राहत्या घरी गळफास

सोलापूरमधील तरुण वकिल सागर मंद्रुपकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये आईकडून झालेल्या वागणुकीबद्दल भावनिक लेखन. पोलिस तपास सुरू.

सोलापूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जुळे सोलापूर शहरात एका तरुण वकिलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १२) दुपारी उघडकीस आली. सागर श्रीकांत मंद्रुपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एस.आर.पी. कॅम्पजवळ, सोलापूर) असे मृत वकिलाचे नाव आहे. घटनास्थळावर पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली असून, त्यातून कौटुंबिक तणाव आणि भावनिक त्रासाचे संकेत मिळाले आहेत.

राहत्या घरी गळफास


■ वादानंतर घडला अनर्थ

मंगळवारी (ता. ११) रात्री सागर याचा त्याच्या आईसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर सागर वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत झोपायला गेला. रात्री त्याचे आई-वडील खालच्या मजल्यावर झोपले. सकाळी नेहमीप्रमाणे वडील नोकरीवर गेले, तर आईला वाटले की मुलगा उशिरा उठेल. ती घरकाम करून विश्रांतीसाठी झोपली.

दुपारी चारच्या सुमारास सागर अजूनही खाली आला नसल्याचे पाहून आईला संशय आला. तिने भावाला बोलावले आणि दोघे मिळून वरच्या मजल्यावर गेले. दरवाजा उघडून आत पाहताच सागरने गळफास घेतल्याचे दृश्य समोर आले. तत्काळ त्याला खाली उतरवून विजापूर नाका पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने सागरला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


■ पोलिसांनाच सापडावी म्हणून ठेवली सुसाईड नोट

मृतदेह शवविच्छेदनासाठी नेल्यावर, सागरच्या टी-शर्टखालील बनियनमध्ये पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. ती जाणीवपूर्वक तिथे ठेवण्यात आली होती, जेणेकरून ती फक्त पोलिसांनाच सापडावी.

त्यात सागरने लिहिले होते की, “माझी आई मला आणि माझ्या दोन्ही मुलांना सतत वेगळी वागणूक देत होती. मुलीला मात्र वेगळी वागणूक मिळत होती. मला ती सतत अपमानास्पद वागणूक देत असे. त्यामुळे तिला कडक शिक्षा व्हावी,” असे तो म्हणतो. या चिठ्ठीचा एक भाग पेनने आणि दुसरा भाग पेन्सिलने लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.


■ कौटुंबिक तणावाचे सावट

सागर विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे की, त्याचे वैवाहिक नातेसंबंधही तणावग्रस्त होते. सततचा ताण आणि मानसिक अस्वस्थता यामुळेच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

विजापूर नाका पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत असून, सुसाईड नोटचे हस्ताक्षर तपासण्यासाठी ती फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आली आहे.

हेदेखील वाचा: crime news: सेवानिवृत्त नायब तहसीलदार 8 हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात; कालवा मोबदला प्रकरणात धक्कादायक उघड


■ समाजात खळबळ

एक जबाबदार वकिल आणि दोन मुलांचा पिता असलेला सागर मंद्रुपकर याने घेतलेला आत्महत्येचा निर्णय संपूर्ण कायदेवर्ग आणि परिसरासाठी धक्कादायक ठरला आहे. कौटुंबिक व मानसिक तणावातून उद्भवणाऱ्या अशा घटनांमुळे समाजात जागृतीची आणि भावनिक संवादाची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *