निसर्ग

“निसर्ग आपला सर्वोत्तम सखा आहे” – हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो. पण आजच्या घडीला आपण स्वतःलाच विचारलं पाहिजे – खरंच आपण निसर्गाशी सख्याचं नातं जपतो आहोत का?

आजूबाजूला नजर टाका – सिमेंटची जंगले, टेकड्यांवर उभी राहणारी मल्टिस्टोरी इमारती, झऱ्यांवर व ओढ्यांवर अतिक्रमण, बेकायदेशीर खाणकाम, वाढता प्रदूषणाचा विळखा… हाच तो ‘सखा’ निसर्ग आहे का? आपल्याच सुखसोयींसाठी निसर्गाची जी पिळवणूक आपण केली आहे, त्याचे परिणाम आता आपल्या रोजच्या जीवनावर स्पष्टपणे दिसू लागले आहेत – तापमानवाढ, अवकाळी पाऊस, महापूर, वणवे, भूकंप आणि अधिकच अनिश्चित हवामान.

या पार्श्वभूमीवर दरवर्षी २८ जुलै रोजी ‘जागतिक निसर्ग संवर्धन दिन’ साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला Natureप्रती आपली जबाबदारी पुन्हा आठवण करून देतो.

निसर्ग

🌱 या दिवसाचे महत्त्व काय?

नैसर्गिक संसाधनांचे जतन म्हणजे केवळ पर्यावरण वाचवणे नव्हे, तर स्वतःचा आणि पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा अधिकार सुरक्षित ठेवणे होय. पाणी, हवा, माती, खनिज, वनस्पती, प्राणी, पक्षी हे सगळे घटक निसर्गाच्या गुंतागुंतीच्या साखळीत परस्परसंबंधित आहेत. यापैकी कुठलाही दुवा तुटला, तर साखळी कोसळते आणि त्याचा सर्वाधिक फटका मानवजातीला बसतो.

हे देखील वाचा: Growing population is worrisome: वाढती लोकसंख्या- संसाधनांवर ताण; भारतात केवळ 2.5 टक्के भूभाग, मात्र जगाच्या 18 टक्के लोकसंख्येचा भार या देशावर

यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे –
“मानव आणि वनस्पती यांच्यात दुवा साधणे व वन्यजीव संवर्धनात डिजिटल माध्यमांचा उपयोग शोधणे”

🕰️ इतिहास थोडक्यात…

१९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत Nature संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आणि त्यानंतर २८ जुलै हा दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून घोषित करण्यात आला. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे – शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे आणि Nature विरोधी कृतींविरुद्ध जागृती घडवणे.

हे देखील वाचा:जागतिक हेपेटायटिस दिन 28 जुलै : यकृताचा धोकादायक रोग — उपचार शक्य, पण प्रतिबंध महत्त्वाचा

🌏 संवर्धनाचे चार महत्त्वाचे घटक

1️⃣ जैवविविधता

जगभरात अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या अधिवासांचे जतन आणि प्रजातींचे संरक्षण हे मानवजातीच्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी आवश्यक आहे.

2️⃣ हवामान

हरितगृह वायूचे नियंत्रण, सौरऊर्जेचा वापर, प्रदूषण घटवणे, प्लास्टिक टाळणे – या सगळ्या सवयी हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.

3️⃣ शाश्वत विकास

शेती, वनीकरण, मासेमारी, पर्यटन आणि उद्योग यामध्ये पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब आवश्यक आहे. विकास आणि संवर्धन या एकमेकांचे विरोधक नसून पूरक आहेत.

4️⃣ लोकसहभाग

सरकार, संस्था, कंपन्या आणि सामान्य नागरिक यांचा सामूहिक सहभाग हा संवर्धनासाठी अत्यावश्यक आहे.

निसर्ग

🙌 तुम्ही काय करू शकता?

* स्थानिक निसर्गाची माहिती घ्या, इतरांना सांगा.
* झाडे लावा, झाडे वाचवा, स्वच्छता मोहीमांमध्ये सहभागी व्हा.
* प्लॅस्टिक टाळा, पाण्याचा अपव्यय थांबवा.
* पर्यावरण संस्था, वन्यजीव रक्षण उपक्रमांना स्वयंसेवक म्हणून मदत करा.
* डिजिटल माध्यमांचा वापर करून पर्यावरणाबद्दल माहिती पसरवा.

हे देखील वाचा:स्वयंपाकघरातील काही वस्तू तुमच्या तिजोरीवर ओढवू शकतात संकट – जाणून घ्या, कोणत्या 5 गोष्टी ठेऊ नयेत!

📊 तुम्हाला माहिती आहे का?

* सुमारे ८०% लोकसंख्या अजूनही औषधांसाठी वनस्पतींवर अवलंबून आहे.
* आधुनिक औषधांपैकी २५% औषधे वनस्पतींपासून तयार होतात.
* ७५% अन्नउत्पादन हे परागसिंचन करणाऱ्या कीटकांवर अवलंबून आहे.
* वने दरवर्षी २.६ अब्ज टन CO₂ शोषतात, जे मानवनिर्मित उत्सर्जनाच्या ३०% इतके आहे.
* निसर्गाशी सुसंगत असलेले पर्यटन जगभरात कोट्यवधींना रोजगार देते.
* निसर्गात वेळ घालवणाऱ्यांमध्ये तणाव, चिंता यांचे प्रमाण २०–३०% ने कमी असते!

निसर्गाला वाचवणे म्हणजे स्वतःचा श्वास वाचवणे होय.
त्यामुळे आता वेळ आली आहे – केवळ ‘वाचवूया’ म्हणण्याची नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करण्याची!
चला, निसर्गाची साथ देऊया आणि आपलं हरवलेलं सख्य पुन्हा जपायला सुरुवात करूया.

✍️ मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *