नवरात्र आणि बॉलिवूड

भारत हा सण-उत्सवांचा देश. प्रत्येक महिन्यात एखादा धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक सण आपल्याला एकत्र आणतो. परंतु काही सण असे असतात जे केवळ पूजा-अर्चनेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते लोकजीवनाचा, कलेचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात. नवरात्र उत्सव हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण. देवी ‘दुर्गा’च्या नऊ रूपांची उपासना, व्रत-उपवास, उत्साहाने भरलेले गरबा-डांडिया, दुर्गापूजांचे भव्य पंडाल, आणि दहाव्या दिवशी साजरा होणारा दसरा – या सर्वांची सांगड म्हणजे नवरात्र.

सध्या देशभर navratra उत्सवाची धूम आहे. भक्तगण उपासना करताना ज्या श्रद्धेने देवीसमोर नतमस्तक होतात, तीच भावना विविध कलाप्रकारांतूनही प्रकट होते. संगीत, नृत्य, साहित्य यांसारख्या क्षेत्रांप्रमाणेच चित्रपटसृष्टीनेही नवरात्राचा भक्तिमय आणि उत्सवी माहोल आपल्या पडद्यावर सुंदरतेने टिपला आहे. हिंदी चित्रपटांमध्ये नवरात्राचे दर्शन हे केवळ एक पार्श्वभूमी म्हणून नसून, कथानकाला सांस्कृतिक आणि भावनिक गती देणारा एक महत्त्वाचा घटक म्हणून समोर आले आहे.

नवरात्र आणि बॉलिवूड

नवरात्र आणि चित्रपट – एक सांस्कृतिक नातं

नवरात्राशी असलेला संबंध बॉलिवूडसाठी काही नवीन नाही. अनेक दशकांपासून या उत्सवाचे चित्रण सिनेमांमध्ये होत आले आहे. navratra व दुर्गापूजा या उत्सवांशी संबंधित दृश्ये अनेकदा पात्रांच्या संघर्ष, त्यांचा भावनिक प्रवास किंवा कथेतील निर्णायक वळण दाखवण्यासाठी वापरली गेली आहेत.

आई दुर्गेच्या चमत्कारांवर आधारित असंख्य चित्रपट बॉलिवूडमध्ये निर्माण झाले आणि ते लोकप्रियही झाले. भक्तीप्रधान सिनेमांव्यतिरिक्त, मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्येही दुर्गापूजेची दृश्ये, देवीला अर्पण केलेली गीते, गरबा-डांडिया किंवा पूजा यांसारख्या आयोजनांचे सादरीकरण वारंवार केले गेले. प्रेक्षकांशी भावनिक नातं निर्माण करण्यासाठी अशी दृश्ये किंवा गाणी महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

हेदेखील वाचा: न्यायालयीन प्रक्रियेवर आधारित चित्रपट : वास्तव, नाट्यमयता आणि प्रेक्षकांची पसंती; जॉली एलएलबी ते पिंकपर्यंतचा प्रवास

‘सुहाग’मधील डांडियाचे सुपरहिट गीत

१९७९ साली प्रदर्शित झालेला मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सुहाग’ हा चित्रपट आजही नवरात्राशी जोडला जातो. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित झालेले ‘नाम रे सबसे बड़ा तेरा नाम.. ओ शेरोंवाली’ हे गीत प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहे. सिनेमागृहात हे गाणं लागलं की वातावरणात भक्तिभावासोबतच डांडिया-गरब्याची संगीतमय लय निर्माण होत असे.

नवरात्र आणि बॉलिवूड

या गाण्याने जेव्हा प्रेक्षकांना नाचायला लावले, तेव्हाच ते एक अजरामर गीत ठरले. आजही नवरात्र, दुर्गापूजा किंवा गरबा-डांडियाच्या प्रसंगी हे गाणे आपोआपच दुमदुमते. एका गाण्याने सणाच्या उत्साहाला किती उंचीवर नेऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सुहाग’मधील हे गीत.

भन्साळींच्या सिनेमांत नवरात्राची झळाळी

सांस्कृतिक समृद्धी, रंगांची उधळण, पारंपरिक वेशभूषा आणि नृत्य यांचा देखणा मिलाफ म्हणजे संजय लीला भन्साळींचे चित्रपट. त्यांच्या चित्रपटांत navratra, गरबा आणि डांडियाचे दृश्ये नेहमीच भव्यतेने सादर होतात.

१९९९ साली आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या माध्यमातून गरब्याचा उत्सवी रंग पडद्यावर खुलून दिसतो. ‘ढोली तारो ढोल बाजे’ या गाण्याने तर जणू संपूर्ण गुजरातचा नवरात्रोत्सव पडद्यावर उतरवला. प्रेक्षकांना केवळ दृश्यांमधूनच त्या उत्सवात सहभागी असल्याचा अनुभव मिळतो.

नवरात्र आणि बॉलिवूड

सन २००२ मध्ये आलेल्या भन्साळींच्याच ‘देवदास’ या चित्रपटात दुर्गापूजेचे दृश्य विशेष लक्षवेधी ठरते. ‘डोला रे डोला’ या गाण्यावर ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांच्या नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. आई दुर्गेचा देखणा पंडाल आणि त्यातील भक्तिमय वातावरणाने या चित्रपटाला एक आगळा वेगळा आयाम दिला.

२०१३ साली आलेल्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ मध्ये दीपिका पदुकोणने ‘नगाडा संग ढोल’ या गाण्यावर सादर केलेले नृत्य आजही नवरात्राच्या गाण्यांमध्ये लोकप्रिय आहे. भन्साळींच्या कॅमेऱ्यातून साकारलेला नवरात्राचा उत्सव हा रंग, भक्ती आणि संस्कृतीचा साक्षात्कार घडवतो.

‘परिणीता’ आणि ‘कहानी’ – दुर्गापूजेचे सिनेमाई दर्शन

२००५ मध्ये आलेल्या प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘परिणीता’ या चित्रपटात शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीचे सुंदर चित्रण केले आहे. या चित्रपटात सैफ अली खान, संजय दत्त आणि विद्या बालन यांच्या भूमिका लक्षवेधी ठरतात. कोलकात्यातील दुर्गापूजेच्या विधी, तिची भव्यता आणि परंपरा पडद्यावर प्रभावीपणे टिपली गेली आहे.

२०१२ साली आलेल्या सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी’ या थरारपटात विद्या बालनची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात कोलकात्यातील दुर्गापूजेच्या काळात निर्माण होणारा गजबजलेला माहोल, ढोल-नगारे, पंडाल आणि भक्तांची गर्दी अत्यंत वास्तवतेने दाखवली आहे. कथेच्या उत्कंठावर्धक प्रवासाला या पार्श्वभूमीने अधिक वजन दिले.

नवरात्र आणि बॉलिवूड

अलीकडील चित्रपटांतील नवरात्राची झलक

गेल्या दशकात नवरात्राशी संबंधित अनेक गाणी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली. २०१८ मध्ये आलेल्या आयुष शर्मा यांच्या डेब्यू फिल्म ‘लवयात्री’ मधील ‘चोगाडा’ हे गाणे त्याच वर्षीचे नवरात्राचे गरबा अँथेम ठरले. देशभरातील दुर्गापंडालांमध्ये या गाण्याच्या ठेक्यावर लोक थिरकत होते. आजही हे गाणे नवरात्राच्या गरबा कार्यक्रमांत हमखास वाजते.

२०२३ मध्ये आलेल्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी यांच्या प्रेमकथेची सुरुवातच नवरात्रातील गरब्याच्या कार्यक्रमात होते. या चित्रपटाने नवरात्राला एक प्रेमळ आणि आधुनिक स्पर्श दिला.

त्याच वर्षी आलेल्या करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ मध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात दुर्गापूजेच्या काळातलं एक महत्त्वाचं दृश्य आहे, ज्यात रणवीर सिंग आई दुर्गेची पूजा-अर्चना करत कथक सादर करतात आणि नंतर ‘ढिंढोरा’ गाण्यावर थिरकतात. या दृश्याने प्रेक्षकांच्या मनात उत्सवाची जिवंत छटा उमटवली.

नवरात्र आणि बॉलिवूड

navratra हा सण केवळ धार्मिक श्रद्धांचा नाही, तर तो भारतीय संस्कृतीतील रंग, संगीत, नृत्य आणि भक्ती यांचा मिलाफ आहे. चित्रपटसृष्टीने या उत्सवाचे सौंदर्य केवळ पडद्यावर दाखवले नाही, तर ते प्रेक्षकांच्या हृदयातही पोहोचवले आहे. ‘सुहाग’मधील भक्तिमय गीत असो, भन्साळींच्या चित्रपटांतील रंगारंग दृश्ये असोत किंवा अलीकडच्या काळातील ‘चोगाडा’सारखी गाणी – नवरात्राचा उत्सव चित्रपटांतून पुन्हा जिवंत होतो.

आज navratra देशभर साजरा होत असताना, या सणाचे चित्रपटसृष्टीशी असलेले नाते आपल्याला आठवण करून देते की सण हे केवळ उपासनेपुरते मर्यादित नसून, ते लोकांच्या भावनांना, संस्कृतीला आणि कलांना एकत्र आणणारे असतात. navratra आणि बॉलिवूड – या दोन्हींचा संगम म्हणजे भक्ती, भव्यता आणि मनोरंजनाचा अविस्मरणीय अनुभव!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *