जत तालुक्यातील उमदी येथील शाळेत ८० विद्यार्थ्यांना एकच शिक्षक
आयर्विन टाइम्स / जत
शिक्षकांची रिक्त पदे भरा व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, या मागणीसाठी उमदी (ता. जत) येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला कुलूप लावले. जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही, तोपर्यंत शाळा सुरू करू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्नड क्रमांक पाच शाळेला पालकांनी व ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. जिल्हा परिषद शाळा सुरू होऊन महिना झाला, तोपर्यंत शिक्षकांच्या रिक्त जागांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या जोपर्यंत भरण्यात येत नाहीत. तोपर्यंत शाळा भरू देणार नाही, असा इशारा उमदी ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असून जून महिन्यापासून एकच शिक्षक चार वर्ग चालवतात. तेही एक महिला शिक्षक आहेत. उमदी पूर्वभागात गट शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून केंद्रप्रमुख याकडे लक्ष देत नाहीत, अशी तक्रार येथील पालकांनी केली आहे. उमदी गावातील पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे शाळेत दाखल ८० विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचोनुकसान होत आहे. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.
‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी संख येथे उद्या ‘रास्ता रोको’ : तुकाराम महाराज
माडग्याळ येथे म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे. ते व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात सोडावे, या मागणीसाठी संख (ता. जत) येथे सोमवारपासून (ता. २२) ‘रक्त घ्या, पण पाणी द्या’ आंदोलन, बेमुदत उपोषणासह ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे,’ अशी माहिती संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे प्रमुख, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिली.
तुकाराम महाराज म्हणाले, “वर्षानुवर्षे दुष्काळाशी करणाऱ्या जत पूर्व भागातील माडग्याळ येथे म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे. हे पाणी व्हसपेठ, गुड्डापूर, संख, अंकलगी तलावात पोहोचू शकते. या मागणीसाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात बेमुदत उपोषण केले त्या वेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे नऊ जानेवारीला अंकलगी येथे आले.
येत्या सहा महिन्यांत अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही. त्यामुळे संख येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन, ‘रक्त घ्या, पण पाणी द्या’ अशी मागणी पुन्हा एकदा करत रस्त्यावरच रक्तदान करणार आहे. तरी या आंदोलनासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
जिल्हा बँकेत सरदार पाटील यांचा राजीनामा मंजूर; काँग्रेसकडून नाव आल्यास नवीन संचालकाची निवड
जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक सरदार पाटील यांचा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत आज मंजूर करण्यात आला. त्यांच्या रिक्त जागेसाठी काँग्रेसकडून अद्याप नाव आलेले नाही. नवीन नाव आल्यानंतर स्वीकृत संचालकाची निवड होईल, अशी माहिती बँक अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी आज दिली.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष आमदार श्री. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत स्वीकृत संचालकासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जिल्हा बँकेत दोन स्वीकृत संचालक घेतले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी एक संचालक पद आहे. राष्ट्रवादीचे मनोज शिंदे- म्हैसाळकर, तर काँग्रसचे जत तालुक्यातील सरदार पाटील संचालक आहेत.
हे देखील वाचा: Sangli Crime : सांगली जिल्ह्यात कर्नाटकच्या सराईत चोरट्याकडून 90 हजारांचे दागिने हस्तगत ; एका सराफी दुकानात केली होती चोरी
काँग्रेसचे सरदार पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपचे काम केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी नूतन खासदार विशाल पाटील यांची मागणी होती. जतचे आमदार विक्रम सावंत यांनी सरदार पाटील यांना राजीनामा देण्याची सूचना दिली होती. त्यानुसार सरदार पाटील यांनी जिल्हा बँकेकडे राजीनामा दिला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत स्वीकृत संचालक पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यांच्या रिक्त झालेल्या जागी काँग्रेसकडून नाव सुचवले जाणार आहे.
त्यामुळे त्यांच्याकडून नाव आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन स्वीकृत संचालकाची निवड केली जाईल, असे बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांनी सांगितले.
दरम्यान, स्वीकृत संचालक पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. खासदार विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत हे कुणाची निवड करायची, याबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे रिक्त जागी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे.