महाराष्ट्रात मुख्य पदाची सूत्रे प्रथमच महिलेकडे
आयर्विन टाइम्स / मुंबई
congratulations! महाराष्ट्र राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्य सचिव होण्याचा मान १९८७ च्या तुकडीच्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुजाता सौनिक यांना मिळाला आहे. राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. अत्यंत कडक शिस्तीसाठी आणि नियम व चौकटीतच काम करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सौनिक या राज्याच्या ४५ व्या मुख्य सचिव ठरल्या आहेत. रविवारी सायंकाळी त्यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.
डॉ. करीर यांचा कार्यकाळ रविवारी (३० जून ) संपला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करीर यांना निवृत्तीनंतरही तीन महिन्यांचा वाढीव कार्यकाळ देण्यात आला होता. करीर यांच्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार सुजाता सौनिक यांचेच नाव सर्वांत आधी होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या १०० दिवस आधी अशा ‘कडक’ मुख्य सचिवाला खुर्चीवर बसवून महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ नंतर मोठे पाऊल उचलले असल्याची चर्चा आहे.
सुजाता सौनिक यांच्याकडे सध्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी होती. सौनिक यांना मुख्य सचिव करून हे सरकार महिलांचा सन्मान करत असल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकारी वर्गात बोलले जात आहे. सौनिक यांना मुख्य सचिवपदाने यापूर्वी दोनवेळा हुलकावणी दिली आहे.
कोण आहेत या सुजाता सौनिक?
सुजाता सौनिक या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत. त्या जून २०२५ मध्ये निवृत्त होत आहेत. निवृत्त आयएएस अधिकारी मनोज सौनिक यांच्या त्या पत्नी आहेत. ते देखील राज्याचे मुख्य सचिव होते. त्यामुळे, पती आणि पत्नी यांनी हे पद भूषविण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. सौनिक यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंडीगडमध्ये झाले आहे. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, सरकारच्या सल्लागार आणि सहसचिव अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
राज्याच्या सचिवपदासाठी कोण कोण होते दावेदार
नितीन करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले होते. सेवाज्येष्ठतेनुसार (१९८७ च्या तुकडीतील) गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र सौनिक यांना संधी मिळाली आहे.
नवनियुक्त मुख्य सचिव सुजाता सैनिक प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल्या कि, महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. उद्योग आणि अन्य व्यापाराच्या दृष्टीने या राज्यातून वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून चांगल्या प्रमाणावर महसूल जमा होत असतो. त्याचबरोबर उत्पन्नाच्या बाबतीत अग्रेसर असलेले राज्य आहे. राज्यातील नवनवीन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणे हे माझ्या दृष्टीने मोठे काम असणार आहे. राज्य सरकारने माझी या कामासाठी केलेली निवड सार्थ ठरविण्यासाठी सर्व जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
जनरल उपेंद्र द्विवेदी भारत देशाचे नवे लष्करप्रमुख
देशाचे लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी रविवारी मावळते लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून कार्यभार स्वीकारला. लष्करप्रमुख पदाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी जनरल द्विवेदी हे लष्कराच्या उपप्रमुख पदावर कार्यरत होते. २०२२ पासून त्यांच्याकडे लष्कराच्या उत्तर विभागाची जबाबदारी होती. जनरल द्विवेदी हे देशाचे ३० वे लष्कर प्रमुख ठरले आहेत.
१९८४ मध्ये जम्मू-काश्मीर रायफल्समध्ये सर्वप्रथम द्विवेदी यांची नियुक्ती झाली होती. नॉदर्न कमांडमध्ये कमांडर म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. लष्करात सध्या आमूलाग्र बदल सुरू असून त्याच्या आधुनिकीकरणाचे ही काम सुरू आहे. अशावेळी जनरल द्विवेदी यांनी लष्करप्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतला आहे. चाळीस वर्षांच्या कार्यकाळात द्विवेदी यांनी जम्मू-काश्मीर रायफल्स बटालियन, २६ सेक्टर आसाम रायफल्स ब्रिगेड, नाईन कोअर अशा विभागात काम केले आहे. सैनिक शाळा रिवा, नॅशनल डिफेन्स कॉलेज आणि यूएस आर्मी वॉर कॉलेजमधून द्विवेदी यांनी शिक्षण पूर्ण केले होते.
नॉदर्न कमांडचे कमांडर म्हणून काम करीत असताना जनरल द्विवेदी यांनी दहशतवादाविरोधातील अनेक मोहिमांचे नेतृत्व केले आहे. चीन आणि पाकिस्तानपासून असलेल्या धोक्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. जनरल द्विवेदी यांच्यासह सैनिकी शिक्षण पूर्ण केलेल्या अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी मागील दोन महिन्यांपूर्वीच नौदलाच्या प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
या दोघांचे सैनिकी शिक्षण रिवा येथे झाले आहे. दरम्यान, लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सुब्रमणी यांचे शिक्षण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला तसेच भारतीय सैनिक अकादमी डेहराडून येथे झाले आहे. १९८५ मध्ये ते गढवाल रायफल्समध्ये सहभागी झाले होते.
चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी ‘एसबीआय’चे अध्यक्ष होणार
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाला (एसबीआय) लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे. सरकारी नियुक्ती निवड समिती फायनान्शियल सर्व्हिसेस
इन्स्टिट्यूशन ब्युरोने नुकतीच एसबीआयच्या अध्यक्षपदासाठी बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी यांच्या नावाची शिफारस केली. सेट्टी यांची जानेवारी २०२० मध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड झाली होती. सध्या त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय बँकिंग, ग्लोबल मार्केट्स व टेक्नॉलॉजी विभागांचा कार्यभार
आहे.