मकर संक्रांती हा केवळ सण नसून संतुलित जीवनशैली, आरोग्यदायी आहार, सूर्यप्रकाश आणि मानसिक प्रसन्नतेचा संदेश देणारा उत्सव आहे. जाणून घ्या संक्रांतीमागील शास्त्रीय व आरोग्यदायी महत्त्व.
मकर संक्रांती हा सण केवळ धार्मिक, सांस्कृतिक किंवा पारंपरिक चौकटीत अडकलेला नाही. तो मानवी जीवनाला स्पर्श करणारा, समाजाला जोडणारा आणि आरोग्याचे मोल पटवून देणारा व्यापक उत्सव आहे. आपुलकी, सलोखा, परस्पर संवाद आणि मदतीच्या भावना जपणारा हा सण आजच्या तुटत चाललेल्या नातेसंबंधांच्या आणि विश्वासाच्या वातावरणात अधिकच महत्त्वाचा ठरतो. विशेष म्हणजे, मकर संक्रांती आपल्याला निरोगी जीवन जगण्याचा, शरीर-मन सुदृढ ठेवण्याचा संदेशही देते.
गेल्या काही वर्षांत आपण अनुभवले आहे की मजबूत रोगप्रतिकारक शक्ती किती आवश्यक आहे. संतुलित जीवनशैली, योग्य आहार आणि निसर्गाशी सुसंवाद यांचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीशी निगडित परंपरा, श्रद्धा आणि आचार-विचार हे केवळ सांस्कृतिक वारसा नसून आरोग्यदायी जीवनाचा पाया ठरतात.
संतुलित दिनचर्येचा संदेश
मकर संक्रांती आपल्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा सण आहे. हिवाळ्याच्या कडाक्यानंतर कोवळ्या, ऊबदार उन्हाची चाहूल लागते आणि निसर्ग जणू नव्याने जागा होतो. सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, दिवस मोठे होऊ लागतात आणि वसंत ऋतूचे आगमन होते. हा काळ म्हणजे थकलेल्या शरीर-मनाला पुन्हा ऊर्जेने भरून काढण्याची संधी असते. निसर्गाच्या बदलांसोबत आपली दिनचर्याही बदलावी, शिस्तबद्ध आणि संतुलित जीवन जगावे, असा संदेश हा सण देतो. आज वैज्ञानिक संशोधन आणि वैद्यकीय तज्ज्ञही सांगतात की नियमित दिनक्रम, योग्य आहार, पुरेशी विश्रांती आणि सकारात्मक मानसिकता यांमुळेच शरीर व मन दोन्ही निरोगी राहतात. मकर संक्रांती हेच जीवनतत्त्व सहज आणि आनंदी पद्धतीने शिकवते.

सूर्यप्रकाश : आरोग्याचा नैसर्गिक स्रोत
मकर संक्रांतीच्या सणात पतंग उडवण्याची आनंददायी परंपरा आहे. ही परंपरा केवळ करमणुकीपुरती मर्यादित नाही, तर तिचा थेट संबंध आरोग्याशी आहे. आजच्या धकाधकीच्या आणि बंदिस्त जीवनशैलीत सूर्यप्रकाशाचा अभाव अनेक आजारांना आमंत्रण देतो. संक्रांतीच्या दिवशी मोकळ्या आकाशाखाली गच्चीवर जाऊन पतंग उडवताना शरीर थेट सूर्यकिरणांच्या संपर्कात येते. त्यामुळे शरीराला ‘व्हिटॅमिन डी’ मिळते, रोगजंतूंचा नाश होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे झोप चांगली लागते, थकवा कमी होतो आणि शरीरात नवचैतन्य निर्माण होते. हा नैसर्गिक प्रकाश केवळ शरीरालाच नव्हे, तर संपूर्ण जीवनालाच उजाळा देतो.
मानसिक आरोग्याची उजळणी
हिवाळ्याचा काळ अनेकदा आळस, उदासीनता आणि मानसिक थकवा घेऊन येतो. मकर संक्रांतीसोबत ऋतुबदल घडतो आणि प्रसन्न उन्हाची उब मनाला समाधान देऊन जाते. त्यामुळे हा सण मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरतो. हा सण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. सूर्योपासनेच्या माध्यमातून “देणे” ही मूल्ये आपल्याला शिकवली जातात. सूर्य कोणताही भेदभाव न करता सर्वांना प्रकाश, ऊर्जा आणि उष्णता देतो. उत्तरायणात सूर्य असल्याने आध्यात्मिकदृष्ट्याही नवऊर्जा मिळते, असे मानले जाते. सूर्यकिरणांच्या संपर्कामुळे सेरोटोनिन आणि एंडॉर्फिनसारख्या आनंददायी हार्मोन्सचे स्राव वाढतात. त्यामुळे मन प्रसन्न राहते, सकारात्मकता वाढते आणि नैराश्य दूर होते. संक्रांतीचा सण म्हणजे मनाला नवी उमेद देणारा प्रकाशोत्सवच आहे.

सणासुदीचा आहार : आरोग्याचा खजिना
मकर संक्रांतीला देशभरात तीळ, शेंगदाणे, गूळ, तांदूळ आणि उडीद डाळ यांसारख्या पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. यामध्ये तिळांना विशेष महत्त्व आहे. तीळ उष्ण, पौष्टिक आणि शरीराला बळकटी देणारे असतात. गूळ शरीरातील उष्णता संतुलित ठेवतो, शेंगदाणे ऊर्जा देतात, तर डाळी व तांदूळ पोषणमूल्यांनी समृद्ध असतात. हे पदार्थ केवळ चविष्टच नाहीत, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारेही आहेत. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण हा आरोग्यदायी जीवनशैलीचा आदर्श ठरतो. यामागे आध्यात्मिक परंपरेसोबतच ठोस वैज्ञानिक आधारही आहे.
परंपरेतून आरोग्याकडे
मकर संक्रांती हा सण आपल्याला सांगतो की आपली परंपरा केवळ रूढी नाही, तर शास्त्रशुद्ध आणि जीवनोपयोगी आहे. आजच्या तणावग्रस्त, धावपळीच्या जीवनात सामाजिक ऐक्य, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक तंदुरुस्ती यांची नितांत गरज आहे. अशा वेळी मकर संक्रांतीसारखा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो, माणसामाणसांत सलोखा वाढवतो आणि आरोग्य जपण्याची जाणीव करून देतो. म्हणूनच मकर संक्रांती हा केवळ सण नसून, उज्वल, निरोगी आणि आनंदी जीवनाचा मंत्र आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत

