हिंदी न्यायालयीन चित्रपटांची यादी

बॉलिवूड म्हटलं की रोमँटिक चित्रपट, अ‍ॅक्शनपट, थरारक कथानकं किंवा गाजावाजा असलेले भव्यदिव्य सेट आपल्यासमोर उभे राहतात. मात्र याच बॉलिवूडमध्ये एक वेगळी परंपरा आहे – ती म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपटांची. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमार आणि अरशद वारसी अभिनीत ‘जॉली एलएलबी ३’ नंतर पुन्हा एकदा हे स्पष्ट झालं की प्रेक्षकांना न्यायालयीन कथा आवडतात आणि त्यांची मागणी आजही प्रचंड आहे.

हे चित्रपट ना फार मोठ्या बजेटचे असतात, ना त्यांच्या मागे फारसा प्रचाराचा गाजावाजा असतो. पण तरीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात ते आपली वेगळी जागा निर्माण करतात. न्याय, अन्याय, सत्य, असत्य, मानवी भावना आणि संघर्ष यांचा संगम या चित्रपटांमध्ये असतो, म्हणूनच ते लक्षात राहतात.

न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट

न्यायालयीन चित्रपटांचे वेगळेपण

भारतीय समाजात न्यायालय ही केवळ कायद्याची संस्था नाही, तर ती सामान्य माणसाच्या आशा-अपेक्षांचे प्रतिक आहे. “सत्य शेवटी जिंकतं” हा विश्वास या न्यायालयीन चित्रपटांमधून प्रबळ होतो. प्रेक्षकांना “युअर ऑनर”, “माय लॉर्ड”, “ऑर्डर! ऑर्डर!”, “ओव्हररूल्ड” असे संवाद ऐकताना एक वेगळीच थ्रिलिंग अनुभूती मिळते.

‘मेरी जंग’ मध्ये अनिल कपूरने न्यायालयात सत्य सिद्ध करण्यासाठी विष पिण्याचा प्रसंग असो किंवा ‘क्योंकि मैं झूठ नहीं बोलता’ या चित्रपटात गोविंदाने सत्यासाठी स्वतःला पेटवून घेण्याचा नाट्यमय प्रसंग असो – हे क्षण प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहेत. नाट्यमयतेचा अंश जरी जास्त असला तरी न्यायालयीन नाट्य प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होतं.

प्रेक्षकांच्या मनात घर करणारे चित्रपट

या प्रवाहात अनेक चित्रपट आले आणि आजही प्रेक्षक त्यांना आठवतात.

* ‘जॉली एलएलबी’ आणि ‘जॉली एलएलबी २’ – अक्षय कुमार आणि अरशद वारसी अभिनीत या मालिकेतील चित्रपट सुरुवातीला जास्त चर्चेत नसले तरी नंतर प्रचंड लोकप्रिय झाले. त्यातील संवाद, न्यायालयातील वकीलांची हुशारी, आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठीचा संघर्ष यामुळे हे चित्रपट लोकांच्या मनात कायमचे घर करून बसले.

न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट

* ‘पिंक’ – अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू अभिनीत हा चित्रपट समाजाला एक ठोस संदेश देतो : “एखाद्या मुलीने नाही म्हटलं, म्हणजे ते नाहीच!” महिलांच्या स्वातंत्र्याचा आणि सहमतीचा प्रश्न थेट हाताळणारा हा चित्रपट न्यायालयीन नाट्याला समाजपरिवर्तनाचा आयाम देतो.

* ‘सेक्शन 375’ – अक्षय खन्ना आणि ऋचा चड्ढा अभिनीत हा चित्रपट बलात्कार प्रकरणावर आधारित आहे. पुरावे, साक्षीदार, आणि न्यायालयीन तर्कांच्या माध्यमातून तो एका गंभीर प्रश्नाला भिडतो.

* ‘रुस्तम’ – अक्षय कुमार अभिनीत हा चित्रपट एका नौदल अधिकाऱ्याची सत्यकथा सांगतो, ज्याला पत्नीच्या विश्वासघातामुळे स्वतःच्या आयुष्यात खटला लढावा लागतो. हा चित्रपट न्यायालयीन चौकटीतून मानवी नात्यांचा शोध घेतो.

* ‘दामिनी’ – सनी देओलच्या दमदार संवादाने गाजलेला हा चित्रपट आजही लोकांना आठवतो. न्यायासाठी केलेला आर्त संघर्ष यात प्रखरपणे जाणवतो.

न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट

सामाजिक प्रश्नांना भिडणारे चित्रपट

काही चित्रपट केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजातील ज्वलंत प्रश्नांवर बोट ठेवतात.

* ‘ओ माय गॉड’ आणि ‘ओ माय गॉड 2’ – परेश रावल, पंकज त्रिपाठी आणि अक्षय कुमार यांच्या भूमिकेतले हे चित्रपट अंधश्रद्धा, देवावरचा आ blind विश्वास आणि त्यातून होणारा शोषण उघड करतात. “एका माणसाने देवावरच खटला भरावा” हा विचार जितका आश्चर्यकारक आहे तितकाच विचारप्रवर्तक आहे.

* ‘मुल्क’ – आशुतोष राणा आणि तापसी पन्नू अभिनीत हा चित्रपट धर्माच्या आधारे माणसाला स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे लागते, या कटू वास्तवाला भिडतो.

* ‘सिर्फ एक बंदा काफी है’ – मनोज बाजपेयी अभिनीत या चित्रपटात एक वकील लाखो भक्त असलेल्या साधूविरुद्ध आवाज उठवतो. धार्मिक संस्थांच्या मुखवट्यामागील पाखंडीपणाला हा चित्रपट उघड करतो.

हेदेखील वाचा: बॉलिवूडमधील लैंगिक असमानता : कृति सेननपासून दीपिका, प्रियंका आणि कंगनापर्यंत अभिनेत्रींचा ठाम आवाज

* ‘जय भीम’ – एका आदिवासीवर चोरीचा खोटा आरोप ठेवून त्याला कोठडीत टाकले जाते आणि नंतर तो गायब होतो. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी एक वकील संपूर्ण व्यवस्थेशी भिडतो. न्यायालयीन प्रक्रियेतील लढाई इथे समाजातील दुर्लक्षित वर्गाला न्याय देण्याचे प्रतीक ठरते.

* ‘शाहिद’ – फौजदारी अधिवक्ता शाहिद आझमी यांच्या हत्येवर आधारित हा चित्रपट आजही प्रेक्षक पाहतात. न्यायासाठी जीव पणाला लावणाऱ्या व्यक्तीचे हे प्रभावी चित्रण आहे.

न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट

न्यायालयीन चित्रपटांचे आकर्षण: या चित्रपटांचं आकर्षण नेमकं कुठे आहे?

1. नाट्यमयता आणि थरार – प्रकरणं मांडताना, वकील-न्यायाधीशांमधले संवाद, साक्षीदारांची उलटतपासणी या सर्वांमध्ये एक वेगळं रोमान्स असतो.
2. सत्य-असत्याचा संघर्ष – प्रेक्षकांना नेहमीच सत्याचा विजय पहायचा असतो. न्यायालयीन चित्रपट हीच अनुभूती देतात.
3. सामाजिक प्रतिबिंब – हे चित्रपट समाजातील विसंगती दाखवतात. कधी धार्मिक अंधश्रद्धा, कधी महिलांवरील अन्याय, कधी व्यवस्थेतील भ्रष्टाचार – या सगळ्याला न्यायालयीन चौकट मिळते.
4. सोपे पण परिणामकारक कथानक – मोठ्या सेट्स, भव्यदिव्य लोकेशन्सपेक्षा इथे संवाद आणि तर्क यांना महत्त्व असतं. म्हणूनच हे चित्रपट लहान बजेटमध्येही मोठा प्रभाव पाडतात.

न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट

आजच्या काळात वेब सीरिज आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे न्यायालयीन कथा अजून वैविध्यपूर्ण रूपात प्रेक्षकांसमोर येत आहेत. एखाद्या गुन्ह्याची चौकशी, एखाद्या सामाजिक प्रश्नाचं निराकरण, किंवा भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणारा सामान्य वकील – अशा अनेक कथा पुढेही पडद्यावर येणार आहेत. या माध्यमातून प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच नव्हे तर समाज, न्याय आणि मानवी मूल्यांवर विचार करण्याची संधी मिळेल.

बॉलिवूडमधील न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट हे केवळ नाट्यमय दृश्यांचा मेळ नाहीत, तर ते सत्य, न्याय आणि संघर्षाची कहाणी सांगतात. ‘पिंक’, ‘जॉली एलएलबी’, ‘दामिनी’, ‘जय भीम’ यांसारख्या चित्रपटांनी समाजाला वेगळा विचार दिला आहे. आज प्रेक्षकांना फक्त भव्यदिव्य दृश्यं नकोत; त्यांना वास्तवाशी नातं सांगणाऱ्या कथा हव्या आहेत. म्हणूनच न्यायालयीन चित्रपट नेहमीच त्यांना आकर्षित करतात आणि पुढेही हे आकर्षण टिकून राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *