खून झालेल्या अमीर व आरोपी सुशांतची बहिण यांचा सहा महिन्यापूर्वी झाला होता प्रेमविवाह
आयर्विन टाइम्स / पुणे
बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याचा राग मनात धरून, भावाने दाजीचा डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर डिझेलने मृतदेह जाळला. पुरावा नष्ट करण्यासाठी हाडे व राख पोत्यात भरून नदीत टाकून दिले. ही धक्कादायक घटना मोशीतील आदर्शनगर येथे घडली. याप्रकरणी विवाहितेचा सख्खा भाऊ, मेहुण्यासह तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून, एक चुलत भाऊ फरार आहे.
अमीर महम्मद शेख (वय २५, रा. आदर्शनगर, मोशी, मूळ- राधे, ता. पारनेर, जि. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर त्याचा साडू पंकज विश्वनाथ पाईकराव ( वय २८, रा. मार्तंडनगर, चाकण, मूळ भिंगे आडगाव, जि. हिंगोली), सख्खा मेहुणा सुशांत गोपाळा गायकवाड (वय २२, रा. राधे, ता. पारनेर, जि. नगर) आणि सुनील किसन चक्रनारायण ( वय ३३, रा. मोई रोड, चिंबळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चुलत मेहुणा गणेश दिनेश गायकवाड (रा. राधे, ता. पारनेर जि. नगर) हा फरार आहे.
मृत अमीर व आरोपी सुशांतची बहिण यांचा सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघेही मोशी येथे राहत होते. मात्र, हा विवाह अमीरच्या सासरच्या लोकांच्या मनाविरुद्ध झाला होता. अमीर हा १५ जूनला कंपनीत कामाला जातो, असे सांगून गेला. तो परत घरी न आल्याने अरीना अमीर शेख हिने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्य बेपत्ता झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. यात अमीरला त्याचा साडू पंकज याने फोन करून बोलावून घेतल्याचे समोर आले.
त्यानुसार, पोलिसांनी पंकजला २१ जूनला अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. आरोपींनी आमीरला दारू पिण्याच्या बहाण्याने फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर मेदनकरवाडी हद्दीतील जंगलात ते दारू पित बसले. त्यावेळी सुशांत व गणेश यांनी आमीरला जंगलात ओढत नेले आणि डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
सासरच्या छळास कंटाळून अभियंता विवाहितेची आत्महत्या
पंढरपूर, (प्रतिनिधी):
चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून एका बी. टेक. इंजिनिअर नवविवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी (ता. ८) दुपारी वाखरी (ता. पंढरपूर) येथे घडली. सायली सागर पोरे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात मृत सायलीची आई स्वप्नाली सुनील पवार (रा. मेथवडे, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सासू साळूबाई रामेश्वर पोरे, पती सागर रामेश्वर पोरे (रा. वाखरी), नणंद धनश्री श्रीकांत नागणे व श्रीकांत नागणे (रा. तुंगत) यांच्या विरोधात पंढरपूर तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहानंतर अवघ्या सात महिन्यांमध्ये सायलीने आपले जीवन संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे देखील वाचा: Shocking! शाळा तपासणीसाठी आलेल्या शिक्षण विस्ताराधिकाऱ्याला 2 शिक्षकांची शाळेत कोंडून मारहाण; गटविकास अधिकाऱ्यांनी केले निलंबित
सायली हिचा ३० डिसेंबर २०२३ रोजी वाखरी येथील सागर पोरे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासू साळूबाई पोरे, पती सागर पोरे व इतर घरातील लोकांनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, असा सतत तगादा लावला होता. दिलेले लग्नात संसारोपयोगी साहित्य चांगले नाहीत, असे म्हणू
सतत तिचा सासरी छळ केला जात होता. विवाहानंतर सायली ही पहिल्यांदा १३ जानेवारी रोजी आपल्या माहेरी आली होती.
त्यावेळी तिने आपल्या आई-वडिलांना सासरकडून होणाऱ्या त्रासाबद्दलची माहिती दिली होती. मला माझी सासू, पती व नणंद यांच्याकडून चारचाकी गाडी घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे तुम्ही पाच लाख रुपये माझ्या सासरच्या मंडळींना द्या, असे तिने सांगितले होते. त्यानंतर सायलीच्या आई- वडिलांनी पती सागर पोरे यांच्या नातेवाइकांकडे मध्यस्थी करून काही दिवसांनी गाडी घेण्यासाठी पैसे देतो, असे सांगितले होते.
परंतु त्यानंतरही तिचा सासरच्या लोकांकडून शारीरिक व मानसिक छळ झाल्याने अखेर सायली पोरे या नवविवाहितेने आपल्या वाखरी येथील राहत्या घरी छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चार जणांविरोधात पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. पोलिस तपास करीत आहेत.
पत्नी गैरहजर; पतीला एकतर्फी घटस्फोट मंजूर
पुणे, (प्रतिनिधी):
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात केलेल्या दाव्यात पत्नीला समन्स बजावूनही ती बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे न्यायाधीश वि. के. ठाकूर यांनी पतीला एकतर्फी घटस्फोट मंजूर केला. विजया आणि विजय (नावे बदललेली) यांचा १ मार्च २०१६ ला विवाह झाला. लग्नानंतर विजया दोन महिने चांगल्या नांदल्या. मात्र, त्यानंतर तिने विजय यांना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
सकाळी उशिरा उठणे, घरातील कामे व स्वयंपाक न करणे, मोठमोठ्याने ओरडून बोलणे, विनाकारण सासरच्यांन त्रास देणे असे प्रकार त्या करू लागल्या. शिवाय विजय यांच्याकडे वेगळे घर घेण्यासाठी व आई-वडिलांपासून विभक्त राहून संसार करण्याचा तगादा लावला. त्यानुसार विजय यांनी वेगळे घर घेतले. पत्नीच्या सततच्या त्रासातून विजय यांना मानसिक आजार सुरू झाला.
हे देखील वाचा: Good news! मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा अध्यादेश जारी; शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कमध्ये 100 टक्के लाभ
विजय यांनी अॅड. शुभांगी जेठीथोर यांच्यामार्फत घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. त्या दाव्यात न्यायालयाने समन्स बजावले व न्यायालयात हजर राहून म्हणणे मांडण्याची संधी विजया यांना दिली. मात्र त्या न्यायालयात हजर झाल्या नाहीत.