जत

जतचे पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी कुंभारीला दिली भेट ; टोळीने ठोकली धूम

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील कुंभारी येथे किरकोळ कारणातून एका कुख्यात गुंडाच्या टोळीकडून पान टपरीवाल्याला मारहाण करून व गावठी बंदुकीचा धाक दाखवून दहशत माजविण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे ग्रामस्थांनी तब्बल दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखला. त्या टोळीला तत्काळ अटक करा, अशी मागणी करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. यामुळे कुंभारीसह परिसरात मोठी खळबळ माजली होती. दरम्यान, जतचे पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी कुंभारी येथे भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला व त्या टोळीवर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

जत

मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास एक जिल्ह्यातील कुख्यात गुंडाच्या टोळीने येथील कुंभारी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पान टपरीमध्ये खरेदी केल्यानंतर चालकाने पैशांची मागणी केली. त्यावर मला ओळखत नाहीस का, पैसे देत नाही, असे म्हणत त्याला बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली. या घटनेनंतर टोळीने तेथून पळ काढला. या घटनेने संतप्त ग्रामस्थांनी टोळीवर कारवाई करण्यासाठी दोन तास राष्ट्रीय महामार्ग रोखला. यामुळे कुंभारी गावापासून दूरपर्यंत वाहनांची रांग लागली होती.

” कुंभारी येथे पानटपरीचालकास मारहाण करत गावठी बंदुकीचा धाक दाखवून टोळी बहाद्दर पळून गेला आहे. त्याच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल. – सुनील साळुंखे, पोलिस उपाधीक्षक, जत

हे देखील वाचा: Shravan mass / श्रावण मास : येत्या 5 ऑगस्टपासून सुरू होतोय श्रावण मास; जाणून घ्या श्रावण मासात कशी करतात पूजा ?

जतला सरकारी कामात अडथळा प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल; राष्ट्रीय लोकअदालतीदिवशीची घटना

राष्ट्रीय लोकअदालतीदिवशी जत येथील न्यायाधीशांसमोरच पोलिस उपनिरीक्षकांना सरकारी कामापासून रोखण्याचा प्रयत्न करत शिवीगाळ करून धमकी दिल्याने जत येथील एका वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. ॲड. अण्णाराया रेवूर असे त्या वकिलाचे नाव आहे. याबाबतची उमदी ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण पांडुरंग खरात यांनी जत पोलिसांत फिर्याद दिली आहे. रेवूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शनिवारी (ता. २७) राष्ट्रीय लोकअदालतीदिवशी पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात हे सहायक निरीक्षक संदीप कांबळे यांच्या आदेशाने एका गुन्ह्यातील अटक असलेल्या आरोपीच्या रिमांडसाठी प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी यांच्या दालनात आले होते. यावेळी संबंधित वकिलाचा प्रतिवादही झाला होता. यावेळी तपास अधिकाऱ्यांच्या वतीने पोलिस उपनिरीक्षक खरात न्यायालयासमोर बाजू मांडत असताना न्यायालयात अॅड. अण्णाराव रेवूर समोर आले.

हे देखील वाचा: Crime News : सांगलीच्या 21 वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून पुणे जिल्ह्यात खून; आरोपीला अटक; खून करणारा संशयित आरोपीदेखील सांगली जिल्ह्यातील

यावेळी रेवूर यांनी काहीही संबंध नसताना, ‘झालं तुमचं, बाहेर जावा,’ अशी आरडाओरड केली. तेव्हा खरात यांनी, ‘या गुन्ह्याचा वकील म्हणून तुमचा संबंध नाही. याबाबत दुसरे कवठेमहांकाळचे वकील आहेत. ते या ठिकाणी हजर आहेत,’ असे सांगितले. रेवूर यांनी खरात यांना, ‘तुझी नोकरी घालवीन, सस्पेंड करेन,’ असे मोठमोठ्याने बोलत शिवीगाळ केली व सरकारी कामापासून रोखण्याचा प्रयत्न करत, ‘नीट राहा, नाहीतर तुला बघून घेतो, गेट बाहेर चल, तुझी बॉडी देखील मिळू देत नाही,’ अशी धमकी दिली. दरम्यानच्या कालावधीमध्ये न्यायाधीशांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरडाओरड करत हेडकॉन्स्टेबल भिसे यांना देखील शिवीगाळ करत धमकी दिली.

हा प्रकार न्यायालयाच्या दालनात घडलेला असल्याने पोलिस उपनिरीक्षक खरात यांनी पोलिसांत तक्रार न देता न्यायालयात तक्रार अर्ज दिला होता. अर्जास अनुसरून न्यायालयाने सोमवारी (ता. २९) गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिला. या आदेशाला सरकारी कामापासून रोखण्याचा प्रयत्न, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केल्याप्रकरणी रेवूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

जत
कर्नाटक भवनच्या उद्घाटनाचा गुड्डापूरला उद्या कार्यक्रम; मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार उपस्थित राहणार

जत तालुक्यातील श्रीक्षेत्र गुड्डापूर येथे श्री दानम्मा देवस्थान ट्रस्टतर्फे बांधण्यात आलेल्या कर्नाटक भवनाचे उद्घाटन गुरुवारी (१ ऑगस्ट) होणार असल्याची माहिती अध्यक्ष विजूगौडा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाटील म्हणाले, “गुड्डापूर (ता. जत) येथे भव्य कर्नाटक भवन बांधले आहे. काम पूर्ण झाले असून या त्याचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, मजुराई व वाहतूक मंत्री रामलिंग रेड्डी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी शिवयोगी डॉ. मुरघाराजेंद्र महास्वामी (मुघळकोड), जड शांतलिंगेश्वर महास्वामी (दुधनी, जि. सोलापूर), अवधूत श्री. विनय गुरुजी, श्री दत्त आश्रम स्वर्ण (पीटकपूर, गौरगदे, ता. कोप्प, जि. चिकमंगळूर), डॉ. महादेव शिवाचार्य स्वामी (बबलेश्वर), गुरुपाद शिवाचार्य स्वामी (गुड्डापूर), डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी ( गौडगाव) यांचे दिव्य सान्निध्य व उपस्थिती राहणार आहे. जतचे आमदार विक्रम सावंत अध्यक्षस्थानी आहेत.

हे देखील वाचा: consistent progress : तुम्हाला सातत्याने प्रगती साधायची असेल तर इतरांमधला चांगुलपणा आणि स्वतःमधली कमतरता शोधा: सातत्यपूर्ण प्रगतीसाठी या 5 टिप्सवर काम करा

कामगार मंत्री सुरेश खाडे, कर्नाटकातील निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, कर्नाटकचे वस्त्रोद्योग व साखर विकास मंत्री शिवानंद पाटील, कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बालकर, सांगलीचे खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, विजयपूरचे खासदार रमेश जिगजिनगी यांच्यासह कर्नाटकातील खासदार, आमदारांसह सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, विजयपूरचे जिल्हाधिकारी टी. भूभालन, सांगलीचे पोलिस अधिक्षक संदीप घुगे या कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री दानम्मा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी, सदाशिव गुड्डोडगी, शंभूलिंग ममदापूर, धनाप्पा पुजारी, मल्लिकार्जुन गुड्डापूर, सागर चंपणवर व सचिव विठ्ठल पुजारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *