Table of Contents

आयर्विन टाइम्स / सातारा

गुन्हेगारी वृत्त: मूळ कोपर्डे (ता. सातारा, हल्ली नाशिक) येथील एका युवकाशी प्रेमविवाह केलेल्या व परत माहेरी आलेल्या विवाहित मुलीने तांदूळवाडी (ता. कोरेगाव) येथील वडिलांच्या घरातील दोन लाख ९५ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन निघून जाऊन फसवणूक केली आहे. याबाबत संजय बाळकृष्ण मुंढे (वय ४८, रा. तांदूळवाडी, ता. कोरेगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

संजय बाळकृष्ण मुंढे तक्रारीत म्हटले आहे, की माझी मुलगी दिव्या संजय मुंढे (सासरचे नाव दिव्या अमोल कदम, रा. कोपर्डे, ता. सातारा, हल्ली नाशिक) हिने १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पळून जाऊन अमोल हणमंत कदम यांच्याशी लग्न केले. तेव्हापासून ती परत माहेरी आलेली नव्हती. मात्र, मध्यंतरी दिव्याने प्रशांत गायकवाड यांच्या मोबाईल फोनवरून मला कॉन्फरन्स कॉलवर घेतले व म्हणाली, की मला पती अमोल हणमंत कदम यांच्याबरोबर राहायचे नाही, मला घेऊन जा.

हे देखील वाचा:  Murder of husband: चुलत दिराशी प्रेमसंबंध; अडथळा असलेल्या पतीचा केला गेम; अपघाताचा केलेला बनाव पोलिसांनी केला उघड  

त्यानंतर मी प्रशांत गायकवाड यांच्यासह १६ जून २०२४ रोजी नाशिक येथे जाऊन १७ जून रोजी दिव्याला तांदूळवाडीत घेऊन आलो. या दरम्यान दिव्याने मला अमोल हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्यासह मला राहायचे नाही. मला इथे ठेवून घ्या. अमोलकडून मला सोडचिठ्ठी घ्यायची आहे. त्यासाठी पोलिस ठाण्यात तक्रार करायला हवी, वगैरे सांगून माझा विश्वास संपादन केला.

२१ जून रोजी रात्री नऊ वाजता दिव्याने घरातील लोखंडी कपाटातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, प्रत्येकी एक एक तोळे वजनाच्या सोन्याच्या चार
बांगड्या, एक तोळे वजनाची पिळ्याची अंगठी व रोख रक्कम दोन लाख ९५ हजार रुपये असा एकूण सहा लाख ९५ हजार रुपये किमतीचा ऐवज माझ्या समक्ष कापडी पिशवीत भरला. त्यानंतर पती अमोल कदम, चुलत दीर सागर प्रशांत कदम यांच्यासमवेत दुचाकीवरून निघून जाऊन माझी फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे. अधिक तपास कोरेगाव पोलिस ठाण्यातील हवालदार ज्ञानदेव साबळे करत आहेत.

डॉक्टरकडून खंडणी मागणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील बाजारपेठेतील श्री. सेवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी येऊनही बाकी घेतलेल्या रोख रकमेचा जाब विचारत दमबाजी, शिवीगाळ करून सहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांवर ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे संशयित व्यक्ती एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.

काही महिन्यांपूर्वी स्वाती युवराज बंदरे या उपचारासाठी डॉ. विश्वनाथ पाटील यांच्या श्री. सेवा हॉस्पिटल येथे दाखल झाल्या. महत्वाच्या आरोग्य तपासण्या झाल्यानंतर मेंदूच्या उजव्या बाजूस शस्त्रक्रिया करण्याचे निदान केले. त्यासाठी सुमारे अडिच लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. रुग्णाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने डॉक्टरांनी मुख्यमंत्री सहायता निधीची माहिती देत कागदपत्रांची पूर्तता करून जो निधी येईल त्यावरील फरक नातेवाईक देण्यास राजी झाले. मेंदूची ठरलेली शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सहाय्यता निधीतून एक लाख रुपये हॉस्पिटलच्या बँक खात्यात जमा झाले. उर्वरित एक लाख ३२ हजार रुपये देणे असताना नातेवाईकांनी ६७ हजार ५०० रोख स्वरूपात जमा केले.

आर्थिक स्थिती बेताची असल्याने उर्वरित रक्कम संचालक डॉ. विश्वनाथ पाटील यांनी उत्तरदायित्व दाखवत आग्रह न धरता रुग्णास घरी सोडले. नातेवाईकांनी देखील डॉक्टरांचे आभार मानत सत्कारही केला. काही दिवसांनंतर रुग्णाचे जावई म्हणून योगेश नाना पाटील, जयेश वासुदेव ढिकले आणि एक अनोळखी अशा तिघांनी डॉक्टरांच्या केबिनमध्ये येत तुम्ही स्वाती बंदरे या रुग्णाकडून सहाय्यता निधी येऊनही रोख रक्कम का घेतली, असा जाब विचारला. त्यावर डॉ. विश्वनाथ पाटील यांनी नातेवाईकांना सांगितलेली सर्व हकीकत पुन्हा जावई म्हणून योगेश पाटील याला सांगितली. परंतु, योगेश नाना पाटील ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने तू हॉस्पिटल कसे चालवतो, बघून घेतो.

हे देखील वाचा: राशिभविष्य आजचं 23 जून: मेष, मिथुन यासह 5 राशीच्या लोकांची प्रगती होईल, जाणून घ्या इतरांनीही त्यांचे राशिभविष्य आजचं  

म्हणत दमबाजी करत शिवीगाळ केली. दुसऱ्या दिवशी डॉ. पाटील यांनी पुन्हा योगेशला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी विषय थांबवायचा असेल तर रुग्णाचे घेतलेले पैसे परत करा आणि आम्हाला सहा लाख रुपये द्या. अन्यथा, आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू, असे सांगत थेट खंडणीची मागणी केली. खंडणी रक्कम देण्यास डॉ. पाटील यांनी नकार देताच तिघांनी सोशल मीडियावर बदनामी केली. अखेर डॉ. विश्वनाथ पाटील यांच्यासह ओझरच्या डॉक्टरांनी अपर पोलिस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर ओझर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी योगेश नाना पाटील, जयेश वासुदेव ढिकले यांच्यासह अन्य एक अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल दिनकर वाघेरे तपास करीत आहे.

योगेश नाना पाटील आणि जयेश वासुदेव ढिकले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. योगेश नाना पाटील याने मागील काळात रोलेटविरोधात अशीच स्टंटबाजी सोशल मीडियावर केली होती. योगेश पाटील आणि जयेश ढिकले दोघेही मनसेचे निफाड तालुक्यातील पदाधिकारी असल्याची चर्चा आहे. तीही बाब फिर्यादी डॉ. विश्वनाथ पाटील यांनी निदर्शनास आणून दिली असता तक्रार केली तर वीस लाख लागतील, आम्हाला सहा लाख द्या आणि विषय संपवा म्हणत मागणी सुरू ठेवली. परंतु, मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पाटील आणि ढिकले यांच्यावर कारवाई करण्याचे सांगत पक्षाबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× WhatsApp ग्रुप जॉइन करा !