जत तालुक्यातील महाडिकवाडी येथे ७७ वर्षीय वृद्धेला संजय गांधी निराधार पेन्शन योजना मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत पाच जणांनी बनावट दस्त तयार करून २० लाखांची जमीन फसवून विकली. आरोपींविरुद्ध जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. तपास सुरू.

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
महाडिकवाडी (शेगाव, ता. जत) येथे एका वृद्धेला पेन्शन योजनेचे आमिष दाखवत तब्बल २० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आक्काताई श्रीमंत महाडिक (वय ७७) या आजारी वृद्धेला संजय गांधी निराधार पेन्शन योजना मंजूर करून देतो असे सांगत पाच जणांनी विश्वासात घेतले आणि अखेर तिच्या जमिनीची खरेदीचा बनावट दस्त तयार करून विक्री केली.

ही घटना २ जुलै रोजी सकाळी ११ ते ३ जुलै सायंकाळी ४ वाजेपर्यंत घडली. वृद्धेला काहीही कल्पना नाही, अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आरोपकत्र्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात तिचा अंगठा घेऊन बनावट दस्त तयार केला. जमीन विक्रीतून मिळालेली २० लाखांची रक्कम आरोपींनी परस्पर वाटून घेतली, असे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.

जत तालुक्यातील शेगाव

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी जत पोलिस ठाण्यात खालील पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे—

  • अनिल रावसो नलवडे
  • जालिंदर बापू नलवडे
  • सागर जालिंदर नलवडे
  • अविनाश सोपान महाडिक
  • अतुल सोपान महाडिक
    (सर्व महाडिकवाडी, शेगाव)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धेची शारीरिक अडचण आणि आजारपण पाहून या संशयितांनी तिचा विश्वास संपादन केला. पेन्शन योजना मंजूर होईल असे सांगून तिला कागदपत्रांवर अंगठा द्यायला भाग पाडले. त्यानंतर बनावट दस्त तयार करून जमीन विक्रीची पूर्ण प्रक्रिया पार पडली.

पोलिस तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वृद्धेची फसवणूक झाल्याने परिसरात संतापाचे वातावरण असून, या गुन्ह्यातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेदेखील वाचा: संखची कन्या श्रेया हिप्परगी राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी 17 वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघात निवड – जत तालुक्याचा अभिमान!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *