रस्सीखेच

रस्सीखेच खेळताना शारीरिक ताकद, सहकार्य, आणि रणनीतीची लागते कसोटी

रस्सीखेच, किंवा ‘टग ऑफ वॉर’ (Tug of War) , हा असा खेळ बहुतेक सर्वांनी लहानपणी खेळला असेल, किंवा निदान पाहिला तरी असेल. या खेळाला विशेष आकर्षण आहे कारण तो खेळण्यास साधा असला तरी त्यामध्ये शारीरिक ताकद, सहकार्य, आणि रणनीतीची कसोटी लागते. आज जरी हा खेळ खेळण्याचं प्रमाण काहीसे कमी झालं असलं तरी याच्या मागील इतिहासाला समजून घेणं खूप रंजक ठरतं.

रस्सीखेच

प्राचीन इतिहास : ख्रिस्तपूर्व काळापासूनचा खेळ

रस्सीखेचचा इतिहास पाहायला गेलं, तर तो प्राचीन ऑलिम्पिक खेळांपर्यंत पोहोचतो. ख्रिस्तपूर्व ५०० वर्षांमध्ये या खेळाचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला होता. प्राचीन काळातील खेळांमध्येही ताकदीची कसोटी पाहणारे खेळ विशेष महत्त्वाचे मानले जात. रस्सीखेच देखील त्यातीलच एक. हा खेळ फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून त्यामध्ये माणसाच्या शारीरिक क्षमता आणि संघबद्धतेची तपासणी केली जाते.

हे देखील वाचा: Congratulations! पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीने 16.32 मीटर अंतरावर गोळा फेकत मिळवले रौप्यपदक

आधुनिक ऑलिम्पिकमधील रस्सीखेच : विसरलेला खेळ

१९०० सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रस्सीखेच हा खेळ प्रथम आधुनिक ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आला. या खेळाच्या नियमांमध्ये दोन संघ असतात, ज्यात प्रत्येकी आठ खेळाडू असतात. दोन्ही संघ एका मोठ्या दोरीच्या दोन टोकांना पकडून विरोधी संघाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात. साधारणपणे, दोरी ३३.५ ते ३६ मीटर लांब असते, आणि तिचा व्यास १० ते १२.५ सेंटीमीटर असतो. संघातील सर्वांत ताकदवान खेळाडू, जो ‘अँकर’ म्हणून ओळखला जातो, तो शेवटी असतो आणि तो शरीराभोवती दोरी गुंडाळून खेळात अधिक सामर्थ्याने भाग घेतो.

रस्सीखेच

 

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णक्षण

रस्सीखेचचा सुवर्णक्षण म्हणजे १९०० सालातील ऑलिम्पिक, जिथे स्वीडन आणि डेन्मार्कच्या संयुक्त संघाने पहिलं सुवर्णपदक पटकावलं. विशेष म्हणजे, फ्रान्सच्या संघात कॉन्स्टेन्टिन हेन्रिकेझ दी झुबिरा नावाचा कृष्णवर्णीय खेळाडू होता, जो ऑलिम्पिक पदक मिळवणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला. यानंतरच्या काळात, १९२० सालापर्यंत रस्सीखेच ऑलिम्पिकचा भाग होता. ब्रिटनने १९०८ आणि १९२० या दोन्ही ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.

हे देखील वाचा: स्वीमिंग: आरोग्य, तंदुरुस्ती राहते आणि चांगले करिअरही करता येते; छाती व पाठीचे स्नायू होतात मजबूत; हाता-पायांचाही होतो व्यायाम

ऑलिम्पिकमधून वगळणे आणि नवीन वाटचाल

१९२० नंतर, ऑलिम्पिकमधील काही खेळांना वगळण्यात आलं, आणि त्यामध्ये रस्सीखेचचाही समावेश होता. परंतु, या खेळाचं महत्त्व कमी झालं नाही. विविध देशांनी त्यांच्या राष्ट्रीय संघटना स्थापन केल्या आणि रस्सीखेचच्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या. १९६० मध्ये ‘टग ऑफ वॉर इंटरनॅशनल फेडरेशन’ ची स्थापना झाली आणि जागतिक स्तरावर या खेळाच्या स्पर्धा पुन्हा जोरात सुरु झाल्या. आज या महासंघाचे जगभरात ५० हून अधिक सदस्य देश आहेत.

रस्सीखेच

भारतात रस्सीखेचचा प्रसार

भारतामध्ये रस्सीखेच महासंघाची स्थापना १९५८ साली झाली, पण याला खरी गती ८०च्या दशकात मिळाली. या खेळाच्या नियमांना आणि स्पर्धा स्वरूपाला भारतीय खेळाडूंनी आत्मसात केले आणि जागतिक स्तरावर भारतीय संघांनी देखील चांगली कामगिरी केली आहे.

वर्ल्ड गेम्समधील सहभाग

जरी Tug of War आता ऑलिम्पिकमध्ये नसला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वर्ल्ड गेम्स’ मध्ये याला स्थान मिळालं आहे. हे खेळ दर चार वर्षांनी आयोजित केले जातात आणि ऑलिम्पिकच्या बाहेरील खेळांची त्यात स्पर्धा होते.

हे देखील वाचा: आधुनिकतेच्या जमान्यात कबड्डीच्या नियमात झालेले बदल माहीत आहेत का? चढाई ३० सेकंदाची… एका दमात ‘कबड्डी कबड्डी’ म्हटले नाही तरी चालते …

Tug of War हा केवळ खेळ नसून शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी आहे. अनेक वर्षांपासून विविध देशांमध्ये खेळला जाणारा हा खेळ अजूनही जगभरात लोकप्रिय आहे, आणि त्याचा इतिहास हा खेळाच्या वैभवाचे प्रतीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !