पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेलाउत्साहाने प्रारंभ
पट्टणकोडोली/ आयर्विन टाइम्स
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, उत्तरप्रदेश आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेला सोमवारी अमाप उत्साहाने प्रारंभ झाला. यावेळी भाविकांच्या उपस्थितीत फरांडेबाबांचा हेडाम खेळ व भाकणूक सोहळा झाला. यात्रेचा पहिला दिवस असल्याने श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावानं चांगभलं चा अखंड गजर करीत प्रमुख मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत यात्रेस प्रारंभ झाला. यात्रेतील फरांडेबाबांच्या भाकणुकीचा मुख्य सोहळा मंदिरात झाला. भाविकांनी उधळलेल्या भंडाऱ्याने पट्टणकोडोलीनगरी सुवर्णमय झाली. चार दिवस यात्रेसह धार्मिक विधी होणार आहेत.
सोमवारी सकाळी परंपरेनुसार विधीवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन झाले. तलवारीसह प्रकाश पाटील, रणजीत पाटील यांच्यासह गावडे, कुलकर्णी, जोशी, आवटे, चौगुले, मगदूम आदी मानकरी व धनगर समाजाची पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेत फरांडे बाबा हेडाम खेळ खेळताना. (छाया – शरद पाटील, चंदूर) पंचमंडळी हे फरांडेबाबांना भेटण्यासाठी व निमंत्रण देण्यासाठी निघाले. ढोल, ताशा वाजत- गाजत व भंडाऱ्याच्या उधळणीत ही मिरवणूक भाणस मंदिर, कल्लेश्वर मंदिर, श्रींचे मंदिर या मार्गाने मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी १ वाजता आली.
या गादीवर नानादेव फरांडेबाबांना आलिंगन देवून मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर भंडारा, लोकर, खारीक खोबऱ्याची उधळण करण्यात आली. मंदिरातील गाभाऱ्यात हेडाम खेळत तलवार पोटावर मारुन घेत भाकणूक कथन केली.
सोमवारी हेगडे, बोते यांचा नैवेद्य, श्रींची पहिली व दुसरी पालखी काढण्यात आली. मंगळवारी २२ रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून भरयात्रा, सार्वजनिक नैवेद्य, श्रींची तिसरी व चौथी पालखी काढण्यात येणार आहे. बुधवारी २३ रोजी फुटयात्रा व श्रींची पाचवी अखेरची पालखी होणार आहे. गुरुवारी २४ रोजी फरांडेबाबांचा गोंधळ नृत्य सोहळा होणार आहे. शुक्रवारी २५ रोजी फरांडे महाराजांकडून भागिरथीची ओटी भरणी व निरोप समारंभ होणार आहे.
यात्रेमध्ये खेळणी, पाळणे, मेवा-मिठाई, प्रसाद यासह विविध प्रकारचे व्यापाऱ्यांनी स्टॉल व दुकाने थाटली आहेत. मोठ्या प्रमाणात यात्रा भरल्याने भाविकांच्या आनंदाला उधाण आले आहे. यात्रा काळात पोलीस प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन व देवस्थान कमिटी यांच्याकडून काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, उत्तरप्रदेश आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेतील फरांडे महाराजांची भाकणूक प्रसिद्ध आहे.
यंदाची फरांडे महाराजांची भाकणूक जाणून घ्या
* पर्जन्य – नऊ दिवसात पावसाचे कावड फिरेल, पाऊस काळ चांगला राहील.
* धारण – धारण चढती राहील, महागाई वाढेल.
* राजकारण – राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल.
* भूमाता – भारताची समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल.
* बळीराजा – रोहिणीचा पाऊस, मृगाचा पेरा होईल.
* महासत्ता- भारताची महासत्ताकडे वाटचाल.
* हितसंबंध – बहिण- भावाच्या नात्यातील सलोखा कमी होईल.
* रोगराई – देवाची सेवा करील, त्याची रोगराई दूर होईल.
* कांबळा – मी स्वतः मेंढका होऊन हातात वेताची काठी घेऊन सेवा करणाऱ्या भक्ताचे सदैव रक्षण करीन.
अशी भाकणूक नानादेव फरांडेबाबांनी केली.