जतच्या पूर्वभागात खरीप पिकांच्या ६० टक्के पेरण्या; पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूच
आयर्विन टाइम्स / जत
जतच्या पूर्वभागात पेरण्यांचा सपाटा सुरूच असून आतापर्यंत या परिसरात खरीप हंगामातील पिकांच्या ६० टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिरायती पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या माळरानावरील पेरणी झालेल्या पिकासाठी पाऊस अपेक्षित आहे. माळरानावरील पिके पावसाच्या भरवशावर असतात. रोहिणी व मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीस वेग आला होता. दरम्यान, पावसाळ्यात अजूनही माडग्याळसह अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पूर्वभागात मुख्यतः बाजरी, भुईमूग, मूग, मटकी, हुलगा, चवळी ही खरीप हंगामातील पिके माळरानावरही घेतली जातात. माळरानावरील पिकासाठी पेरणी झाल्यानंतर पावसाची गरज असते. रोहिणी व मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी जिरायती माळरानावरील व सपाट जमिनीवर खरीप हंगामातील पेरणी केली आहे.
पेरणी झाल्यानंतर थोडासा पाऊस झाला. मात्र, समाधानकारक पाऊस झाला नाही. आर्द्रा नक्षत्र २१ जूनला आले आहे. या नक्षत्राचा पाऊस थोडाफार झाला आहे.
चार दिवसांपासून या भागात दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू असतो. हवेत प्रचंड उष्णता असते. उन्हामुळे जमीन कोरडी पडते. सध्या या परिसरात ८० टक्के खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. माळरानावरील पिकासाठी सध्या पावसाची गरज आहे. विशेषतः या भागात माळरानावरील जमीन अधिक आहे. शेतकरी खरीप हंगामात पावसाच्या भरवशावर येणारी पिके माळरानावर घेतात. चार दिवसांपासून या भागात ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. त्याचबरोबर वाराही असतो.
सध्या या भागाला खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकासाठी पाऊस होणे अपेक्षित आहे. आर्द्रा नक्षत्राचा मोठा पाऊस या परिसरात झाला नाही. माळरानावरील पिकासाठी सध्या त्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. यासाठी या भागात मोठा पाऊस पडल्यानंतरच पिके झपाट्याने वाढू शकतील.
माडग्याळ आणि परिसरातील गावांना ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ग्रामस्थांना अजूनही पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. मोठा पाऊस पडून व्हसपेट तलाव भरल्यानंतर माडग्याळचा नळ पाणीपुरवठा सुरू होणार आहे. तोपर्यंत टँकरचाच आधार घ्यावा लागणार आहे.
जत – कोळगिरी बस सुरु करा; ग्रामस्थांनी दिले आगारप्रमुखांना मागण्यांचे निवेदन
जत तालुक्यातील कोळगिरी येथे बससेवा नसल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. जतहून निगडी खुर्द, कोळगिरीमार्गे उमदी तसेच जतहून कोळगिरीमार्गे संख बससेवा सुरु करण्याची मागणी कोळगिरी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे..
या दोन मार्गे बसेस सुरू करण्याचा ठराव ग्रामपंचायत सदस्या करुणा बाबर यांनी मांडला. सदस्य वसंत कांबळे यांनी अनुमोदन दिले आहे. मंजूर ठराव सरपंच मल्लवा हेळवी व ग्रामसेवक डी. एम. साळे यांनी जत आगार विभागाला पाठवला. यासंदर्भात करुणा बाबर यांच्यासह ग्रामस्थांनी आ. विक्रम सावंत यांची भेट घेत जतहून उमदीकडे जाणारी एक बस सकाळी दहाच्या सुमारास निगडी खुर्द, काराजनगी, कोळगिरी, सनमडी, माडग्याळमार्गे सोडावी तसेच जतहून संखला जाणाऱ्या बसेस वळसंगहून सोर्डीमार्गे संखला जातात.
कोळगिरी येथून संखला जाण्यासाठी बस नाही. तेव्हा संखला जाणारी किमान एक बस वळसंग, कोळगिरीमार्गे सोर्डी संखला सोडावी. या दोन्ही बसेस सुरू झाल्यास त्याचा फायदा ग्रामस्थांना, निगडी खुर्द व संखला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. जत आगाराच्या उत्पन्नातही भर पडणार आहे. या दोन्ही बसेस तात्काळ सुरु कराव्यात, अशी मागणी करुणा बाबर यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.
वाळेखिंडीत अपूर्वा फौंडेशनला वृक्षारोपण
जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील अपूर्वा फौंडेशनने गावामध्ये वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. वाळेखिंडी येथे हजारोंच्या संख्येने झाडे लावली जात आहेत. वृक्षारोपणाच्या अपूर्वाच्या या मोहिमेला भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मणगौडा रविपाटील यांनी हातभार लावला आहे. त्यांनी एक लाख रुपयाची देणगी वृक्षारोपण मोहिमेसाठी दिली आहे.
देणगीतून वाळेखिंडी येथील खंडोबा मंदिर व अन्य परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यावेळी जतचे प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे, तहसिलदार जीवन बनसोडे, बबन कोडग, राम कोडग, विठ्ठल शिंदे, आप्पासो विसापूरे, अतुल गुजले यांच्यासह श्री सिद्धनाथ हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.
हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 28 जून: मेष, वृषभ या 4 राशीच्या लोकांना शुक्रवारी आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या बाकीच्या लोकांनीही आजचं राशिभविष्य
अधिकारी उदय कुसुरकर, पोलीस निरीक्षक सूरज बिजली, वन अधिकारी प्रवीण पाटील, वाळेखिंडीच्या सरपंच वसुधा हिंगमिरे, उपसरपंच सतीश शिंदे, माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे, अपूर्वा फौंडेशन सदस्य तात्यासो शिंदे, संजय अण्णा शिंदे, सखाराम पोळ, गणेश इनामदार, किरण इतापे, किसन माने, अनिल शिंदे उपस्थित होते. अपूर्वा फौंडेशनचा हा आदर्श तालुक्यातील प्रत्येक गावातील सामाजिक संस्थेने घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे यांनी यावेळी बोलताना केले.
पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. भविष्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले, तर झाडांची आठवण येईल पण आज ती झाडे लावली, जगवली तर भविष्यात पर्यावरण तर व्यवस्थित राहिलच, आपलेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे. वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून वाळेखिंडीतील अपूर्वा फौंडेशनची टीम काम करत आह