केरळ सोने फसवणुकीतील आरोपीला भिवघाट येथे अटक
आयर्विन टाइम्स / सांगली
केरळ राज्यातील थ्रिसुर ईस्ट येथे सोन्याच्या हॉलमार्किंगच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीतील मुख्य आरोपी, विश्वास रामचंद्र कदम (वय ३४), याला सांगली जिल्ह्यातील भिवघाट (ता. खानापूर जि. सांगली) येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सदर प्रकरणात फिर्यादी सदानंदन पोनापन्न यांनी विश्वास कदम आणि त्याच्या साथीदारांवर १ कोटी ८० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
घटनाक्रम जाणून घ्या
तक्रारीनुसार, आरोपी विश्वास कदम याचे केरळ राज्यात “लक्ष्मी” नावाचे हॉलमार्किंग दुकान आहे. फिर्यादी पोनापन्न यांनी आपल्या २२५५.४० ग्रॅम वजनाची सोन्याची दागिने हॉलमार्किंगसाठी कदमकडे सुपूर्द केली. मात्र, आरोपीने दागिने परत न करता ते स्वतःच्या ताब्यात ठेवले आणि परागंदा झाला.
फसवणुकीची तक्रार १० जून २०२४ रोजी दाखल करण्यात आली होती, त्यानंतर केरळ पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीच्या शोधासाठी केरळ पोलिसांचे पथक सांगलीत आले होते. त्यांच्या मागदर्शनाखाली सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विश्वास कदमचा माग काढण्यास सुरुवात केली.
अटक आणि गुन्ह्याची कबुली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि त्यांचे पथक भिवघाट येथे पोहोचले. आरोपी विश्वास कदमला तिथून ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान, विश्वास कदमने गुन्ह्याची कबुली दिली आणि फसवणुकीच्या दागिन्यांची विक्री केरळमधील त्रिशुर येथेच केल्याचे मान्य केले. सदर आरोपीला पुढील तपासासाठी केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. थ्रिसुर ईस्ट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००२/२०२४ नुसार भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि ४०६ (विश्वासघात) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे
या यशस्वी कारवाईसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल ऐनापुरे, पोलीस हवालदार सुर्यकांत साळुंखे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा यशस्वी तपास केला.
आता केरळ पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, फसवणुकीतील इतर आरोपी आणि दागिन्यांची विक्री कुठे करण्यात आली याचा तपास केला जात आहे.