महासागर हे पृथ्वीवरील जीवनाचे प्राणवायू आहेत. ते केवळ जलचरांचे आश्रयस्थान नाहीत, तर हवामान नियंत्रक, अन्नसाखळीचे पोषणकर्ते आणि अब्जावधी लोकांचे उपजीविकेचे आधार आहेत. तरीदेखील आज या निळ्या संपत्तीसमोर एक अभूतपूर्व संकट उभे ठाकले आहे. शास्त्रज्ञ गेल्या अनेक दशकांपासून जगाला सतत सावध करत आहेत की समुद्राच्या परिसंस्थेत मोठे बदल घडत आहेत. पण माणसाच्या स्वार्थी प्रवृत्ती, अल्पदृष्टी, बेफिकिरी, प्लास्टिक आणि निसर्गाविषयीच्या दुर्लक्षामुळे समुद्री जीवनाचा श्वास गुदमरू लागला आहे.
समुद्रावर वाढता मानवी दबाव
आज जगातील तीन अब्जांहून अधिक लोक आपली रोजीरोटी समुद्री जीवांवर अवलंबून ठेवतात. मासेमारी, पर्यटन, औद्योगिक उपक्रम, वाहतूक आणि उर्जेचे उत्पादन यासाठी महासागरांचा व्यापक वापर केला जातो. परंतु या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी जेवढ्या गांभीर्याने प्रयत्न व्हायला हवेत, तेवढे होत नाहीत.
बेकायदेशीर मासेमारी, अंधाधुंद शिकार, समुद्रात फेकला जाणारा प्लास्टिक कचरा आणि वाढता हवामान बदल हे घटक एकत्र येऊन समुद्री जैवविविधतेला धोक्याच्या दारात ढकलत आहेत. आजची स्थिती अशी आहे की एकीकडे नफा मिळविण्यासाठी समुद्री जीवांचा अमर्याद शिकार सुरू आहे, तर दुसरीकडे समुद्रातील प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. हवामान बदलाने तर या समस्येला अधिकच तीव्र बनवले आहे.
पॅरिस करार आणि वाढते तापमान
२०१५ च्या पॅरिस हवामान करारात जागतिक सरासरी तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. मात्र वास्तविकता वेगळी आहे. भूमध्यसागराचे तापमान वाढण्याचा वेग जागतिक सरासरीपेक्षा २० टक्के अधिक आहे. याचा थेट परिणाम समुद्री परिसंस्थांवर होत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते आहे, उष्णतेमुळे माशांचे स्थलांतर वाढते आहे आणि प्रवाळभित्ती हळूहळू नष्ट होत आहेत.
आज साठ टक्क्यांहून अधिक समुद्री परिसंस्था ऱ्हासाच्या विळख्यात आल्या आहेत. संशोधनानुसार, २०४० पर्यंत महासागरातील प्लास्टिक प्रदूषण सध्याच्या पातळीपेक्षा जवळपास दुप्पट होईल. दरवर्षी २.३ कोटी ते ३.७ कोटी टन प्लास्टिक कचरा महासागरात मिसळत आहे. ही मात्रा भयावह आहे.
मायक्रोप्लास्टिकचे संकट
फक्त मोठे प्लास्टिक नव्हे, तर मायक्रोप्लास्टिकही आज एक गंभीर समस्या बनली आहे. हे सूक्ष्मकण केवळ समुद्री जीवांच्या शरीरातच नाहीत, तर आता आपल्या अन्नसाखळीतदेखील प्रवेशले आहेत. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होऊ लागले आहेत.
या पार्श्वभूमीवर टोकियो विद्यापीठातील रिकेन सेंटर फॉर इमर्जेंट मॅटर येथील संशोधकांनी एक आशादायक पाऊल उचलले आहे. त्यांनी असा एक पदार्थ विकसित केला आहे, जो मिठाच्या संपर्कात येताच सहज विघटित होतो आणि मागे कोणताही कचरा न सोडता जीवाणूंच्या सहाय्याने नष्ट होतो. हा पदार्थ प्लास्टिकइतकाच मजबूत आहे, परंतु त्याच्या वापरामुळे हानिकारक मायक्रोप्लास्टिक तयार होत नाही. जरी हा शोध अद्याप व्यापारी स्वरूपात आला नसला, तरी भविष्यात पर्यावरण वाचवण्यासाठी तो एक क्रांतिकारी टप्पा ठरू शकतो.
हेदेखील वाचा: Nature’s warning/ निसर्गाचा इशारा : विकास आणि पर्यावरणातील संतुलनाची हाक
प्रवाळभित्तींचा ऱ्हास आणि समुद्री तापमानवाढ
एप्रिल २०२५ मध्ये समुद्रसपाटीवरील तापमान इतिहासातील दुसऱ्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. कॅरिबियन, हिंदी महासागर आणि प्रशांत महासागरातील प्रवाळभित्ती चिंताजनक वेगाने नष्ट होऊ लागल्या. या भित्ती शुभ्र होत आहेत, ज्याला कोरल ब्लीचिंग असे म्हटले जाते. प्रवाळभित्ती समुद्री परिसंस्थेचे कणा आहेत कारण त्या सुमारे २५ टक्के प्रजातींना आश्रय व पोषण देतात. त्यांच्या नाशामुळे केवळ माशांचा साठाच कमी होत नाही, तर पर्यटन व मत्स्यव्यवसायालाही मोठा फटका बसतो.
मच्छीमार व पर्यटन व्यवसायाचा दुष्परिणाम
आजवर समुद्रावर अवलंबून असलेले मच्छीमार समाज आणि पर्यटन क्षेत्र महासागरांच्या रक्षणाऐवजी त्यांच्या ऱ्हासाला हातभार लावत आहेत. अतिप्रमाणात मासेमारीमुळे माशांचा साठा वेगाने कमी होत आहे. जागतिक व्यापार संघटनेलाही यावर अंकुश ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी अनुदान (सब्सिडी) थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला.
तरीदेखील आज परिस्थिती सुधारली नाही. कारण समुद्राचे रक्षण केवळ कागदी धोरणांनी होणार नाही. त्यासाठी प्रत्यक्ष आणि प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे.
महासागरांचे आरोग्य व आर्थिक संकट
महासागर हे जागतिक जनजीवनाला पोषण देणारे केंद्र आहेत. ते हवामान आपत्तींपासून आपले संरक्षण करतात, कार्बन शोषून घेतात आणि पाण्याचे चक्र नियंत्रित करतात. परंतु त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेली राजकीय इच्छाशक्ती आणि आर्थिक साधने उपलब्ध नाहीत.
एका अंदाजानुसार, महासागरांचे रक्षण आणि समुद्री परिसंस्थेचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी किमान १७५ अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. पण सध्या केवळ १० अब्ज डॉलर्स या कामासाठी खर्च केले जातात. यामुळे अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत. दरवर्षी जवळपास १.२ कोटी मेट्रिक टन प्लास्टिक महासागरात मिसळते.
१९७० मध्ये जागतिक माशांचा साठा सुरक्षित जैविक स्तराच्या ९० टक्के होता. पण २०२१ मध्ये तो घटून केवळ ६२ टक्क्यांवर आला आहे. हे आकडे आपल्याला महासागराच्या आरोग्याची खरी कहाणी सांगतात.
आंतरराष्ट्रीय परिषदा आणि अपूर्ण वचने
२०१७ मध्ये पहिली महासागर परिषद झाली तेव्हा अनेक देशांनी हजारो संकल्प व्यक्त केले. पण प्रत्यक्ष परिणाम अत्यल्प ठरले. २०२२ मध्ये जैवविविधता संवर्धन करारात २०३० पर्यंत किमान ३० टक्के समुद्री आणि भौमितिक परिसंस्थांचे संरक्षण करण्याचे लक्ष्य ठरवले गेले. पण या दिशेने ठोस पावले उचलली जात नाहीत.
११ जून २०२५ रोजी फ्रान्समध्ये झालेल्या तिसऱ्या महासागर परिषदेत मांडलेला आकडा अत्यंत धोकादायक होता. जगातील एकूण मासे साठ्यापैकी ३५ टक्के भाग ज्या पद्धतीने पकडला जात आहे, त्या योग्य नाहीत. यामुळे समुद्रांमधील माशांची संख्या झपाट्याने घटत आहे. २,५७० समुद्री मासे साठ्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले की एकतृतीयांशहून अधिक माशांचा अतिरेकाने शिकार होत आहे.
पुढील दिशा – काय करायला हवे?
१. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर बंदी – पुनर्चक्रणासाठी तांत्रिक प्रगती घडवून आणली पाहिजे.
2\. शाश्वत मासेमारी पद्धतींचा अवलंब – अतिरेक टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारांचे काटेकोर पालन होणे आवश्यक.
3\. प्रवाळभित्तींचे संवर्धन – समुद्री संरक्षित क्षेत्रांची संख्या वाढवून या परिसंस्थांचा बचाव करणे गरजेचे आहे.
4\. हवामान बदलाविरुद्ध लढा – पॅरिस करारातील १.५ अंश सेल्सिअसचे लक्ष्य गाठण्यासाठी सर्व देशांनी तातडीने पावले उचलली पाहिजेत.
5\. आर्थिक गुंतवणूक वाढवणे – महासागर संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे.
समुद्र हे केवळ पाण्याचा अथांग साठा नाहीत, तर ते जीवनाचे स्रोत आहेत. जर आज आपण महासागर वाचविण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, तर उद्या जगातील अन्नसाखळी, रोजगार आणि हवामान स्थैर्य यावर गंभीर परिणाम होणार आहेत.
महासागरांचे भविष्य म्हणजेच मानवजातीचे भविष्य. या निळ्या हृदयाचा ठोका मंदावू नये, म्हणून आता तरी आपण जागे होणे आवश्यक आहे.