जत परिसरातील बातम्या: तिघांना मारहाण करून ३० हजारांचा मुद्देमाल पळविला: अचकनहळ्ळी येथील घटना : गुन्हा दाखल *बंगळूर अपघातातील सहा जणांवर मोरगीत अंत्यसंस्कार *कृषी प्रदर्शन, खिलार जनावरांचे यल्लम्मादेवी यात्रेत प्रदर्शन: सभापती सुजय शिंदे; पशुपालक शेतकरी, यात्रेकरूंना पर्वणी
पवनचक्कीच्या कार्यालयावर चौघा दरोदेखोरांनी काठीने मारहाण करत तिघांना लुटले
जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
अचकनहळ्ळी (ता. जत ) येथे पवनचक्कीच्या कार्यालयावर चौघा दरोदेखोरांनी काठीने मारहाण करत तिघांना लुटले. यामध्ये फिर्यादीसह त्यांचे सहकारी जखमी झाले असून तीस हजारांचे साहित्य चोरून नेले शनिवारी (ता. २१) सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात हरिष जर्नादनराव मसारपू (वय ४४, बसवन बागेवाडी रोड, विजयपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
या मारहाणीत फिर्यादी यांच्यासह त्यांचे सहकारी श्रीनाथ आगाराव भूमपल्ली, गिरीष काशिनाथ चलवाली हे जखमी झालेले आहेत. घटनेनंतर पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी भेट देत तपासाच्या अनुषंगाने तपास अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी व फिर्यादीचे सहकारी हे अचकनहळ्ळी गावातील काम सुरू असलेल्या ठिकाणी पाहणी करीत असताना चौघा अनोळखींनी येथे येऊन त्यांच्या हातातील काठीने फिर्यादी व फिर्यादीचे सहकारी यांना पाठीवर, पायावर, हातावर ठिकठिकाणी मारहाण करून दमदाटी करून वरील वर्णनाचे मोबाईल व रोख रक्क्म चोरून नेली. एक मोबाईल व लॅपटॉप फोडून ३० हजारांचे नुकसान केले आहे. या घटनेची जत पोलिसांत नोंद झाली असून अधिक तपास जत पोलिस करीत आहेत.
बंगळूर अपघातातील सहा जणांवर मोरगीत अंत्यसंस्कार
बंगळूरनजीकच्या अपघातात मरण पावलेल्या सहाजणांवर आज सकाळी मोरबगी (ता. जत) या गावी आणून एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडल्याचे पाहायला मिळाले. बंगळूर नजीक मालवाहू कंटेनर मोटारीवर उलटून शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. कंटेनर मोटारीवर उलटल्याने तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. हा अपघात इतका भीषण होता की, मोटारीमधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बंगळूर येथील नेलमंगळा परिसरात झाला. मृत्यू पावलेले हे एकाच कुटुंबातील आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोरबगी येथील निवासी आहेत.
राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून जणाऱ्या मालवाहू कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर भरधाव कंटेनर हा शेजारून जाणाऱ्या मोटारीवर उलटला. कंटेनर मोटारीवर उलटल्याने तिचा चक्काचूर झाला. मोटारीमधील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सर्वांचा मृतदेह रुग्णवाहिकेमधून मोरबगी त्यांच्या गावी सकाळी आठ वाजता आणण्यात आले.
हे देखील वाचा: nashik crime news: नाशिक: प्रेमप्रकरणातून शिक्षिकेची हत्या: 32 वर्षीय आरोपीस जन्मठेप
कृषी प्रदर्शन, खिलार जनावरांचे यल्लम्मादेवी यात्रेत प्रदर्शन: सभापती सुजय शिंदे; पशुपालक शेतकरी, यात्रेकरूंना पर्वणी
जत: “सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जत येथील यल्लमादेवी यात्रेत कृषी व खिलार जनावरांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध कृषिपूरक स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी, यात्रेकरूंनी भेट द्यावी,” असे आवाहन सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले.
सुजय शिंदे म्हणाले, “यल्लम्मादेवीची यात्रा प्रतिवर्षी मार्गशीर्ष महिन्यात भरविण्यात येते. यंदा २६ ते २८ डिसेंबरदरम्यान ही यात्रा भरत असून ३० रोजी अमावस्या आहे. या दिवशीही मोठी यात्रा असते. यल्लम्मादेवीची यात्रा ही खिलार पशूंसाठी प्रसिद्ध असून यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांतील व्यापारी, जनावरांच्या खरेदीसाठी या यात्रेत येतात. जनावरांच्या खरेदी-विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जनावरांचा बाजार व कृषिप्रदर्शन जत-बिळूर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस भरविण्यात येतो.
जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फतच करण्यात येते. पूर्वी जनावरांच्या बाजारासाठी, यल्लम्मादेवी यात्रेकरिता तत्कालीन जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दीडशे एकर जागा आरक्षित केली होती. मार्गशीर्ष पौर्णिमा ते अमावस्येपर्यंत संबंधितांनी जमिनीतील पिके काढून घेऊन ही जागा यात्रेकरिता सात दिवसांसाठी देण्याचे आहे, असे नमूद केले असतानाही यल्लम्मादेवी यात्रेसाठी आरक्षित केलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे सद्यःस्थितीत जनावरांचा बाजार व कृषिप्रदर्शन भरविण्यात मोठ्या अडचणी येत आहेत, असेही शिंदे यांनी सांगितले.