जत

जत तालुक्यातील युवकावर अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

कवठेमहांकाळ, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर चोरोची गावाजवळ ग्रामपंचायत चौकात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सोपान बाबा यमगर जखमी झाले. तसेच दुचाकीचे सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेप्रकरणी पृथ्वीराज पंडित पाटील (वय २४, भिवर्गी, ता. जत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, चारचाकी (एमएच १०-बीए-८६७६) भरधाव वेगाने चालवत असताना रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष झाले. अपघातानंतर राजाराम सुबराव यमगर (चोरोची) यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

हे देखील वाचा: Solapur crime news: 35 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्याची बीडीओला मारहाण: नोकरीवरून काढल्याचा राग मनात धरला; कंत्राटी कर्मचारी मूळचा सांगली जिल्ह्यातला…

 आमदार पडळकरांचा अपेक्षाभंग

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सांगली जिल्ह्यातील तसेच जतमधील नेत्यांचा अपेक्षाभंग झाल्याचे चित्र दिसून आले. सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांना डच्चू देण्यात आला, तर जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजी व्यक्त होत आहे.
सांगली जिल्ह्यात महायुतीचे पाच आमदार आहेत, परंतु त्यापैकी कोणालाही मंत्रिपद मिळाले नाही. सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, आणि सुधीर गाडगीळ यांची नावे चर्चेत होती, मात्र कोणालाही संधी न मिळाल्याने या सगळ्यांचाच अपेक्षाभंग झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांच्यासंदर्भात सांगितले की, “पडळकर आक्रमक आहेत; मात्र संयम ठेवणे गरजेचे आहे. त्यांच्या पुढे चांगले राजकीय भविष्य आहे.”

जत

जत येथील विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जत यांच्या वतीने विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ८८ उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक सादरीकरणे केली.
या मेळाव्याचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी अन्सर शेख यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. एस. माळी उपस्थित होत्या. मुख्याध्यापक एम. एल. बनसोडे आणि उपमुख्याध्यापक के. टी. करे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

हे देखील वाचा: Tasgaon crime news: वायफळे खून प्रकरण : 24 तासांत मुख्य आरोपीला पुण्यातून केली अटक; सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण, तासगाव पोलिसांची कारवाई

विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील प्रयोग, तसेच घरगुती व टाकाऊ साहित्याचा वापर करून नाविन्यपूर्ण सादरीकरण केले. यावेळी अन्सर शेख म्हणाले, “विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे.” मुख्याध्यापक एम. एल. बनसोडे म्हणाले, “ग्रामीण भागातील तरुण शास्त्रज्ञ तयार होण्यासाठी असे विज्ञान मेळावे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देतात.”

जत

गिरगाव सरपंच पद अपात्र: गिरगावच्या सरपंचांना अतिक्रमणाचा फटका: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचा निर्णय

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
गिरगाव येथील सरपंच गोपाल श्रीशैल कुंभार यांना ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेत अनधिकृतपणे घर बांधल्याचे सिद्ध झाल्याने अपात्र घोषित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १४ (१) (ज-३) व १६ (२) अंतर्गत दिलेल्या निकालानुसार कुंभार यांना सरपंच पदावरून अपात्र ठरवले आहे.

ही कारवाई भिराप्पा हूवाण्णा मदने यांच्या तक्रारीवरून करण्यात आली. तक्रारीसोबत सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ६ डिसेंबर २०२४ पासून सरपंच पद रिक्त असल्याचे जाहीर करण्यात आले असून याबाबतची प्रत संबंधित पक्षांना देण्यात आली आहे.

ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच कुंभार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. याआधी मुख्य चौकातील वृक्षतोड प्रकरणामुळे देखील कुंभार यांच्यावर वन विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. अपात्रतेचा निर्णय हा ग्रामपंचायतीसाठी महत्त्वाचा ठरला असून गावात नवीन निवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे.

जत

जत आगारात एसटी फेऱ्यांचा तुटवडा: एसटी प्रवाशांची वाढलेली मागणी;  आगारातील वेळापत्रक कोलमडले

जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
एसटी महामंडळाच्या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी आगारातील बस फेऱ्यांचा तुटवडा प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जत-उमदीमार्गे अक्कलकोट आणि सोलापूर मार्गांवरील फेऱ्या अपुऱ्या असल्याने प्रवाशांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

हे देखील वाचा: Tragic incident : बलात्कारप्रकरणी अटक असलेल्या आरोपीने जामिनावर सुटताच पीडितेची केली हत्या; 32 वर्षीय आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकले

दुपारी तीननंतर जत-सोलापूर मार्गावर कोणतीही बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रवाशांच्या तक्रारींनंतरही आगार प्रशासनाकडून कोणतीही सुधारणा होत नसल्याने खासगी वाहतूकदारांचा गैरफायदा होत आहे, तसेच शासनाचा महसूल बुडत आहे.

जत व गुड्डापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या दुपारी दीड वाजता निघणाऱ्या उमरगा व अक्कलकोट या फेऱ्या बंद असल्याने प्रवासी अडचणीत आहेत. यामुळे प्रवासी संख्येच्या तुलनेत एसटी फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे.

 डाळिंबाला भरघोस दर: डाळिंबाला प्रतिकिलो १२५ रुपये; शेतकरी समाधानी

तालुक्यातील पूर्व भागात डाळिंब पिकाला सरासरी १२३ ते १२५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. काही आठवड्यांपूर्वी डाळिंबाचे दर घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता होती, मात्र सध्याच्या दरवाढीमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे.

डाळिंब हे कमी पाणी व खर्चात अधिक उत्पादन देणारे नगदी पीक असल्याने तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पिकाकडे वळले आहेत. ठिबक सिंचन, शेततळे आणि कूपनलिकांचा वापर करून डाळिंब उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. डाळिंबाला चांगले बाजार मिळाल्याने भागातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान व जातींचा अवलंब केला आहे. सध्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात डाळिंब विक्रीसाठी येत आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !