सख्ख्या भावाचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस
आयर्विन टाइम्स / नागपूर
भांडणादरम्यान सख्ख्या भावाचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृताच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच एकाने जरीपटका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ताफ्यासह जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यावर मोठ्या भावाने खुनाची कबुली दिल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भावास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय ऊर्फ बंटी श्रीराम गौर (वय ३४ रा. कुशीनगर) असे मृताचे नाव असून प्रभात श्रीराम गौर (वय ३६) असे संशयित आरोपीचे नाव असून मृताचा तो मोठा भाऊ आहे. बंटी हा मोबाइल शॉपीत काम करायचा. शनिवारी दुपारच्या सुमारास बंटीचा छोटा भाऊ सुशांत श्रीराम गौर (वय ३२) याच्याकडे प्रॉपर्टीच्या संदर्भात भेटण्यासाठी काही मित्र आले. त्यांनी प्रॉपर्टी बघायची असल्यास उद्या वाहन पाठवितो असे सांगून जाऊ लागले. इतक्यात बंटी तिथे आला. त्यावेळी सुशांत मित्राला बघून घेतो असे बोलला.
बंटीला तो आपल्याला उद्देशून म्हणत असल्याचे वाटल्याने त्याने सुशांतशी वाद घातला. यानंतर त्याने घरातील किचनमधून चाकू आणून त्याला मारण्यासाठी धावला. त्यामुळे तो पळू लागला. इतक्यात मोठा भाऊ आणि त्याची आई मीरा श्रीराम गौर (वय ६०) यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुशांतला मारण्याच्या नादात घरातील टीव्ही फोडला आणि कपाटाचे काचही फोडून टाकले. त्यामुळे त्याला थांबविताना खाली पाडून प्रभातने त्याचा गळा दाबला आणि आईने त्याचे पाय धरून ठेवले. यामुळे बंटी बेशुद्ध पडला.
त्याला उपचारासाठी सुरुवातीला नजीकच्या रुग्णालयात आणि त्यानंतर मेयो रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यामुळे त्याला घरी आणून त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. मात्र, इतक्यात परिसरातील एका नागरिकाने जरीपटका पोलिसांना त्याचा खून झाला असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जरीपटका पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.
पोलिसांनी पिंटूचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोमध्ये पाठवीत, याप्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. यादरम्यान प्रभात गौर याने पोलिसांना त्याचा खून केल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्याविरोधात ३०२, ३४ कलमांसह गुन्हा दाखल करीत प्रभातला अटक केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, बंटी हा तापट स्वभावाचा होता. त्यामुळे त्याच्या स्वभावामुळे घरचे त्रस्त होते. तो नेहमीच घरच्यांशी कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद घालायचा. विशेष म्हणजे, प्रभात याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या लग्नात टीव्ही आणि आलमारी सासरच्या मंडळीकडून आली होती. रागाच्या भारात बंटीने ती फोडली. त्यामुळे प्रभातला राग अनावर झाला. त्याने त्याला खाली पाडून त्याचा गळा दाबून खून केला.
गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार: २४ वर्षीय गुंडास अटक
नागपूर: प्रेमाच्या जाळ्यात ओढून १७ वर्षीय मैत्रिणीला सुपारीतून गुंगीचे औषध देत, तिच्या अत्याचार केल्याप्रकरणी २४ वर्षीय युवकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली. ही घटना जरीपटका पोलिस हद्दीत उघडकीस आली. श्लोक विशाल शेंडे (वय २४, रा. जरीपटका, नागपूर ) असे आरोपीचे नाव आहे. तो कुख्यात गुंड असून खुनातील आरोपी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवती घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये फिरायला जात असताना श्लोक तिथे यायचा. तिथे त्याची आणि मुलीची ओळख झाली. मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यामुळे लपून छपून भेटत होते. यादरम्यान त्याने तिला सुपारीतून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मित्राच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान ही बाब तिच्या लक्षात येताच, तिने त्याच्याशी बोलणे सोडले.
मात्र, त्यानंतर तो तिच्या मागे लागला. एक दिवस तिला जबरदस्तीने गिट्टीखदान परिसरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तिला शिवीगाळ करीत, ही बाब कुणालाही सांगितल्यास चाकूने ठार मारण्याचीही धमकी दिली. मात्र मुलीने आईला सांगितले. आईने शनिवारी (ता. २९) जरीपटका पोलिस ठाणे गाठून आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, त्याला अटक केली असून तपास सुरू केला आहे.
सिद्धार्थनगरात साडेपाच लाखांची घरफोडी
नागपूर : अज्ञात आरोपीने घरफोडी करीत साडेपाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना टेका येथील सिद्धार्थनगरात गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. परिसरात राहणारे शेख अनीस शेख राशीद (वय ४२) हे २१ जून रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. ही संधी साधून चोरट्याने बेडरूममधील लोखंडी कपाटातून ५ लाख ५१ हजार ५०० रुपयांचे दागिने चोरून नेले.
हे देखील वाचा: congratulations! महाराष्ट्र राज्याच्या 1 ल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक; देशाच्या लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती
गुरुवारी सायंकाळी शेख कुटुंबीय घरी परतले असता घटना उघडकीस आली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करीत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.