सुधारण्याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने जत तालुक्यातील उमदी येथील लिपिकावर निलंबनाची कारवाई
आयर्विन टाइम्स / जत
सांगली जिल्हा बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ग्राहकांशी उद्धट वर्तणुक केल्याप्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमदी शाखेतील वादग्रस्त लिपिक साबू पावडी करजगी यांच्यावर बँक प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली. लिपिक करजगी हे नवीन भरतीमधील कर्मचारी आहेत. त्यांची बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांशी चांगली वागणूक नाही. ग्राहकांनाही ते व्यवस्थित सेवा देत नसल्याच्या तक्रारी बँक व्यवस्थापनाकडे आल्या होत्या. याबाबत वारंवार सूचना देऊनही त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल झाला नसल्याने बँक प्रशासनाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कामावर असताना फिरायला गेल्याप्रकरणीही बँकेने त्यांच्यावर कारवाई केली होती.
याबाबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ म्हणाले की, संबंधित करजगी यांना सुधारण्याबाबत वारंवार सूचना दिल्या होत्या, तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने बँकेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शाखेतील तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची वर्तणुक चांगली नव्हती. चुकीच्या पद्धतीने आणि बँकेची शिस्त मोडल्याप्रकरणी कारवाई केली आहे. यापुढे बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांने अशा पद्धतीने वागणूक केल्यास कडक कारवाई केली जाईल.
जत तालुक्यातील १.४१ लाख शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा
अनियमित हवामानामुळे पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडल्याने पीक विमा योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारची केवळ एक रुपयात विमा योजना आहे. या योजनेत जिल्ह्यातील तब्बल ३ लाख ६० हजार ४८१ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक १ लाख ४१ हजार जणांचा समावेश आहे. सोयाबीनसाठी सर्वाधिक ७४ हजार ७७९ शेतकरी आहे. पीकविमा घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीस वाढ झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी सांगितले.
लहरी हवामान, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीला सातत्याने फटका बसत आहे. वेळोवेळी होणाऱ्या पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेली पिकेही वाया जातात. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यात सात-बाराधारक शेतकऱ्यांची संख्या साडेपाच लाखांच्या घरात आहेत. यापैकी ३ लाख ६० हजार ४८१ शेतकऱ्यांनी विमा उतरला आहे. आटपाडी तालुक्यातील १८ हजार ४८१ शेतकरी, जत १ लाख ४१ हजार ८९२, कडेगाव २८ हजार ४५२, कवठेमहांकाळ ३३ हजार ५४४, खानापूर २४ हजार ४७७, मिरज २८ हजार ४२९, पलूस ३ हजार ९३६, शिराळा ८ हजार ९२० तासगाव ४८ हजार ४४६ आणि वाळवा तालुक्यातील १८ हजार ९०४ शेतकऱ्यांनी विमा उतरला आहे. जिल्ह्यात सोयाबीन ७४ हजार ७७० एकर, भुईमूग ६१ हजार ५१६, मका ५३ हजार ९७६ एकरावरील पिकांचा समावेश आहे.
विमा योजनेत समाविष्ट पिकांमध्ये खरिपातील ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, कापूस या सात पिकांसाठी अधिसूचित लागवड करणारे सर्व कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकरी पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. ज्वारी पिकासाठी २७ हजार रुपये, भुईमूग पिकासाठी ३८ हजार रुपये, सोयाबीन पिकासाठी ४९ हजार रुपये, पिक, विमा योजना मूग २० हजार रुपये, उडीद २० हजार रुपये, तूर ३५ हजार रुपये व कापूस ५२ हजार रुपये विमा संरक्षित रक्कम हेक्टर असणार आहे.
संजय गांधी योजनेतून जतमध्ये १४२२ जणांना लाभ: प्रमोद सावंत
पाच-सहा महिन्यांत आत्तपर्यंत एक हजार ४२२ लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेतून प्रत्येकी १५०० रुपये इतका लाभ मिळवून देण्यात आल्याची माहिती योजनेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी दिली. जत येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक पार पडली. बैठकीला अध्यक्ष प्रमोद सावंत, सदस्य राजकुमार चौगुले, कुंडलिक दुधाळ, अंकुश हुवळे, निवृत्ती शिंदे, संतोष मोटे, सुनील छत्रे, संगीता लेंगरे, तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार धोडमाळ व ऑफिस कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या बैठकीमध्ये १६४, दुसऱ्या बैठकीमध्ये १८८, तिसऱ्या बैठकीमध्ये २५९ व चौथा बैठकीमध्ये ४९४, पाचव्या बैठकीमध्ये १५०, तर आज झालेल्या सहाव्या बैठकीमध्ये १६ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. याप्रमाणे आजअखेर समिती गठित झाल्यापासून १४२२ लाभार्थीना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्रत्येकी १५०० रुपये इतका लाभ मिळाला आहे. अध्यक्ष म्हणून जत तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थीना आव्हान करू इच्छितो की, आपण रीतसर प्रस्ताव तहसील कार्यालयात सादर करावेत. कोणत्याही आमिषाला बळी पडून पैसे देऊ नयेत. एजंट लाभार्थीकडून पैसे घेत असल्याची चर्चा आहे. तरी सर्व पात्र लाभार्थीनी थेट तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा व विनामोबदला हा लाभ घ्यावा.