मुख्यमंत्री

लाडकी बहीण योजनेप्रमाणं मुख्यमंत्री लाडक्या भावांसाठी देखील योजना

आयर्विन टाइम्स / पंढरपूर
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारला या निर्णयानंतर लाडक्या भावांचे काय, असा प्रश्न विचारला जात होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडक्या भावांसाठी देखील योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांसाठी ज्या योजनेची माहिती सांगितली ती नेमकी कशाची होती? बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, पदविका उत्तीर्ण असणाऱ्यांना ८ हजार आणि पदवी उत्तीर्ण असणाऱ्यांना १० देणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. ही माहिती लाडका भाऊ योजनेची होती का? याबाबतची माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती पंढरपूर येथील सांगितली.

कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, आपण लाडकी बहीण योजना आणली तेव्हा काही लोकांनी आपल्यावर टीका केली. ते म्हणाले, लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय ? मला त्यांना सांगायचं आहे की लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठीही योजना आणली आहे. जो तरुण बारावी उत्तीर्ण झाला आहे त्याला दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये आणि पदवीधर तरुणाला १० हजार रुपये महिन्याला दिले जातील.

हे देखील वाचा: Sangli Crime : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जून 2024 अखेर सांगली जिल्ह्यातील गुन्ह्यात घट / A reduction in crime

हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅन पावर तयार करत आहोत. राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, या योजनेंतर्गत आपल्या राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपले सरकार पैसे भरणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, या योजनेद्वारे बेरोजगारीवर आपण उपाय शोधून काढला आहे. या योजनेंतर्गत आपले तरुण कारखान्यात अप्रेन्टिसशिप करतील आणि त्यांना सरकार स्टायपेंड देईल.

मुख्यमंत्री

राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाला साकडे

चांगला पाऊस होऊ दे, चांगल पीक येऊ दे. त्याच्या जीवनात समृद्धी होई दे, हे मागणं विठुरायाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितले. या राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे, असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून बागलाण तालुक्यातील अंबासन येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांना महापूजेचा मान मिळाला.

ते मागील १६ वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपुरात पंधरा लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली. बुधवारी सगळीकडे भक्तिमय वातावरण झालं होतं. यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचा कारभार सुरू आहे.

हे देखील वाचा: senior citizens / मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना : 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत / free यात्रा ; जाणून घ्या काय आहे योजना

या राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पीक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे, शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, असं मागणं विठ्ठलाला मागितल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. हा माझ्या आयुष्यातील भाग्याचा दिवस आहे. कारण सलग तिसऱ्या वर्षी मला श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचे भाग्य लाभल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आपण सर्वजण वारकऱ्यांची भगवी पताका फडकत ठेवत आहात, त्याबद्दल आपले सर्वाचं आभार असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री

नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला महापूजेचा मान

आषाढी एकदशीनिमित्त शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील अहिरे दाम्पत्याला मिळाला. बाळू शंकर अहिरे (वय ५५) आणि आशाबाई बाळू अहिरे (वय ५०) हे दाम्पत्य यंदा मानाचे वारकरी ठरले. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन (ता. सटाणा) या गावातील रहिवासी आहेत. या दाम्पत्याचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. गेल्या १६ वर्षांपासून दोघेही नियमित आषाढीची वारी करीत आहेत.

आज पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाल्यानंतर अहिरे दाम्पत्याला गहिवरून आले होते. आम्ही दरवर्षी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गाडीवर येतो. दर्शन घेतल्यानंतर निघून जातो. यंदाही देवाचे दर्शन घ्यायचं आणि घरी निघून जायचं, असं आम्ही ठरवलं होतं. पण आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विठुरायाची शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला.

आम्ही या गोष्टीचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. गेल्या १६ वर्षांपासून आम्ही पंढरपूरची वारी करीत आहोत.. विठुरायाच्या महापुजेचा मान मिळाल्याने आमचे जीवन सार्थक झाले आहे, अशी प्रतिक्रिया बाळू अहिरे आणि आशाबाई अहिरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed