राजे रामराव महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
जत (आयर्विन टाइम्स):
“गुणवत्तेमध्ये सातत्य राखणे हे कोणत्याही शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थ सहसचिव आणि प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले. राजे रामराव महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून (नॅक) ‘अ’ दर्जा मिळाल्याबद्दल महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण कार्याचे कौतुक करताना ते बोलत होते. या प्रसंगी नॅक क्रायटेरियन प्रमुख आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डॉ. हुजरे म्हणाले, “गुणवत्ता ही शाश्वत असली पाहिजे. नॅकसाठी केलेले काम ही निव्वळ आवश्यकता नसून विद्यार्थ्यांच्या समग्र विकासासाठी गुणवत्ता महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे नॅकचे मानांकन मिळणे हा एक भाग आहे, परंतु आपली कार्यपद्धती सातत्याने गुणवत्तापूर्ण असली पाहिजे.” ते पुढे म्हणाले, “टीमवर्कच्या जोरावरच हे यश मिळू शकते. या यशामध्ये प्रत्येक व्यक्तीची भूमिका महत्त्वाची असते, विशेषतः प्रमुखांची. त्यामुळे टीमला योग्य दिशा देण्याचे काम जबाबदारीने पार पाडले पाहिजे.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि नॅकच्या कामात योगदान देणाऱ्या सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “महाविद्यालयाने नॅकच्या मानांकन प्रक्रियेत गुणवत्ता दाखवून ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे, ज्यामुळे संपूर्ण शैक्षणिक विश्वात महाविद्यालयाची प्रतिष्ठा उंचावली आहे.”
पत्रकारांची भूमिका महत्त्वाची
डॉ. हुजरे यांनी आपल्या भाषणात पत्रकारांच्या भूमिकेचेही कौतुक केले. “गुणवत्तापूर्ण कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांची भूमिका दिशादर्शकाची असते. आपण जे कार्य करतो ते समाजाला माहिती व्हावे, यासाठी पत्रकार महत्त्वाचे कार्य करतात,” असे त्यांनी नमूद केले.
सत्कार समारंभ
कार्यक्रमादरम्यान नॅक क्रायटेरियन प्रमुखांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राजे रामराव महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, उपाध्यक्ष प्रा. चंद्रसेन मानेपाटील, तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रभाकर जाधव यांचीही उपस्थिती या कार्यक्रमात होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुंडलिक चौधरी यांनी केले. यावेळी राजे रामराव महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि उपस्थित प्राध्यापक वर्गही कार्यक्रमात सहभागी झाले होते.