सारांश: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जत तालुक्यातील पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी आयोग पाठपुरावा करेल, असे स्पष्ट केले. खासदार विशाल पाटील यांनीही घटनेचा निषेध करून पोलिसांना तातडीने तपास पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संशयित आरोपीवर यापूर्वीही ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे सांगत, अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
जत,(प्रतिनिधी):
“जत तालुक्यामधील घडलेली घटना दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेचा प्रथम महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून निषेध करते. संबंधित आरोपीच्या विरोधात पोलिसांनी सक्षम पुरावे ताब्यात घेतले आहेत. त्या अनुषंगाने हा खटला जलदगती न्यायालयात चालेल. येत्या पंधरवड्यात संबंधित आरोपीच्या विरोधात आरोपपत्र दाखल होईल,” अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
हे देखील वाचा: jat crime news: अत्याचार करून 4 वर्षांच्या बालिकेचा खून : जत तालुक्यात संतापाची लाट
महिला आयोगाच्या माध्यमातून नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जत तालुक्यातील पीडित बालिकेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पीडित कुटुंब व नातेवाईक, ग्रामस्थ, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, सुनील पवार, संजय तेली, पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंखे, सहनिरीक्षक संदीप कांबळे आदी उपस्थित होते.
सौ. चाकणकर म्हणाल्या, “समाजात काही अशा विकृती आहेत, त्यांना वेळीच ठेचले पाहिजे. यासाठी आपण देखील सतर्क असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कडक कायदे असणारे राज्य आहे. त्यामुळे या घटनेतील पीडित कुटुंबास न्याय मिळेल. महिला आयोग याचा पाठपुरावा करेल आणि आरोपीस फाशीच होईल. कारण अशा विकृती समाजात असायला नकोत. येथील पोलिसांना देखील योग्य त्या सूचना दिल्या आहेत. इथल्या पोलिसांनी गतीने तपास केला आहे. सबळ पुरावे उपलब्ध झाले आहेत.
दरम्यान, याआधी कोल्हापूर मधील खोची येथील असेल, मावळ मधील कोथुर्णे असेल किंवा वेल्हामधील कातकरी समाजातील असेल, या तिन्ही घटनांतील आरोपींना फाशीच्या शिक्षेसाठी राज्य महिला आयोगाने पाठपुरावा केला होता. या तिन्ही घटनांतील आरोपींना न्यायालयाने फाशी सुनावली होती. या घटनेतील नराधम आरोपीला देखील फाशीची शिक्षा होईल, असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा: हवन करताना नारळ का जाळला जातो? जाणून घ्या यामागचे 5 महत्त्व
पोलिस यंत्रणाने तातडीने तपास करून कुटुंबाला न्याय द्यावा- खासदार पाटील : बालिकेच्या कुटुंबाची घेतली भेट
जत तालुक्यात चार वर्षांच्या बालिकेवर अमानुषपणे अत्याचार करून तिची केलेली हत्या ही माणुसकीला काळिमा फसणारी घटना आहे. या दुर्दैवी घटनेचा निषेध करतो. नराधमास कठोर शिक्षा होण्यासाठी आपण प्रयत्न करूच, पोलिस यंत्रणने तातडीने तपास पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा,” अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
खासदार विशाल पाटील व त्यांच्या पत्नी सौ. पूजा पाटील यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना आधार दिला. त्यानंतर जतमध्ये तपास अधिकारी उपाधीक्षक सुनील साळुंखे यांना भेटून नराधमास योग्य ती शिक्षा होण्यासाठी तातडीने तपास करून हा गुन्हा जलदगती न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा होईल, यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना खासदार पाटील यांनी केल्या.
खासदार पाटील म्हणाले, “संशयित आरोपीवर यापूर्वीही ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याची शिक्षा तो भोगून आला आहे. यानंतर लगेचच एका चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्दयपणे हत्या करतो. ही बाब समाजाच्या दृष्टीने गंभीर असून पुन्हा हा प्रकार घडू नये, यासाठी आपण ही शासनाकडे प्रयत्न करणार आहे.”
“या मागणीसाठी आपण गृहमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेऊन ‘लाडकी बहीण’ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासह त्या समाजात सुरक्षित राहाव्यात, यासाठी शासनाने तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी करणार आहे.
ही घटना दुर्दैवी आहेच, अशी प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी नागरिकांनी आवाज उठविला पाहिजे,” असे आवाहनही खासदार विशाल पाटील यांनी केले.