निवडणूक काम: पाच शिक्षकांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
आयर्विन टाइम्स / छत्रपती संभाजीनगर/ नागपूर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेतली जात आहे. या कामासाठी निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनासह शिक्षकांची निवड करण्यात आली. पण, या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अनेकदा तोंडी आणि लेखी नोटीस बजावल्यानंतरही प्रतिसाद न देणाऱ्या पाच शिक्षकांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. त्यांच्याविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून शिक्षक नीलेश एस. छाबडा, एम. आर. लव्हाळे, पी. जे. देशमुख, शिक्षिका खान नाजेमा आणि नाज फिरदोस यांचीही नियुक्ती करण्यात आली. गेल्या चार जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कार्यक्रमासंदर्भात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला हे पाचही शिक्षक गैरहजर होते.
त्यामुळे त्यांना याबाबत व्हॉट्सअॅपवर नोटीस पाठविण्यात आली. मात्र, त्यांनी या नोटिसीला तोंडी अथवा लेखी उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांना घरोघरी जाऊन मतदारांच्या पडताळणीचे कामकाज सुरू न केल्याबाबतही नोटीस बजावण्यात आली. त्याचाही या शिक्षकांनी खुलासा केला नाही. शिक्षक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यावरून शुक्रवारी (ता. १२) नायब तहसीलदार देविदास खटावकर (वय ५४, रा. स्वामी विवेकानंदनगर, हडको) यांच्या तक्रारीवरून शिक्षकांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
हे देखील वाचा: Oppo AI phone: ओप्पो इंडिया लॉन्च करत आहे रेनो 12 5जी सिरीज; भारतात 18 जुलैपासून विक्रीला उपलब्ध
दोनशेवर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा; जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : निवडणुकीच्या कामात केली हयगय
आयर्विन टाइम्स / नागपूर
लोकसभा निवडणुकीच्या कामा हयगय केल्याप्रकरणी दोनशेवर कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ३० हजारांवर कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात आली होती. यात जवळपास सर्वच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले.
त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी म्हणजे मतदान व मतमोजणीवेळी २० हजारांवर कर्मचाऱ्यांची ड्यूटी लावण्यात आली. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले. या प्रशिक्षणाच्या वेळी काही जण अनुपस्थित होते. तर मतदानाच्या वेळीही बूथ प्रमुख व इतर कर्मचाऱ्यांमुळे प्रशासनाची अडचण झाली. बूथवरील मतदान आणि प्रत्यक्ष झालेले मतदान यात तफावत होती. कर्मचाऱ्यांना मतदानाचे आकडेही चुकविले.
हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 13 जुलै: मेष, वृषभ यासह 7 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ, जाणून घ्या आजच्या राशीतील तुमचे भविष्य
काही केंद्रावर मॉक ड्रीलच्या वेळी चुका झाल्यात. मतदान प्रक्रियेच्या वेळी अनेक कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्वक काम केले नाही. तर काहींनी ही प्रक्रिया गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे मतदानाचे आकडे जाहीर करण्यासही बराच काळ लागला. त्यामुळे प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्या गेले. निवडणूक आयोगाकडूनही नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
त्यानंतर निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया आटोपल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. त्यांना निवडणूक विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक प्रक्रियेत हयगय केल्याप्रकरणी २०० वर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. यामुळे संबंधितांना चांगलाच धक्का बसला आहे. संबंधितांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात आली.