माडग्याळी मेंढी

माडग्याळी मेंढी: मेंढीपालकांना आर्थिक स्थैर्य, जीवनमान उंचावण्यास मदत

सांगली जिल्ह्यातील जत तालुका कायमच दुष्काळाशी सामना करत असतो. विशेषतः जतच्या पूर्व भागातील माडग्याळ आणि परिसरातील गावे दुष्काळी परिस्थितीला जिद्दीने सामोरे जाताना दिसतआहेत. या खडतर भौगोलिक स्थितीतही येथील रहिवाशांनी आपला जीवनमान सुधारण्याचा मार्ग शोधला आहे, तो म्हणजे ‘मेंढीपालन’. सहा-सात दशकांपासून सुरू असलेल्या या व्यवसायामुळे आज माडग्याळी मेंढीपालकांना आर्थिक स्थैर्य लाभले आहे.

माडग्याळी मेंढी

माडग्याळी मेंढीची महत्त्वपूर्ण भूमिका

माडग्याळ गावातील ‘माडग्याळी मेंढी’ ही एक विशेष ओळख बनली आहे. काटक आणि प्रतिकूल हवामानात टिकण्याची क्षमता असलेली ही मेंढी जत तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात मदत करते. माडग्याळसारख्या दुष्काळी भागात माळरानांवर उगवणारे खुरटे गवत ही मेंढ्यांसाठी पोषणक्षम खाद्य ठरते. या मेंढ्या खडतर हवामानातही चांगली वाढू शकतात. माडग्याळ गावात सध्या ८८३ मेंढ्या असून, त्याच्या विक्रीमधून शेतकरी मोठा आर्थिक लाभ घेत आहेत.

हे देखील वाचा: Carrot Farming: बक्षीहिप्परगे: गाजर शेतीचे आगार; सोलापूरपासून केवळ 6 किलोमीटर अंतरावर असलेले गाव

आर्थिक प्रगतीचा मार्ग

माडग्याळ आणि परिसरातील अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी मेंढीपालन हा प्रमुख आधार ठरला आहे. रायाप्पा बंडगर आणि विठ्ठल बंडगर यांच्या म्हणण्यानुसार, एक-एक खंडी म्हणजे २० मेंढ्यांची संख्या असते. या मेंढ्यांमधून दरवर्षी दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांनी या उत्पन्नातून केवळ कुटुंबाचा उदरनिर्वाह केला नाही, तर शेतीतही गुंतवणूक केली. ‘विहीर, बोअरवेल’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतीला पाणी दिले, आणि काहींनी ऊस, डाळिंब, द्राक्षासारख्या नगदी पिकांची लागवड केली आहे.

माडग्याळी मेंढी

‘माडग्याळी मेंढी’चा वाढता व्यापार

१९९१-९२ मध्ये पांडुरंग निकम यांनी माडग्याळी मेंढी दिल्लीतील स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर, ‘माडग्याळी मेंढी’ या नावाने राज्यभर ओळख निर्माण झाली. त्यानंतर माडग्याळी मेंढ्यांची मागणी वाढत गेली. या मेंढ्यांची विक्री फक्त सांगली जिल्ह्यापुरती मर्यादित नसून, मुंबई, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटकसारख्या विविध राज्यांतून या मेंढ्यांना मागणी असते. या बाजारातून मेंढीपालकांना चांगले दर मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा झाली आहे.

हे देखील वाचा: exportable pomegranates: गुणवत्तापूर्ण आणि निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी काय करावं लागेल, जाणून घ्या ‘या’ 7 टिप्स

मेंढीपालनामुळे जीवनमान सुधारणा

मेंढीपालनातून उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती साधली आहे. श्रीशैल भाऊ हुवाळे (व्हसपेट ) यांनी सांगितले की, मेंढ्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून त्यांनी सहा एकर शेती घेतली, विहीर खोदली आणि डाळिंबाची बाग लावली आहे. यामुळे पूर्वी केवळ खरिपावर अवलंबून असणारी शेती आता बारमाही पिके देत आहे.

माडग्याळी मेंढी

माडग्याळचा महत्त्वाचा बाजार

माडग्याळ येथे दर शुक्रवारी होणारा जनावरांचा व मेंढ्यांचा बाजार गेली साठहून अधिक वर्षे चालू आहे. या बाजारात मुंबई, गोवा, कर्नाटक, तेलंगणा अशा विविध राज्यांतून व्यापारी येऊन माडग्याळी मेंढ्या विकत घेतात. या मेंढ्यांचे मांस चवीला उत्तम असते, त्यामुळे या मेंढ्यांना बाजारात चांगला दर मिळतो. एक मेंढी ८,५०० ते ६०,००० रुपयांपर्यंत विकली जाते.

हे देखील वाचा: Red Banana/ लाल केळी: सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील उच्चशिक्षित युवकाचा यशस्वी प्रयोग; चार एकरांत लाल केळीतून कमावले 35 लाख

माडग्याळी मेंढीची वैशिष्ट्ये:
– काटक आणि प्रतिकूल हवामानात टिकण्याची क्षमता.
– पांढऱ्या रंगावर तपकिरी रंगाचे भाग.
– फुगीर नाक, लांब पाय आणि निमुळती मान.
– जुळ्या कोकरांना जन्म देण्याची क्षमता.

मेंढीपालनामुळे माडग्याळसारख्या दुष्काळी भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सशक्त होत असून, शेतीमध्येही प्रगती साधत आहेत. ‘माडग्याळी मेंढी’ ही त्यांच्यासाठी नवजीवनाचा आधार ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !