हा धक्कादायक प्रकार राजस्थानामधील नहरसिंगपुरा गावात घडला
आयर्विन टाइम्स / नागौर (राजस्थान)
माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना राजस्थानातील नागौर जिल्ह्यात घडली आहे. नागौरच्या पांचौडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पतीने पत्नीला बाईकच्या मागे बांधून संपूर्ण गावात फरफटत नेल्याचे घृणास्पद आणि तितकेच धक्कादायक कृत्य केल्याची घटना एका व्हायरल व्हिडीओमुळे उघडकीस आली आहे. या घटनेची चर्चा केवळ राजस्थानमध्येच नाही, तर संपूर्ण देशभरात होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.
पण आता राजस्थान पोलिसांनी या प्रकरणात पुढील कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आल्यानंतर नागौर पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई केली आहे.
पत्नीच्या जबाबाच्या आधारे होणार पुढील कारवाई
व्हायरल व्हिडीओमुळे माणुसकीला काळिमा फासणारे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी प्रथम आरोपीला अटक केली. पोलिसांनी पुढे पावले उचलत त्या पीडित महिलेशी संपर्क साधला आहे, जिला मोटारसायकलीच्या पाठीमागे बांधून संपूर्ण गावभर फरफटत फिरवण्यात आले. एसपी नारायण टोगस यांनी सांगितले की, पीडितेला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असून तिचा जबाब नोंदवला जाईल आणि त्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
एसपीं नारायण टोगसचे म्हणणे आहे की, व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पीडितेच्या जबाबात नवीन माहिती आल्यास इतर कलमे जोडली जातील.
दहा महिन्यापूर्वीच दिल्लीत राहणाऱ्या या मुलीशी केले होते लग्न
पती आपल्या पत्नीला मोटारसायकलला पाठीमागे बांधून गावातून फरफटत ओढून नेता असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना राजस्थानच्या नागौरमधून समोर आली आहे. या भयानक व्हिडिओमध्ये दिसते की, एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मोटारसायकलला बांधले आणि तिला फरफटत ओढत राहिला. यात पत्नी वेदनेत ओरडत होती, पण न पतीला दया आली, न प्रत्यक्षदर्शींना. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती प्रेमाराम मेघवालला अटक केली. महत्त्वाचे म्हणजे सदर आरोपीने दहा महिन्यापूर्वीच दिल्लीत राहणाऱ्या या मुलीशी लग्न केले होते. व्हायरल झालेला व्हिडिओ महिनाभरापूर्वीचा आहे.
एसपी नारायण सिंह टोगस यांनी सांगितले की, सुमारे एक महिन्यापूर्वी पत्नीने आपल्या बहिणीच्या घरी बाडमेरमध्ये एका सामाजिक कार्यक्रमात जाण्याचा आग्रह धरला होता, त्यावर प्रेमरामने तिला स्पष्टपणे नकार दिला होता. तरीही पत्नी आपल्या बहिणीच्या घरी जात असल्याचे पाहून तो नाराज झाला आणि त्याने हे घृणास्पद पाऊल उचलले. मोटारसायकलला बांधण्यापूर्वी त्याने बायकोला मारहाणही केली होती. हा प्रकार नहरसिंगपुरा या गावामध्ये घडला.
प्रेमाराम हा मद्यपी असून, तो नेहमी बायकोला मारहाण करीत असे
कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल केला. प्रेमराम बेरोजगार आहे आणि नशेचा अधीन आहे. या घटनेनंतर पीडित महिला अत्यंत धक्क्यात आहे. या घटनेच्यावेळी त्याने मद्यपान केले असल्याचे सांगण्यात आले. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून प्रेमारामला जेरबंद केले. त्याची पत्नी सध्या नातेवाइकांकडे राहात आहे. प्रेमाराम हा मद्यपी असून, तो नेहमी बायकोला मारहाण करतो, असे शेजाऱ्यांनी सांगितले.
(आधार: विविध न्यूज माध्यमे आणि व्हायरल व्हिडिओ)