घरी कोणी नसल्याचे पाहून केला होता अत्याचार
आयर्विन टाइम्स / नागपूर
नागपूरमधील पारडी परिसरात आई-वडील कामावर गेले असताना नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथकांनी एकत्रितपणे तपास करत असताना, त्याने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीचे सीट कव्हर बदलल्याचे उघड झाले आहे.
गणपत नानाजी जयपूरकर (वय ५६, रा.पारडी) याने रविवारी (ता. १५) दुपारी पीडित मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला, असे समोर आले आहे. सायंकाळी आई-वडील घरी परतल्यावर घटना उघड झाली आणि त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. आरोपीचा शोध घेण्यासाठी त्याचे रेखाचित्र देखील जारी करण्यात आले होते.
आरोपीचा कसा लागला शोध?
पीडित मुलगी घाबरलेली असल्याने तिला आरोपीविषयी माहिती देणे कठीण झाले होते, ज्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, आणि गुन्हेशाखेचे उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथकांनी तीन दिवस तपास केला. २३ ठिकाणचे सुमारे १५० सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिस आरोपीच्या घराजवळ पोहोचले.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आरोपीची गाडी लाल रंगाची आहे. ही माहिती मिळताच गणपतने गाडीचे लाल सीट कव्हर बदलले. मात्र, परिसरात त्याचे रेखाचित्र दाखवल्यानंतर एका व्यक्तीने तो भवानीनगर परिसरात राहतो असे सांगितले, ज्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली.
पंडित शोधण्याच्या कारणाने बाहेर पडला होता
त्या दिवशी गणपती जयपूरकर पंडित शोधण्यासाठी घरातून बाहेर पडला होता, कारण त्याच्या घरी गणपती पूजेची तयारी होती. मात्र, पीडितेच्या घरासमोरून जात असताना तिथे कोणी नसल्याचे पाहून त्याने अत्याचार केला, असे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच, त्याच्या पत्नीशी नेहमी भांडण होत असल्याने त्याने असे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.