या खुनाच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांचा सहभाग
आयर्विन टाइम्स / नाशिक
पोलिस पुत्र असलेल्या प्रियकराचा जाच वाढल्याने शिक्षिका असलेल्या प्रेयसीने सुपारी देऊन चार संशयित आणि दोन विधिसंघर्षित मुलांच्या मदतीने प्रियकराचा निर्घृण खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. युनिट एकच्या पथकाने अवघ्या पाच तासांत या गुन्ह्यातील संशयितांसह शिक्षिकेला अटक केली. नाशिकमधील पंचवटीतील मेरी वसाहतीत मंगळवारी मध्यरात्री खुनाची घटना घडली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गगन प्रवीण कोकाटे (२५) या सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याची (दि. २१) सकाळी पोलिसांना माहिती मिळाली. यावरून पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने संयुक्तिक तपास सुरू केला. यावेळी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना या खून प्रकरणातील संशयित हे अशोकनगर, सातपूर, नाशिक भागात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने अशोकनगर, श्रमिकनगर, सातपूर भागात संशयित संकेत शशिकांत रणदिवे (२०, रा. रोहाउस नं. ३, राधाकृष्णनगर, बोलकर व्हॅली, अशोकनगर), मेहफूज रशीद सैयद (१८, रा. पाण्याच्या टाकीसमोर, बोलकर अशोकनगर, व्हॅली, सातपूर), रितेश दिलीप सपकाळे (२०, अशोकनगर), गौतम
सुनील दुसाने (१८, रा. शहीद सर्कल गंगापूर वाइनच्या मागे, गंगापूर रोड, नाशिक) या संशयितांना सापळा रचून अटक केली.
पोलिसांनी त्यांच्याकडे गगनच्या खुनाबाबत चौकशी केली असता त्यांना भावना सुशांत कदम (रा. वृंदावननगर, म्हसरूळ, नाशिक) या शिक्षिकेने गगनला ठार मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी भावना हिला देखील ताब्यात घेतले आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त गुन्हे संदीप मिटके, सहायक आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली या खून प्रकरणात गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली.
या खून प्रकरणाचा कट उघडकीस आणण्यात निरीक्षक मधुकर कड, पोलिस निरीक्षक ज्योती आमने, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, उपनिरीक्षक गजानन इंगळे, श्रेणी उपनिरीक्षक रवींद्र बागूल, अंमलदार प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रशांत मरकड, देविदास ठाकरे, महेश साळुंके, प्रदिप म्हसदे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, रमेश कोळी, राजेश लोखंडे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, विलास चारोस्कर, नितीन जगताप, आप्पा पानवळ, मुक्तार शेख, राम बर्डे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, समाधान पवार, अनुजा येलवे, किरण शिरसाठ, सुकाम पवार तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, अंमलदार कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, सागर कुलकणी, रोहिणी भोईर यांनी सहभाग घेतला.
त्रासाला कंटाळून सुपारी देऊन केला खून
भावना कदम ही वैशंपायन विद्यालयात रात्रपाळी शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिचा पती एक मुलगा अन् एक मुलगी असा सुखाचा संसार असताना देखील २०२० पासून तिचे गगन कोकाटे याच्याशी अनैतिक संबंध होते. गगन याने भावना हिला त्र्यंबकेश्वर येथील एका मंदिरात कुंकू देखील लावले होते.. परंतु काही दिवसांनी गगन हा तिला जास्तच त्रास द्यायला लागला होता. त्यामुळे तिने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याचा काटा काढायचा असे ठरवून त्याच्या हत्येची सुपारी दिली.
खून करण्यासाठी असा शिजला कट
संशयित भावना कदम हिचा प्रियकर मयत गगन कोकाटे याचा जाच वाढल्याने कार्यरत असलेल्या रात्रपाळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यास हकीगत सांगत गगन याचा काटा काढण्यासाठी गळ घातली, मात्र त्यांनी साफ नकार दिला. परंतु त्याच्या माध्यमातून सातपूर येथील संशयित संकेत रणदिवे याच्याशी संपर्क झाला अन् त्याने इतर साथीदारांसमवेत गगन कोकाटे याच्या खुनाचा कट रचला.