वर्तमान

वर्तमान क्षणावर आपलं संपूर्ण नियंत्रण

आपल्या जीवनात वर्तमान क्षणच एकमात्र असा आहे, ज्यावर आपलं संपूर्ण नियंत्रण आहे. भविष्याबद्दल कोणालाच निश्चित माहीत नाही, त्यामुळे आपण वर्तमानात काय करतो, कसे जगतो, हेच आपल्या आनंदाचं आणि जीवनाचं खरं रहस्य आहे. जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय आपण जगण्यातलं समाधान शोधू शकत नाही. शेवटी, जीवनाच्या अंतिम सत्याचा सामना करावा लागतो – मृत्यू ही एक अपरिहार्य घटना आहे. म्हणूनच, आपल्या प्रत्येक क्षणाला महत्त्व देणं आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणं हेच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचं लक्षण आहे.

वर्तमान

एका कथेत सांगितल्याप्रमाणे, एक प्रवासी एका हिंसक प्राण्याच्या तावडीत सापडतो. त्याने वाचण्यासाठी एका कोरड्या विहिरीत उडी मारण्याचा विचार केला, पण विहिरीच्या तळाशी एक अजगर त्याची वाट पाहत असतो. या विहिरीच्या कडेला एक फांदी उगवलेली असते, त्याने ती धरून जीव वाचवला. परंतु दोन उंदीर, एक काळा आणि एक पांढरा, ती फांदी कुतरत असतात, ज्यामुळे ती फांदी कधीही तुटू शकते. प्रवासी संकटात असतानाच त्याला फांदीवर मधाचे काही थेंब दिसतात आणि तो ते चाखून पाहतो. तात्पुरता गोडवा त्याला मोहवतो, पण लवकरच त्याला मृत्यूच्या जवळ येण्याची जाणीव होते. त्याचं लक्ष अजगर आणि उंदरांकडे जातं, आणि मधाचा गोडवा त्याच्यासाठी फिका पडतो.

हे देखील वाचा: Google package: गूगल ने बिहारच्या तरुणीला दिले 60 लाखांचे पॅकेज; ‘अलंकृता’ची ही अभूतपूर्व यशोगाथा सर्वांनाच प्रेरणादायी

ही कथा आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवते – संकटांमध्ये सुद्धा वर्तमान क्षणात आनंद शोधणं महत्त्वाचं आहे. मात्र, जेव्हा आपण भविष्याच्या किंवा मृत्यूच्या भीतीने भारावून जातो, तेव्हा आपल्याला वर्तमानाचा आनंद गमवावा लागतो. म्हणूनच, वर्तमान क्षणात जिवंत राहणं हे आपल्या जीवनाचं सर्वात महत्त्वाचं ध्येय आहे.

महत्त्वाच्या व्यक्तीची ओळख

जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तीच असते, जी आपल्यासोबत त्या क्षणी उपस्थित असते. भविष्यात कोणाशी आपला संबंध कसा असेल किंवा कसा राहील, हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे, त्या व्यक्तीला सन्मान देणं, आनंदी ठेवणं आणि तिला महत्त्व देणं हे आपलं प्रमुख कर्तव्य आहे. प्रत्येक संबंधाचा सन्मान करणं आणि त्यातून आनंद घेणं हाच जीवनाचा खरा अर्थ आहे. आपल्यासमोर असलेल्या व्यक्तीला आनंद देणं हेच जीवनाचं अंतिम ध्येय आहे.

वर्तमान

आपल्याला हे ही लक्षात घ्यायला हवं की, प्रत्येक व्यक्ती एकसारखा असतो असं नाही. माणूस नेहमीच एका ठराविक परिभाषेत अडकत नाही. तो कधी दयाळू असतो, कधी कठोर, कधी हुशार, तर कधी मूर्ख वाटतो. माणूस एका प्रकारे वागतो, याचा अर्थ तो कायम तसाच राहील असं नाही. माणसं नदीसारखी असतात – त्यांचा प्रवाह कधी जोरात असतो, तर कधी शांत. आपल्या समोर असलेल्या व्यक्तीला एका निश्चित परिभाषेत बसवणं चुकीचं आहे.

हे देखील वाचा: journey of life: जीवनाची सफर कशी अनुभवायला हवी? / How should the journey of life be experienced?

स्वतःला बदला, जगाला बदला

बहुतेक लोकांना असं वाटतं की, त्यांनी इतर लोकांना बदलायला हवं, किंवा जग बदलायला हवं. मात्र, आपण स्वतःला आधी बदलल्याशिवाय इतरांना किंवा जगाला बदलणं शक्य नाही. परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासूनच करायला हवी. आपण आपल्या जीवनात कसा बदल घडवतो, हेच आपल्या समाजातही परिवर्तन घडवू शकतं. स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या चुका सुधारणं, आणि त्यातून इतरांसाठी एक उदाहरण बनणं हेच खऱ्या बदलाचं मर्म आहे.

वर्तमान

जीवनाचं निश्चित उद्दिष्ट ठेवा

जीवन हे सेवा करण्यासाठी आहे. सेवा करणं म्हणजे फक्त इतरांसाठी काहीतरी करणे नव्हे, तर त्यातून आनंद मिळवणे आहे. सेवेतून मिळालेला आनंदच खरा आनंद असतो. मात्र, सेवा करणं सोपं नसतं. त्यात कष्टही आहेत, वेदनाही आहेत, परंतु त्या वेदनांमधूनच खरा आनंद मिळतो.

हे देखील वाचा: consistent progress : तुम्हाला सातत्याने प्रगती साधायची असेल तर इतरांमधला चांगुलपणा आणि स्वतःमधली कमतरता शोधा: सातत्यपूर्ण प्रगतीसाठी या 5 टिप्सवर काम करा

जीवनाला एक निश्चित उद्दिष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आपल्या आयुष्याला फक्त स्वतःसाठी किंवा स्वतःच्या सुखासाठी जगत नाही, तर त्यामागे एक उद्देश असावा लागतो. त्या उद्देशातून आपल्याला आनंद, समाधान आणि खरा जीवनार्थ सापडतो. म्हणूनच, जीवनात एक निश्चित उद्दिष्ट ठेवा आणि त्याद्वारे समाजात आणि आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवा.

या विचारांमधून असं स्पष्ट होतं की, वर्तमान क्षणाचा आनंद घ्या, आपल्या जवळच्या लोकांना महत्त्व द्या, स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा, आणि जीवनात एक उद्दिष्ट ठेवा. जीवनाचं अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आहे, परंतु त्या आधीचं प्रत्येक क्षण आपलं आहे, त्याचा पुरेपूर आनंद घ्या.

– मच्छिंद्र ऐनापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !