श्री क्षेत्र कुंडेश्वर

पुणे (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) –
खेड तालुक्यातील पाईट गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. श्रावणी सोमवारच्या निमित्ताने श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असलेल्या महिलांची पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला असून २१ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

पाईट गावात दुर्दैवी अपघात

अपघात कसा घडला?

११ ऑगस्टच्या सकाळी पाईट गावातील ३०-३५ महिला, पिकअप (एमएच १४/जीडी ७२९९) वाहनातून श्री क्षेत्र कुंडेश्वर दर्शनासाठी निघाल्या होत्या. गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. हा मार्ग अत्यंत रहदारीचा असून भाविकांची नेहमीच येथे वर्दळ असते.

अपघात होताच रस्त्याने जाणाऱ्या भाविकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून खासगी वाहनांतून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात महिलांचा मृत्यू उपचारापूर्वीच झाला, तर एका महिलेचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मृत महिलांची नावे

शोभा जनेश्वर पापळ, सुमन काळुराम पापळ, शारदा रामदास चोरघे, शकुंतला तानाजी चोरघे, मंदा कानिफ दरेकर, संजीवनी कैलास दरेकर, मीराबाई संभाजी चोरघे, बायडाबाई दरेकर.

हेदेखील वाचा: स्वातंत्र्याची खरी किंमत / The true value of freedom– नव्या पिढीला सांगण्याची वेळ; स्वातंत्र्य — एक वारसा, एक जबाबदारी आणि एक जाणीव

जखमींची नावे

चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर, मंदा चांगदेव पापळ, लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, कविता सारंग चोरघे, सिद्दीकी रामदास चोरघे, छबाबाई निवृत्ती पापळ, मनीषा दरेकर, जनाबाई करंडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, लता करडे, निशांत लोंढे, ऋषिकेश करंडे इत्यादी.

पाईट गावात दुर्दैवी अपघात

उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार म्हणाले,

“पाईट येथील अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. प्राण गमावलेल्या माता-भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना मनःपूर्वक सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार या कठीण प्रसंगात पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

उपमुख्यमंत्री पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत व बचावकार्य गतीमान करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *