मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना: राज्यातील सर्व धर्मीयांमधील देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी शासनाने सुरू केली योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक खास योजना आणली आहे. विशेष म्हणजे ही मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राज्यातील सर्व धर्मीयांमधील देशासह राज्यातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शासनाने सुरू केली आहे. यामध्ये साठ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना या यात्रेचा मोफत लाभ घेता येणार आहे. त्यासाठी देशभरातील ७३, तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना काही अटीवर परवानगी दिली जाणार आहे.
यासाठी समाज कल्याण विभागाकडून ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून या योजनेवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आता शासनाच्या वतीने त्यांच्या आवडीनुसार मोफत तीर्थ दर्शन करता येणार आहे.
काय आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना?
ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याच्या उतार वयात तीर्थ स्थळी जाण्याची इच्छा असते. पुण्यकर्म म्हणून ही त्यांची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने अशा व्यक्तींना तीर्थस्थळी जाता येत नाही, तसेच सोबत कोण नसल्यानेही ही इच्छा पूर्ण करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राला मोफत भेट देण्याची व दर्शन घेण्याची संधी मिळावी, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
कशी आहे खर्चाची तरतूद जाणून घ्या
या योजनेत एका तीर्थस्थळाला जाण्यासाठी पाच व्यक्तींना एकाच वेळी लाभ घेता येणार आहे. प्रवासाची कमाल मर्यादी प्रतिव्यक्ती ३० हजार रुपये असेल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन आणि निवास व इतर बाबींचा समावेश असेल.
हे देखील वाचा: Sangli Crime : मिरजेतील गुन्हेगार बारगीर 1 वर्षासाठी स्थानबद्ध
या योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे?
देशातील मोठ्या तीर्थ यात्रांना जाऊन मन:शांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुखकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. कोणीही ६० वर्षांवरील व्यक्तीचा यामध्ये सहभागी होऊ शकते. राज्यातील रहिवासी असावा, तसेच लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
जाणून घ्या यासाठी अर्ज कसा करावा?
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल, तसेच सेतू केंद्रातूनही करता येईल. लाभार्थ्याचे आधार कार्ड, रेशन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र आवश्यक, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाइकांचा मोबाईल नंबर. सदर योजनेअंतर्गत तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय.आर. सी. टी. सी. (IRCTC ) समकक्ष अधिकृत असलेल्या अधिकृत कंपन्यांची निवड करण्यात येणार आहे.
निवड कशी होते जाणून घ्या
जिल्ह्यासाठी निश्चित केला असून, त्यानुसार जिल्हास्तरीय समिती यात्रेकरू लाभार्थीची निवड करणार आहे. त्यांची यादी बनवून लॉटरी पद्धतीने यात्रेसाठी निवड केली जाईल. जादा असलेल्या संख्येनुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयात, तसेच समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या फलकावर लावली जाईल. यादी अंतिम करण्याचे काम समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडूनच होईल.
यात्रेचे नियोजन कसे असेल?
निवड केलेल्यांची यादी अधिकृत टुरिस्ट कंपनी किंवा एजन्सीला दिली जाईल. त्यानुसार प्रवाशांच्या संख्येनुसार यात्रेच्या ठिकाणी जाण्याचे नियोजन करेल. प्रवाशांना आवश्यक सुविधा शासन करणार आहे. यात्रेकरूंनी नियोजित स्थळी स्वखर्चाने जावे लागेल.
सोबत कोणाला कोणाला घेऊन जाता येईल
प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कोटा निश्चित करण्यात येऊन प्राप्त झालेल्या अर्जांच्या उपलब्धतेनुसार लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड करण्यात येणार आहे. 75 वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. ज्या ज्येष्ठ नागरिकांना सोबत सहायक किंवा जीवनसाथी सोबत घेऊन जायचे असेल, तरीही परवानगी मिळणार आहे; पण त्यासाठी आरोग्य व इतर निकषास पात्र ठरणे आवश्यक आहे.
या तीर्थक्षेत्रांचा समावेश
देशातील ७३, तर राज्यातील ६६ तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा, माता वैष्णवी यात्रा, अमरनाथ यात्रा इतर धर्मीयांची ही मोठी तीर्थक्षेत्रे आहेत. वैष्णोदेवी, अमरनाथ गुहा, अक्षरधाम, बद्रीनाथ, काशी विश्वेश्वर, कामाख्या देवी, तिरुपती बालाजी, कैलासनाथ मंदिर कांचीपुरम आदींसह सिद्धिविनायक ते चिंतामणी कळंबपर्यंतच्या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
देशातील किंवा महाराष्ट्रातील अशा तीर्थक्षेत्रांना आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते, पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते, परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे, तसेच कोणी सोबत नसल्यामुळे आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.