जखमी पतीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार
नळदुर्ग, जि. धाराशिव,(आयर्विन टाइम्स):
नळदुर्गमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कात्री आणि चाकूने खून केल्याची धक्कादायक घटना ५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घडली. पत्नीचा जीव घेतल्यानंतर पतीने स्वतःवरही चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामुळे तोही गंभीर जखमी झाला आहे. सद्यस्थितीत पतीवर सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात खळबळ उडाली आहे.
कुटुंबाच्या चहाच्या टपरीवरच झाला हल्ला
अब्दुल वहीद बिलाल कुरेशी (४५) आणि सुलताना अब्दुल वहीद कुरेशी (४०) हे पती-पत्नी नळदुर्गच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर चहाची टपरी चालवत होते. पती अब्दुल वहिद याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्याने त्यांच्यात अनेकदा भांडणे होत असत. ५ नोव्हेंबर रोजी टपरीवर असतानाच नवरा-बायकोत वाद झाला. भांडण विकोपाला गेल्याने पतीने पत्नीवर कात्री आणि चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात सुलताना यांचा जागीच मृत्यू झाला.
स्वत:वर वार करुन घेतला जखमी पती
पत्नीचा मृतदेह पाहून नवरा अब्दुल याने स्वतःवरही चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला तत्काळ नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात नेले असता, प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले.
पोलिसांची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र सरोदे, सहायक निरीक्षक नंदकिशोर साळुंके, ईश्वर नांगरे, संतोष गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून प्रत्यक्षदर्शी नागरिकांचे जबाब नोंदवले. या घटनेची अधिक चौकशी सुरू असून पोलिसांनी संशयास्पद घटकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
कुरेशी कुटुंब उघड्यावर; मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर
या हिंसक घटनेमुळे कुरेशी कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. नवरा-बायकोमध्ये सतत वाद होत असल्याने त्यांच्या लहान मुलांवर विपरीत परिणाम झाला आहे. या दांपत्याला दोन मुलगे आणि दोन मुली आहेत, ज्यांचा सांभाळ आता आव्हान ठरणार आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे नळदुर्ग परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Trending News Team)