शेती ही भारताची आत्मा आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. पन्नास टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. पण दुर्दैवाने, हीच आत्मा आता मरणासन्न अवस्थेत दिसते आहे. हे चित्र अधिक काळ टिकून राहिलं, तर आपली अन्नसुरक्षा, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक समतोल मोठ्या संकटात सापडू शकतो.युवक शेती आणि अन्न उत्पादन क्षेत्रात सक्रिय व्हायला हवेत.
या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेचा एक अहवाल आशेचा किरण दाखवतो. ‘कृषी-अन्न प्रणालींमध्ये युवकांची स्थिती’ या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर युवक शेती आणि अन्न उत्पादन क्षेत्रात सक्रिय झाले, तर जागतिक अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेचे स्वरूपच बदलू शकते. शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा मार्ग नसून, जागतिक पातळीवर विकासाचा प्रमुख स्तंभ ठरू शकतो.
पण दुर्दैवाने, भारतात परिस्थिती उलटी आहे. युवक शेतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. कारणं स्पष्ट आहेत — वाढती गुंतवणूक, मिळणारा कमी नफा, हवामानावर अवलंबित्व, अनिश्चित उत्पन्न आणि त्यात भर म्हणून सामाजिक प्रतिष्ठेची कमतरता.
शेतीकडे पाठ का फिरवली जाते आहे?
तंत्रज्ञानाच्या युगात वाढलेल्या पिढीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मातीशी खेळत राहणं आणि अनिश्चित पिकावर अवलंबून राहणं मनास पटत नाही. शिक्षण घेणाऱ्या तरुणांची स्वप्नं आता मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची असतात. कॉर्पोरेट, बँका, सरकारी क्षेत्र हे करिअरचे केंद्र बनले आहेत. याला दुय्यम कारण म्हणजे गावांतील सुविधा — चांगले शाळा, आरोग्य केंद्र, इंटरनेट, वीज, पाणी यांचा अभाव.
खरं तर ही परिस्थिती आपणच तयार केली आहे. आपण शेतीला सन्मानित व्यवसाय मानला नाही, शेतकऱ्याच्या कष्टाला बाजारात योग्य किंमत दिली नाही, त्याला विम्याचा सुरक्षित कवच दिलं नाही आणि शेवटी शेतातच उद्योजकता उभी करायची संधीही दिली नाही. मग युवकांनी शेती सोडली तर त्यांना दोष द्यायचा का?
शेतीमध्ये नवसंजीवनी कशी आणता येईल?
या प्रश्नाचं उत्तर — शेतीच आपले भविष्य आहे, पण तिला भविष्याच्या योग्यतेनं सजवणं आवश्यक आहे. यासाठी शेती फायदेशीर आणि सन्मानजनक व्हावी लागेल. २००४ मध्ये एम.एस. स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रीय शेतकरी आयोगाने स्पष्ट शिफारसी दिल्या होत्या — जमिनीचे पुनर्रचना, सिंचन सुलभता, पीकविमा, किमान हमीभाव, साठवणूक व्यवस्था, रोजगार धोरण, अन्नसुरक्षा. पण दुर्दैवाने या शिफारशी राजकीय इच्छाशक्तीअभावी राबवल्या गेल्या नाहीत.
आज गरज आहे ती — शेतीला उद्योगाच्या दृष्टिकोनातून पाहण्याची. “अॅग्री बिझनेस”, अन्न प्रक्रिया, सेंद्रिय शेती, कृषी पर्यटन, स्थानिक ब्रँड तयार करणे, डिजिटल मार्केटिंग यांसारख्या संधी ग्रामीण युवकांसमोर खुल्या आहेत. पण या संधी गावात निर्माण कराव्या लागतील, शहरात नाही. कारण शहरात संधी असतील तर गाव रिकामं होणारच.
तंत्रज्ञान — युवकांना शेतीकडे वळवण्याचा प्रभावी मार्ग
आजचं तरुण मन स्मार्ट आहे. त्याला फक्त काम नको, तर कामात स्मार्टनेस हवा. या दृष्टिकोनातून शेतीत ड्रोन, सोलर पंप, सेन्सर, स्मार्ट सिंचन तंत्रज्ञान, GIS प्रणाली, अचूक हवामान अंदाज यांचा वापर करून युवकांना आकर्षित करता येऊ शकतं. काही तरुणांनी यामध्ये नवे प्रयोगही सुरू केले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि कर्नाटकमधील काही यशस्वी मॉडेल्सनी हे दाखवून दिलं आहे की — शेतीत टेक्नॉलॉजी आली, की फायदा आणि आदर दोन्ही मिळतो.
तसंच, कौशल्य विकास हाही एक महत्वाचा घटक आहे. जर प्रत्येक जिल्ह्यात कृषि आधारित प्रशिक्षण संस्था आणि ग्रामीण नवउद्यमांसाठी हब तयार करण्यात आले, तर स्थानिक पातळीवर अनेक व्यवसायांची निर्मिती होऊ शकते — ज्यात युवकांचा थेट सहभाग असेल.
धोरणात्मक बदलांची गरज
सरकारने कृषी शिक्षणाला खूप प्रोत्साहन दिलं आहे. हजारो विद्यार्थी कृषी पदवी घेतात, पण नोकरी मिळवण्यासाठी शहरात जातात. कारण शेतीचा व्यवसाय यांना भविष्यदृष्टीनं आशादायक वाटत नाही. म्हणूनच आता धोरणात स्पष्ट बदल हवा — शेतकऱ्याला हमीभाव मिळावा, अन्न प्रक्रिया उद्योगांना मदत मिळावी, स्थानिक पातळीवर मार्केटिंग साखळी तयार करावी, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे *शेती म्हणजे बेरोजगारांचा पर्याय* ही मानसिकता पूर्णपणे मोडून काढावी.
सामाजिक मानसिकतेत बदल हाच खरा ‘विकास’
युवकांना शेतीकडे वळवण्याची प्रक्रिया केवळ सरकारी योजना पुरेशी ठरणार नाही. गावगाड्यात बदल घडवण्यासाठी सामाजिक दृष्टीकोन बदलावा लागेल. आपल्या घरातील मुलाने शेतात काम करावं, हे अनेक पालकांनाही मान्य नसतं. ही मानसिकता बदलण्यासाठी, यशस्वी शेतकऱ्यांची उदाहरणं, त्यांची कहाणी, उत्पन्नाच्या नव्या वाटा, त्यांचे जीवनशैलीतील बदल — हे समाजासमोर मांडले गेले पाहिजे.
शेवटी, जर खऱ्या अर्थाने ‘विकसित भारत’ घडवायचा असेल, तर ‘विकसित खेडे’ घडवावं लागेल. आणि त्याचा पाया आहे — शेती. शेती ही नुसती व्यवसायाची वाटच नाही, ती आपल्या संस्कृतीची, पर्यावरणाची आणि अन्नसुरक्षेची खरी मुळं आहे. युवकांच्या नव्या ऊर्जेचा संयोग आणि शेतीचा अनुभव मिळून भारताला एक नवा कृषी युग दाखवता येऊ शकतो. गरज आहे ती — धोरणात्मक बदल, तंत्रज्ञानाचा समावेश, सामाजिक सन्मान आणि शेतीसाठी तयार मानसिकतेची. शेती नसेल, तर खाणं नसेल. आणि खाणं नसेल, तर कुठलाही विकास अर्थहीन ठरेल.