रेवनाळ येथील ( ता. जत) लोखंडे कुटुंबाला मदत देण्याची मागणी
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील रेवनाळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात वीस मेंढ्या, तर चार कोकरे मृत्युमुखी पडली आहेत. या घटनेत सोपान लोखंडे यांच्या परिवाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोमवारी पहाटे ही घटना घडली. मेंढ्या ओरडण्याचा आवाज येताना लोखंडेंसह कुटुंबीय जागे झाले. त्यानंतर लांडग्याच्या कळपाने तेथून धूम ठोकली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी करून पंचनामा केला. या परिवाराला तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
अधिक माहिती अशी की, सोपान लोखंडे हे शेतीसह जोडधंदा म्हणून मेंढपाळ व्यवसाय करतात. लोखंडे हे घरामध्ये झोपलेले असताना सोमवारी (दि. ३०) पहाटे
चारच्या सुमारास लांडग्याच्या कळपाने घराच्या शेजारी उभारण्यात आलेल्या मेंढ्याच्या वाखरीत हल्ला चढविला. या हल्ल्यात २० मोठ्या मेंढ्या व चार लहान कोकरे यांचा जागीच मृत्यू झाला. मेंढ्यांच्या ओरडण्याचा आवाज येत असल्याने लोखंडे परिवार जागा झाला. त्यानंतर लांडग्याच्या कळपाने तेथून धूम ठोकली.
हे देखील वाचा: Kidnapping news : खंडणीसाठी अपहरण आणि लुट : पोलिसांनी 5 जणांचा कट उधळला
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी रेवनाळ येथे जाऊन लोखंडे परिवाराची भेट घेतली. त्यांना प्रकाशराव जमदाडे यूथ फाउंडेशनकडून ११ हजार रुपयांची मदत केली. शासन व प्रशासनाकडे पाठपुरावा करून लोखंडे परिवाराला तत्काळ नुकसानभरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हा बँक संचालक प्रकाश जमदाडे यांनी दिली.
जत नगरपरिषदेसमोर जागर फाउंडेशनचे स्वच्छतेसाठी आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
जत शहरात नगरपरिषदेकडून नियमित फवारणी होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. घंटागाडी वेळेवर येत नाही. कचरा डेपोमध्ये प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छतेसाठी नगरपरिषदेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जागर फाउंडेशनच्या वतीने शहरातील कचरा टाकून, मच्छरदाणी लावून लक्षवेधी आंदोलन केले.
यावेळी जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, अरुण साळे, योगेश ऐडके, शशिकांत इंगवले, मच्छिंद्र कांबळे, राम भोसले आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी लवकरच जत शहरातील स्वच्छतेसंदर्भात प्रश्न मार्गी लावू, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी जागर फाउंडेशनचे अध्यक्ष परशुराम मोरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जत शहरात मोठ्या प्रमाणत साथीचे आजार पसरत आहेत. तसेच शहरामध्ये घंटागाडी वेळेवर येत नाहीत. तसेच कचरा डेपोमध्ये दुर्गंधी पसरत आहे आणि कचरा डेपोमध्ये स्वच्छता नाही. शहरामध्ये पूर्णपणे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. यामध्ये हिवताप, गोचीड ताप, मलेरिया, टायफॉईड व काही रुग्ण डेंगीचेही आढळून आले आहेत.
शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये व बाल रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात मलेरिया, टायफॉईड आणि गोचीड तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता जत नगरपरिषद प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कार्यवाही व्हावी. डास मारणाऱ्या औषधांची फवारणी करून घेण्यात यावी. दूषित पाण्यामुळे लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी. शहरात सगळीकडे २४ तास डास आढळून येत आहेत. डेंगीमुळे महाराष्ट्रामध्ये अनेक रुग्ण दगावले आहेत.
या डासांमुळे लहान मुले, ज्येष्ठ कोणीही सुटले नाही. जत शहरांतील नगरवासीयांचे आरोग्य धोक्यात आहे, यासाठी नगरपरिषदचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले.