खून करून पसार झालेला आरोपी मोटेवाडी -पांडोझरी भागात असल्याची माहिती
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील खंडनाळ (ता. जत) येथे नातेवाइकांना भेटण्यास गेलेल्या महिलेचा घरापासून जवळच असलेल्या विहिरीत मृतदेह आढळून आला होता. इंदुमती पांडुरंग बिराजदार (वय ४० रा. खंडनाळ) असे त्यांचे नाव असून त्यांचा आर्थिक व्यवहारातून खून केला असल्याची कबुली संशयित आरोपी तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१ वर्षे व्यवसाय – ऊसतोड रा. खंडनाळ ता. जत जि. सांगली) याने दिली आहे. उमदी पोलिसांनी त्याला शिताफीने अटक करण्यात यश मिळवले आहे.
इंदुमती पांडुरंग बिराजदार यांचा मृतदेह बुधवारी (ता. १०) दुपारी साडेतीनच्या सुमारास एका विहिरीत आढळून आला होता. प्रतिक्षा पांडुरंग बिराजदार (वय – १७ व्यवसाय – शिक्षण १२ वी रा. मु. खंडनाळ पोस्ट दरीबडची ता. जत जि. सांगली) हिने फिर्याद दिली होती. घातपात असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता.
गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना माहिती मिळाल्यावरून तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१ वर्षे व्यवसाय – ऊसतोड रा. खंडनाळ ता. जत जि. सांगली) याच्या मागावर पोलीस होते. गुन्हयाची थोडक्यात हकीकत अशी कि, दिनांक ९ जुलै रोजी रात्री ८.१५ वा. ते दिनांक १० जुलै च्या ०५.४६ वा. चे दरम्यान तुकाराम यशवंत कुलाळ यांचे विहीरीत यातील मयत नामे इंदु पांडुरंग बिराजदार (वय ४० वर्षे रा. खंडनाळ ता. जत जि. सांगली) हिने आरोपी तम्मा श्रीमंत कुलाळ याचे कडुन उसने घेतलेले पैसे चार लाख रुपये घेतले होते.
ते परत दिले नाहीत म्हणुन आरोपी तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१ वर्षे रा. खंडनाळ ता. जत) याने मयत इंदु पांडुरंग बिराजदार हिस डोक्यात मारुन ती बेशुध्द झाल्यावर विहीरीच्या पाण्यात टाकुन तिचा खून केला आहे.
गुन्हयाबाबत माहिती प्राप्त होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप कांबळे यांनी तपास पथक नेमून योग्य त्या सुचना देवुन आरोपीबाबत माहिती देवुन त्याचे शोध कामी रवाना केले. यातील आरोपी हा गुन्हा केलेपासुन फरार झाला होता. तो महाराष्ट्र- कर्नाटक सिमाभागात राहुन त्याचे अस्तित्व लपवत होता. परंतु तपास पथकाने शिताफीने व कसोशीने प्रयत्न चालु ठेवले होते. यातील आरोपी हा मोटेवाडी -पांडोझरी भागात असलेबाबत पोलीस अंमलदार श्री. माने यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली.
त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास केला असता आरोपीने सदरचा गुन्हा कबुल केला असुन आरोपीने यातील मयतास एकुण चार लाख रूपये उसने दिले होते. ते पैसे परत करत नसलेने आरोपी याने मयत इंदु पांडुरंग बिराजदार हिस डोक्यात मारुन विहीरीच्या पाण्यात टाकुन तिचा खून केला असलेचे आरोपीने कबुल केले आहे. गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने आरोपीस अटक करणेत आलेली आहे. आरोपीस न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने आरोपीस ०७ दिवस पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे.