ग्रामसेवक

सांगली, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
ग्रामपंचायत कार्यालय आळते, ता. तासगाव येथे कार्यरत असलेल्या ग्रामसेवककडून लाच मागणी केल्याची तक्रार प्रत्यक्ष पडताळणीद्वारे सिद्ध ठरवून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली युनिटने सापळा रचत यशस्वी कारवाई केली आहे. यामध्ये ग्रामसेवक आलिम यासीन मुजावर (वय 38) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

ग्रामसेवक

तक्रारीचा तपशील
तक्रारदार हे 50 वर्षीय शेतकरी असून, त्यांच्या वडिलांच्या नावावर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर सिंचन प्रकल्प मंजूर झाला होता. या प्रकल्पासाठी प्राथमिक मागणी प्रस्ताव पाठविल्यानंतर, पुढील कार्यारंभ आदेश व मस्टर मागणीसाठी तसेच संपूर्ण प्रकल्पात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक आलिम मुजावर यांनी 5000 रुपये लाच मागितल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवली होती.

हेदेखील वाचा: sangli crime news: संजयनगर पोलिसांची जलद कारवाई : दोन अपहृत बालकांचा 12 तासांत तपास लावून सुखरूप पालकांचे केले स्वाधीन

पडताळणी व सापळा
सदर तक्रारीची पडताळणी दिनांक 19 जून 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय आळते परिसरात करण्यात आली. यावेळी पंचासमक्ष आरोपी ग्रामसेवक मुजावर यांनी तडजोडीअंती 4000 रुपयांची लाच मागणी केली आणि लाच स्वीकारण्याचे मान्य केले.

यानंतर त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत आरोपी मुजावर यांना 4000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. पंचांच्या उपस्थितीत ही रक्कम आरोपीकडून हस्तगत करण्यात आली.

झडतीत सापडलेली सामग्री
आरोपीच्या अंग झडतीत लाच रक्कम 4000 रुपये, मोबाईल फोन आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आरोपीच्या घराची झडती घेण्यासाठी तासगाव येथे विशेष पथक रवाना करण्यात आले असून झडतीची प्रक्रिया सुरू आहे.

गुन्हा दाखल व पुढील तपास
आरोपी ग्रामसेवकाविरुद्ध तासगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांना अटक करून पुढील तपास करण्यात येत आहे. आरोपीचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला असून त्याचा तपास केला जाणार आहे.

ग्रामसेवक

प्रशासनाचे मार्गदर्शन व पथक
ही सापळा कारवाई पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना पो. ना. प्रीतम चौगुले, पो. शी. अजित पाटील व चालक पो. शी. रजपूत यांनी सहकार्य केले. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शिरीष सरदेशपांडे (ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र) व अपर पोलीस अधीक्षक श्री. विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पर्यवेक्षण अधिकारी श्री. अनिल कटके (पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. सांगली) यांनीही या कारवाईवर लक्ष ठेवले.

नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगली यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाकरिता लाचेची मागणी केल्यास तात्काळ 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा खालील ईमेलवर माहिती द्यावी:
📧 dyspacbsangali@gmail.com](mailto:dyspacbsangali@gmail.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *