मुख्यमंत्री लाडकी बहीणच्या अनेक अर्जांमध्ये पती-पत्नीचे जोडीचे फोटो अपलोड
आयर्विन टाइम्स / सोलापूर
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला १५०० हजार रुपये मिळणार म्हटल्यावर राज्यात अर्ज करण्यासाठी सर्वत्र गर्दी उसळली. राज्यात आतापर्यंत दीड ते दोन कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. राखी पौर्णिमेला म्हणजेच १९ ऑगस्टला योजनेचा लाभ देण्याच्या तयारीने जोरदार कामकाज सुरू झाले आहे. अर्जाची छाननी करताना अनेक त्रुटी समोर येत आहेत. मंगळवेढ्यातील एका अर्जदाराने स्वत:चा फोटो म्हणून घरातील बेडचा तर मतदान ओळखपत्र म्हणून रेडिओचा फोटो अपलोड केल्याचे अर्ज पडताळणीवेळी समोर आले आहे.
राखीपौर्णिमेला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली
सोलापूर जिल्ह्यातील चार लाख महिलांसह राज्यातील दोन कोटी महिलांना १९ ऑगस्टला प्रत्येकी तीन हजार रूपये वितरीत केले जाणार आहेत. अर्ज जरी दोन-सव्वादोन कोटी अपलोड झाले असले, तरी अर्जातील त्रुटी पूतर्तेसाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानुसार राखीपौर्णिमेला म्हणजेच १९ ऑगस्टला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्याच्या दृष्टीने अर्जांची पडताळणी व अंतिम यादी तयार करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू आहे. सरकारी कर्मचारी यासाठी काम करत आहेत.
बँक खात्याशी आधारलिंक नसलेल्यांना पहिल्या टप्प्यात लाभ नाही
तालुकास्तरीय समित्यांच्या पडताळणीत ३० ते ३५ टक्के अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या असून अपात्र अर्जांची संख्या फार मोठी नसल्याची स्थिती आहे. स्वत: हून अर्ज भरलेल्यांच्या मोबाईलवर नेमकी त्रुटी काय, याची माहिती देण्यात आली आहे. पण, ज्यांनी महा ई सेवा केंद्र, अंगणवाड्यांमध्ये अर्ज भरले आहेत, त्या सर्वांनाच एकाचवेळी त्रुटींची माहिती देता आलेली नाही. त्यामुळे अशा लाभार्थींसह बँक खात्याशी आधारलिंक नसलेल्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार नाही. जिल्हास्तरावरून अंतिम यादी शासनाला सादर केली जाणार आहे. दरम्यान, अर्ज पडताळणीवेळी अनेक अर्जांमध्ये गमतीशीर बाबी आढळल्या असून ते साहजिकच असे अर्ज बाद करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा: Sangli News : सांगलीत जुनी पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; जिल्ह्यातील 45 कर्मचारी संघटनांचा पाठिंबा
त्रुटी आढळलेले अर्ज बाद करण्यात आले आहेत
मंगळवेढ्याचे तहसीलदार मदन जाधव यांनी सांगितले कि, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी करून पात्र महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समितीने जिल्ह्याच्या समितीला पाठविले आहेत. त्रुटी असलेल्या अर्जदारांना पूर्तता करण्यासंबंधीच्या सूचना केल्या आहेत. एका अर्जदाराने स्वत: च्या फोटोच्या ठिकाणी घरातील बेडचा तर मतदान ओळखपत्र म्हणून रेडिओचा फोटो अपलोड केला होता. तो अर्ज अपात्र ठरविला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठीच्या ३० ते ३५ टक्के अर्जांमध्ये आढळल्या त्रुटी
तालुकास्तरीय समित्यांच्या पडताळणीत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. जवळपास ३० ते ३५ टक्के अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या असल्याचे सांगण्यात आले. काहींनी आधार कार्डाची मागील बाजू अपलोड केली नाही. काहींचे अपलोड केलेली कागदपत्रे स्पष्ट दिसत नाहीत, हमीपत्रावर स्वाक्षरी नाही किंवा हमीपत्र भरलेच नाही. तसेच १२ वर्षांपूर्वीचे जुने रेशनकार्ड जोडले नाही, नवीनच रेशनकार्डच अपलोड केल्याचे आढळून येत आहे. गंमतीदार बाब म्हणजे पत्नीच्या नावे अर्ज भरताना अनेक पतींनी स्वतःचीच माहिती भरली असल्याचे आढळून आले आहे. पतीने पत्नीसोबत काढलेला जोडीचा फोटो अपलोड केला आहे , घरातील बेड, रेडिओ, टिव्हीचेही फोटो अपलोड केले आहेत.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून जास्त असतानाही अनेकांनीअर्ज केला आहे
संजय गांधी निराधार योजनेतील महिलांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर निराधार योजनेतूनही प्रतिमहा १५०० रूपयेच मिळतात. त्या महिलांना दोन्हीपैकी एकाच योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र, त्यांनी पूर्वीचा लाभ मिळत असतानाही आता लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. दुसरीकडे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून जास्त असतानाही अनेकांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्या सर्वच अर्जांची पुन्हा एकदा काटेकोर पडताळणी होणार असून त्यात अपात्र ठरणाऱ्या लाभार्थीना वितरीत झालेली सर्व रक्कम वसूल केली जाणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.