नागपूर: प्रियकराला तिच्यासोबत संसार करायचा होता, पण त्याला ‘दोघात तिसरा’ नको होता, म्हणून त्याने तिच्या मुलाला ट्रेनमध्ये बसवून सोडून दिले…
नागपूरच्या बातम्या,(आयर्विन टाइम्स): पतीसोबत झालेल्या भांडणातून साडेचार वर्षांच्या मुलासह तिने घर सोडले. नागपुरात वास्तव्यास असताना एका युवकाशी तिचे सुत जुळले. मात्र, या प्रियकराला तिच्या मुलाचा अडसर वाटत होता. मुलाचे काय करायचे असा प्रश्न त्याच्यापुढे होता. शेवटी त्याने एक शक्कल लढवली. ‘दोघांत तिसरा’ नको म्हणून त्याने प्रेयसीच्या मुलाला चक्क एका ट्रेनमध्ये बसवून सोडून दिले आणि त्याचा अपहरण झाल्याचा बनाव केला. पण पोलिसी खाक्यापुढे त्याची डाळ शिजली नाही. शेवटी पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरूप तिच्या आईच्या हाती सोपवले.
नागपुरातल्या गणेशपेठ पोलिसांनी त्याचे बिंग फोडले आणि मुलाला लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने सुखरुप घरी आणले. प्रियकराला अटक करण्यात आली आहे. दोघात तिसरा नको म्हणणाऱ्या प्रियकराला शेवटी जेलची हवा खावी लागली. हंसराज ज्ञानेश्वर दखने (वय २५, रा. पोरा, लाखनी, भंडारा) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. तेलही गेले,तूपही गेले अशी त्याची अवस्था झाली. तो एका हॉटेलमध्ये काम करत असे.
नागपूरच्या प्रियकराला नको होता ‘दोघांत तिसरा’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ३० वर्षीय महिलेने काही महिन्यांपूर्वी पतीशी पटत नसल्याने साडेचार वर्षांच्या मुलासह गाव सोडले. नागपुर शहरात आल्यावर एका हॉटेलमध्ये काम करू लागली आणि ती एका लॉजमध्ये मुलासह वास्तव्य करू लागली. यादरम्यान तिची हॉटेलमध्ये असलेल्या हंसराजशी ओळख झाली. काही दिवसातच दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे दोघेही एकाच लॉजमध्ये सोबत राहू लागले. सगळे मनासारखे झाले असले तरी त्याला प्रियेसीच्या मुलाचा अडसर वाटत होता. तिच्याशी लग्न तर करायचे होते, मात्र तिचा लहानगा मुलगा त्याला नको होता. त्याला मुलगा अडसर वाटू लागला.
नागपूरच्या रेल्वे स्टेशनमध्ये त्याने वर्धा मार्गाने जाणाऱ्या रेल्वेत बसविले
मुलाविषयी त्याच्या मनात प्रेम निर्माण व्हायचा प्रश्नच नव्हता. उलट तो हा अडसर कसा दूर करायचा याचा विचार करत होता. यातून त्याने एक शक्कल शोधून काढली. शुक्रवारी (ता. २१) सकाळी हंसराजने मुलाला शाळेत टाकण्याच्या बहाण्याने आपल्या सोबत नेले. दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर नेऊन वर्धा मार्गाने जाणाऱ्या रेल्वेत बसविले आणि तेथून पसार झाला.
घरी आल्यावर मुलाच्या अपहरणाचा केला बनाव
रेल्वे स्थानकावरून घरी आल्यावर त्याने महिलेला तीन जणांनी मुलाचे अपहरण केल्याची बतावणी केली. घाबरलेल्या महिलेने मुलाच्या अपहरणाची तक्रार गणेशपेठ पोलिसांकडे दाखल केली. पोलिस निरीक्षक पंडित यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आष्टनकर यांच्या पथकाने तपास सुरू केला. या तपासात हंसराजने वेळोवेळी बदललेली साक्ष यामुळे पोलिसांमध्ये संशय निर्माण झाला. त्यामुळे त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चिमुकल्याला रेल्वेत सोडल्याची माहिती दिली. ती मिळताच, लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने वर्ध्यातून मुलाला सुखरुप घरी आणले.
मुलाचा जीवही धोक्यात आला असता
हंसराज याचे महिलेवर प्रेम होते. त्याला तिच्यासोबत लग्नही करायचे होते. मात्र, त्याच्या यात मुलगा अडसर असल्याचे त्याला वाटत होते. त्यातून त्याने हा गुन्हा केल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्याने केवळ मुलाला ट्रेनमध्ये बसवून निघून जाण्याचे कृत्य केले. मात्र, त्याच्या मनात वेगळेच काही असते तर मुलाचा जीवही धोक्यात आला असता.
नागपूर पोलिसांनी पतीची चौकशी केल्याने खरे सत्य आले बाहेर
हंसराजने मुलाला ट्रेनमध्ये सोडून घरी आल्यावर महिलेला तिघांनी मुलाचे अपहरण केल्याची बाब सांगितली. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार देताच, महिलेच्या संशयावरून पोलिसांनी तिच्या पतीलाही चौकशीसाठी बोलाविले. मात्र, त्याने मुलाला नेले नसल्याचे सांगितले. तपासातही ते लक्षात आले. त्यामुळे यामागे वेगळेच काही असल्याचा संशयावरून पोलिसांनी रेल्वे स्थानकाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा हंसराज त्याला रेल्वेत बसवित असल्याचे दिसले. त्यामुळे हंसराजला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर सत्य समोर आले.
हे देखील वाचा: पुणे न्यूज: अल्पवयीन मुलीवर नात्यातील तिघांचा अत्याचार: चुलत भाऊ, चुलता आणि वडिलांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल; आईला प्रकार सांगितल्यावर प्रकार उघडकीस
कौटुंबिक कलहातून शिपायाची आत्महत्या
नागपूर: हिंगणा पोलिस ठाण्यातील शिपायाने घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. २३) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकाराने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. विजय रामदास चावरे (वय ३८, रा. पोलिस निवासी गाळे, गिट्टीखदान ) असे या शिपायाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी रेणुका चावरे कोराडी ठाण्यात शिपाई असून त्यांना दोन मुले आहेत. विजय सतत दारू पित होता. पत्नीसोबत भांडण करून त्यांच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांमध्येही सातत्याने भांडणे व्हायची.
दरम्यान शनिवारी विजय दारूच्या नशेत घरी आला व पत्नीशी भांडण केले. त्यानंतर पत्नी बाहेर गेली होती. परतल्यानंतर मात्र पतीने दार न उघडल्याने ती रात्रभर कारमध्येच झोपली. रविवारी पहाटे रेणुका उठल्या आणि त्यांनी खोलीत डोकावून बघितले असता, विजयने गळफास लावल्याचे आढळले. त्यांनी आरडाओरड करताच, शेजारी जागे झाले. त्यांनी याबाबत गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली.