 च्या गणनेनुसार तीन हजार 167 वाघ आहेत . 2018 च्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात वाघांची संख्या 2 हजार 967 होती. सर्वाधिक 526 वाघ हे मध्यप्रदेशात आहेत, कर्नाटकात 524, उत्तराखंडात 442 आणि महाराष्ट्रात 312 वाघ आहेत. दरवर्षी वाघांची संख्या सहा टक्के दराने वाढते आहे; परंतु गेल्या दोन वर्षात ही संख्या जास्त वाढली आहे.
हे देखील वाचा: Herbal Zone : गुळवेलच्या पानांचे औषधी गुणधर्म; गुळवेलच्या वापराचे 4 फायदे / benefits जाणून घ्या
2022 पर्यंत भारतात वाघांची संख्या 3,167 झाली आहे. 2018 नुसार जुलै 2019 मध्ये प्रकाशित झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतात 2,967 वाघ होते . मागील चार वर्षांत देशातील वाघांची संख्या 200 किंवा 6.7% वाढली आहे .भारतात 2006 मध्ये 1,411 वाघ, 2010 मध्ये 1,706 आणि 2014 च्या मूल्यमापन चक्रात 2,226 वाघ होते.
माहीत आहेत का वाघांचे प्रकार?
पांढरे वाघ, पांढरे काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ, फक्त काळे पट्टे असलेले तपकिरी वाघ असे वाघांचे विविध प्रकार आहेत. आतापर्यंत बाली वाघ, कॅस्पियन टायगर, जावन टायगर आणि टायगर हायब्रीड या प्रजाती बऱ्यापैकीनामशेष झाल्या आहेत.
जागतिक व्याघ्रदिन कधीपासून साजरा केला जातो?
रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे २९ जुलै २०१० रोजी भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. दरवर्षी व्याघ्र संवर्धनाबाबत जागृती करण्यासाठी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानाचे संरक्षण करण्यासाठी जागतिक यंत्रणेला चालना देणे आणि लोकांमध्ये दक्षता निर्माण करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे. शिकार आणि बेकायदा व्यापार, तसेच
अधिवास गमावल्यामुळे वाघांची संख्या सातत्याने कमी होत आहे. मानवी गरजांसाठी जंगलांची तोडणी कमी झाल्यास जंगलांचे संरक्षण होईल आणि त्यामुळे वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचेही रक्षण होईल.
महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत?
महाराष्ट्रात ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर, नावेगाव बांध राष्ट्रीय उद्यान – गोंदिया, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, पेंच नागपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान – बोरिवली, गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान या सहा ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत. पेंच हा सर्वांत प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहे. २०१२ ते २०२० या काळात महाराष्ट्रात १४१ वाघांचा मृत्यू झाला आहे.या सर्व प्रकल्पांपेक्षा ताडोबात सर्वाधिक दोनशेहून अधिक वाघ आहेत.
विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत तर व्याघ्र प्रकल्पाबाहेर जास्त वाघ आहेत. गडचिरोली येथे पूर्वी एकही वाघ नव्हता, तिथे आता वीसच्या वर वाघ आहेत. महाराष्ट्रात तीनशेहून अधिक वाघ आहेत. त्यापैकी केवळ चंद्रपूर जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक आहेत. हमखास व्याघ्र दर्शन देणारा ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगप्रसिद्ध असून पर्यटक वाघ पाहण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर येतात. उत्तम अधिवास आणि वन्यजीव क्षेत्रात संरक्षणामुळे वाघ व वन्यजीवांची संख्या वाढत आहे.
वाघ: अन्नसाखळीचा समतोल राखणारा महत्त्वाचा प्राणी
वाघ हा मांसाहारी प्राणी आहे. तो हरणासारख्या प्राण्यांना खातो. अन्नसाखळीत शाकाहारी प्राणी ‘भक्ष्य’ ठरतात, तर वाघ हा भक्षक असतो. वाघांची संख्या कमी झाली, तर अन्नसाखळीचा समतोल बिघडेल. शाकाहारी प्राणी खाद्य म्हणून वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करतील आणि त्यामुळे वनसंपदा मोठ्या प्रमाणावर नष्ट होईल. वनसंपदा नष्ट झाल्यास जंगलातील इतर प्राणी जगण्यसाठी मानवी वस्त्यांकडे धाव घेतील आणि अर्थातच वन्य प्राणी व मानव यांच्यातील संघर्ष मोठ्या प्रमाणावर वाढेल.