सारांश: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित भव्य मराठी चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित हा चित्रपट स्त्री-पुरुष समतेचा आणि भक्तीचा संदेश देतो. अवधूत गांधी व देवदत्त बाजी यांच्या संगीताने चित्रपट अधिक भावस्पर्शी झाला आहे. मराठी प्रेक्षकांसाठी हा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे.
मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील तेजस्वी संत मुक्ताबाई यांच्या जीवनावर आधारित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्पाल लांजेकर लिखित व दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्मितीसंभार रेश्मा कुंदन थडानी यांनी उचलले असून ए.ए. फिल्म्स या प्रतिष्ठित वितरण संस्थेच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुक्ताई : भक्ती, ज्ञान आणि गुरुत्वाचा प्रवाह
संत मुक्ताबाई म्हणजे महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक लखलखता तारा. लहान वयात भक्त संप्रदायामध्ये प्रखर विद्वत्तेसाठी ओळखल्या गेलेल्या मुक्ताबाईंनी केवळ भगिनी म्हणून नव्हे, तर गुरु, माता आणि समाजप्रबोधक म्हणूनही महत्वपूर्ण भूमिका बजावली. “सप्रेम निवृत्ती आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलचरणी ।” संत चोखामेळांनी मुक्ताईंच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या जीवनाचे सार या ओळींमधून मांडले आहे.
या चित्रपटाच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये मुक्ताई विठ्ठलाची आराधना करताना दिसत आहेत. यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे.
समाजप्रबोधनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा चित्रपट
संत ज्ञानेश्वरांच्या भावंडांमध्ये मुक्ताई केवळ भगिनी नव्हत्या, तर त्यांनी गुरूची भूमिका देखील पार पाडली. त्या स्त्री-पुरुष भेदभावाच्या पलीकडे जाऊन समाजासमोर नवा विचार मांडणाऱ्या संत होत्या. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट आजच्या तरुणाईला त्या काळातील समाजस्थिती, भक्तीरसाने न्हालेला त्यांचा जीवनप्रवास आणि संत परंपरेतील त्यांचे महत्त्व उलगडून सांगणार आहे.
या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणतात, “मुक्ताईंचे कार्य आणि विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांनी भक्तिरसातून दिलेला स्त्री-पुरुष समतेचा संदेश, त्यांची कणखर भूमिका आणि समाजप्रबोधनाचे कार्य यांचा आजच्या पिढीला परिचय व्हावा म्हणून हा चित्रपट निर्मित केला आहे.”
कलाकार आणि तांत्रिक बाजू
चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अवधूत गांधी आणि देवदत्त बाजी यांनी सांभाळली असून, छायांकन संदीप शिंदे, संकलन सागर शिंदे आणि विनय शिंदे, कलादिग्दर्शन प्रतीक रेडीज, ड्रोन आणि स्थिरछायाचित्रण प्रथमेश अवसरे, रंगभूषा अतुल मस्के, तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे.
चित्रपटात नृत्यदिग्दर्शन किरण बोरकर, ध्वनीआरेखन निखिल लांजेकर, पार्श्वसंगीत शंतनू पांडे, तर साहसदृश्ये बब्बू खन्ना यांनी दिली आहेत. चित्रपटाचे सहनिर्माते सनी बक्षी, तर कार्यकारी निर्माती केतकी गद्रे अभ्यंकर आहेत.
हे देखील वाचा: Big budget films 2025: सलमान, अक्षय, देवगण, कमल हसन आणि ऋतिक यांच्या चित्रपटांची धमाल
१८ एप्रिलला मोठ्या पडद्यावर मुक्ताईंच्या जीवनाचे दर्शन
मराठी प्रेक्षकांसाठी संतपरंपरेवरील चित्रपट नेहमीच आत्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ यांसारख्या ऐतिहासिक चित्रपटांनंतर दिग्पाल लांजेकर यांनी संतपरंपरेवर आधारलेला ‘Sant Dnyaneshwaranchi Muktai’ हा नवा चित्रपट आणला आहे.
१८ एप्रिलपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात भेटूया संत मुक्ताईंना!