सारांश: बस्तवडे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मिरजकर या मुलीच्या साखरपुड्यासाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शाळेला दांडी मारून गेल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. दीपाली भोसले व दीपक माळी हे शिक्षकही गैरहजर असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शाळा व्यवस्थापन समितीने जबाबदारी पार न पाडल्याने त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली. या कारवाईमुळे तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठी खळबळ उडाली आहे.
तासगाव,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिस्तभंगाच्या प्रकारावर कठोर कारवाई करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तृप्ती धोडमिसे यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या मिरजकर यांना निलंबित केले आहे. शाळेच्या शिक्षकांसह गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि शाळा व्यवस्थापन समितीवरही कारवाईचा बडगा उगारत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या कठोर निर्णयामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेत खळबळ उडाली आहे.
घटनेचा तपशील
बस्तवडे येथील जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी वर्गापर्यंत शिक्षण दिले जाते. येथे ६५ विद्यार्थी शिक्षण घेतात. विद्या मिरजकर या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होत्या, तर दीपाली भोसले व दीपक माळी हे शिक्षक अध्यापनाचे काम पाहत होते.
शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात शाळा भरण्याचा वेळ सकाळी ७:२० होती. मात्र सकाळी १० वाजेपर्यंत कोणताही शिक्षक हजर नव्हता. याबाबत माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी शाळेत भेट दिली. त्यावेळी मुख्याध्यापिका विद्या मिरजकर आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी कोल्हापूरला गेल्याचे स्पष्ट झाले. दीपाली भोसले याही कोल्हापूरला गेल्याची माहिती मिळाली. तर दीपक माळी तासगावमधून कोल्हापूरला जायच्या तयारीत होते. शाळेतील एका झिरो तासाच्या शिक्षिकेने शाळेचे कुलूप उघडले होते.
गटशिक्षणाधिकाऱ्यांची पाहणी, अहवाल आणि कारवाई
शाळेतील शिक्षणाच्या स्थितीची खातरजमा करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांनी शाळेला भेट दिली. यावेळी शाळा रामभरोसे सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मुख्याध्यापिका विद्या मिरजकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सलग तीन दिवस शाळेला दांडी मारल्याचे समोर आले. भोसले व माळी हे दोन्ही शिक्षकही अनुपस्थित असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते.
लावंड यांनी संपूर्ण प्रकाराचा अहवाल जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड यांच्याकडे पाठवला. गायकवाड यांनी अहवालाची छाननी करून तो सीईओ तृप्ती धोडमिसे यांच्याकडे पाठवला. या अहवालाच्या आधारे धोडमिसे यांनी मुख्याध्यापिका विद्या मिरजकर यांना निलंबित करण्याचा आदेश दिला.
शाळा व्यवस्थापन व शिक्षण प्रशासनावरही कारवाई
मुख्याध्यापिका आणि शिक्षकांच्या गैरहजेरीसाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. शाळेतील शिक्षणावर नियंत्रण ठेवण्यात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अपयशी ठरल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ
या कारवाईमुळे तालुक्यातील शिक्षक व शिक्षण प्रशासनात खळबळ उडाली आहे. सरकारी शाळांमधील शिस्तपालन आणि शिक्षकांच्या अनुपस्थितीवर कठोर उपाययोजना करण्याचा इशारा या घटनेतून मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शिक्षण प्रशासनातील गाफील राहिलेल्या अधिकाऱ्यांवर भविष्यातही कारवाई होण्याची शक्यता आहे.