यशस्वी होण्यासाठी आयुष्यात काही मूलभूत तत्त्वे पाळणे आवश्यक
प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात प्रतिभेचा एक सुंदर राजहंस दडलेला असतो, जो योग्य वेळी, योग्य संधी मिळाल्यावर आपले अस्तित्व सिद्ध करू शकतो. मात्र, त्या राजहंसाचा शोध घेतल्याशिवाय आणि आपल्या आयुष्याला योग्य दिशा दिल्याशिवाय तो प्रतिभेचा झरा उघड होणार नाही. यशस्वी होण्यासाठी आयुष्यात काही मूलभूत तत्त्वे पाळणे आवश्यक असते, जी आपल्याला केवळ वैयक्तिक उन्नतीच नव्हे, तर समाजाच्या प्रगतीसाठीही उपयुक्त ठरतात.
आज आपण यशस्वी होण्यासाठीच्या ‘नऊ मंत्रांवर’ सविस्तर चर्चा करूया, जी आपल्या जीवनाला सकारात्मक वळण देऊ शकतात.
१) उच्च ध्येय निश्चित करा
जगण्याला उद्देश मिळण्यासाठी ध्येयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. साधी ध्येये ठेवून मोठे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. आपले ध्येय उच्च दर्जाचे असले पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करताना तुम्ही तुमच्या सर्व क्षमतांचा वापर करावा. जसे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय केवळ शिक्षण घेणे नव्हते, तर समाजाला न्याय मिळवून देणे होते. मोठे ध्येय निवडा, कारण त्यातून तुमच्यातील सर्वोत्कृष्टता बाहेर पडते.
२) दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा
ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर इच्छाशक्तीची गरज आहे. आयुष्यात अडचणी येणारच, पण त्यांना तोंड देण्याची ताकद इच्छाशक्तीतून मिळते. इच्छा शक्ती नसली तर सर्व साधनं असूनही आपण अपयशी ठरतो. म्हणून, जिद्द आणि चिकाटी ठेवा. ‘न हारण्याची वृत्ती’ हीच तुम्हाला यशस्वी बनवते.
३) कठोर परिश्रम करा
कठोर परिश्रमाशिवाय कोणतेही ध्येय साध्य होत नाही. आजच्या जगात यशस्वी झालेले सर्व जण कठोर परिश्रमाचे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या जीवनात मेहनतीची महती दिसून येते. कोणतीही संधी मिळाल्यावर ती साधण्यासाठी जिवाचे रान करण्याची तयारी ठेवा. यश कठोर मेहनतीला कधीच फसवत नाही.
४) वेळेचे योग्य नियोजन
वेळ हीच सर्वांत मौल्यवान संपत्ती आहे. वेळेचे योग्य नियोजन न करता यशाची वाटचाल शक्य नाही. तुमचा प्रत्येक क्षण मोजकाच असतो, त्यामुळे त्याचा जपून वापर करा. वेळेचे नियोजन केल्याने तुमच्यावरचा ताण कमी होतो आणि प्रत्येक कामात सातत्य राहते. वेळेचे नियोजन करणाऱ्यांसाठी यश दार उघडून उभे असते.
५) शॉर्टकट कधीच नको
शॉर्टकट हा यशाचा शत्रू आहे. शॉर्टकट घेतल्यास यश तात्पुरते मिळते, पण त्याला टिकवणे कठीण असते. दीर्घकालीन यशासाठी कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणा आवश्यक आहे. शॉर्टकट हा यशाच्या प्रक्रियेचा अपमान आहे, त्यामुळे त्याचा मोह टाळा.
६) जे उदात्त व चांगले असेल, त्याचा स्वीकार करा
चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याची वृत्ती तुम्हाला यशस्वी बनवते. प्रत्येक व्यक्तीत काहीतरी चांगले असते, त्यातून शिकण्याची तयारी ठेवा. चांगल्या सवयी, विचार आणि कृती अंगीकारल्यास तुमची वैयक्तिक व व्यावसायिक प्रगती निश्चित होते. नेहमी उदात्त विचारांसाठी मन खुले ठेवा.
७) आई-वडिलांचे महत्त्व ओळखा
आई-वडील हे आपल्या जीवनाचे पहिले मार्गदर्शक असतात. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढतात. त्यांच्या त्यागाचे मूल्य जाणून त्यांच्या सल्ल्याचा आदर करा. त्यांचे प्रेम आणि शिकवण तुम्हाला खंबीर आणि जबाबदार व्यक्ती बनवते.
८) सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवा
सामाजिक जाणीव असणे म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रगल्भ होणे. समाजाचे ऋण फेडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांसारख्या व्यक्तींनी केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. समाजाचे भले करण्याची वृत्ती ही यशस्वी माणसांची खूण असते.
९) मानसिकता बदला
‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ हा निष्क्रिय विचार बदलला पाहिजे. जीवनात पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमची मानसिकता सकारात्मक ठेवावी लागेल. परिस्थितीशी लढण्याची तयारी ठेवा आणि नव्या संधींचा लाभ घ्या. तुमच्या मर्यादा वाढवण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे.
यश हा एक प्रवास आहे, अंतिम गंतव्यस्थान नाही. उच्च ध्येय, प्रामाणिक परिश्रम, आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार होऊ शकता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन हे या नऊ मंत्रांचे उत्तम उदाहरण आहे. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला विचारांची क्रांती घडवावी लागते. जीवनात या नऊ सूत्रांचा अवलंब केल्यास यश तुमच्यापासून दूर राहणार नाही. -मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि.सांगली