राजस्थान

मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधि):
दूध हे केवळ पोषणाचं साधन नसून, भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग मानला जातो. ग्रामीण अर्थव्यवस्था, सण-उत्सव आणि दैनंदिन आहारात दूधाचं स्थान महत्त्वाचं आहे. ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड’ (एनडीडीबी)च्या 2024 मधील अहवालानुसार, राजस्थान राज्यात प्रतिदिन प्रतिव्यक्ती दूध खप सर्वाधिक म्हणजे तब्बल ४५९ ग्रॅम इतका आहे. त्यामुळे दूध पिण्यात राजस्थानने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

राजस्थान

राजस्थाननंतर पंजाब (४२७ ग्रॅम) आणि हरयाणा (४०० ग्रॅम) या दूध उत्पादक राज्यांचा क्रमांक लागतो. गुजरात (३७५ ग्रॅम), आंध्र प्रदेश (३५० ग्रॅम) आणि उत्तर प्रदेश (३२५ ग्रॅम) देखील दूध खपात पुढे आहेत.

हेदेखील वाचा: 14.6% स्निग्धांशाचे पौष्टिक दूध पंढरपुरी म्हैस: महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा; unique breed; नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडमधील झांकीत पंढरपुरी म्हशीची झलक मिळणार पाहायला

दक्षिण भारतातही आंध्र आघाडीवर…
दक्षिण भारतात आंध्र प्रदेशमध्ये ग्रामीण भागात प्रतिव्यक्ती ३५० ग्रॅम दूधाचा खप आहे. विशेष म्हणजे येथे ७७.१ टक्के कुटुंबं दूध उत्पादन करतात आणि ७४.८ टक्के कुटुंबं स्वतःच ते दूध वापरतात. तामिळनाडू (३१३ ग्रॅम) दुसऱ्या क्रमांकावर असून, येथेही ७६.२ टक्के कुटुंबं दूध वापरतात.

राजस्थान

राज्यानुसार प्रतिदिन प्रतिव्यक्ती दूध खप (ग्रॅममध्ये):

1. राजस्थान – 459
2. पंजाब – 427
3. हरयाणा – 400
4. गुजरात – 375
5. आंध्र प्रदेश – 350
6. उत्तर प्रदेश – 325
7. तामिळनाडू – 313
8. मध्य प्रदेश – 305
9. महाराष्ट्र – 290
10. केरळ – 265
11. बिहार – 150
12. ओडिशा – 125
13. पश्चिम बंगाल – 110
14. आसाम – 100

ग्रामीण भारत दूधात पुढे!
शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात दूधाचा खप अधिक आहे. देशातील ६४ टक्के ग्रामीण कुटुंबांकडे दूध देणारी जनावरे आहेत. त्यामुळे ग्रामीण भारतात दररोज सरासरी २६४ ग्रॅम दूध प्रतिव्यक्ती पातळीवर वापरलं जातं, तर शहरी भागात हे प्रमाण १४८ ग्रॅम इतकं आहे.

राजस्थान

जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश – भारत!
भारत आज जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. एकट्या भारताचा जागतिक उत्पादनात २५ टक्के हिस्सा आहे – म्हणजेच दर चार ग्लासांपैकी एक ग्लास दूध भारतात तयार होतं!

2025 पर्यंत दूधाची मागणी २६६ दशलक्ष टनांवर जाईल असा अंदाज आहे.
भारताने अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्राझील, फ्रान्स, रशिया, न्यूझीलंड अशा देशांनाही दूध उत्पादनात मागे टाकलं आहे.
शिवाय, सिंगापूर, श्रीलंका, भूतान, नेपाळ व बांगलादेश हे शेजारी देश दूधासाठी भारतावरच अवलंबून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed