कवठेमहांकाळ (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
कवठेमहांकाळ शहरात रविवारी रात्री घडलेल्या थरारक प्रकाराने सर्वत्र खळबळ उडवली आहे. स्वत:ला आयकर अधिकारी म्हणून सादर करणाऱ्या चार तोतया व्यक्तींनी येथील नामांकित वैद्यकीय व्यावसायिक डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांची तब्बल १ कोटी २० हजार रुपयांची फसवणूक केली. बनावट छापानाट्य करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मुद्देमाल म्हणून घेऊन ते पसार झाले.
घटना कशी घडली?
डॉ. म्हेत्रे यांचे झरेवाडी रस्त्यावरील गुरुकृपा हॉस्पिटल वरील मजल्यावर त्यांचे कुटुंब राहते. रविवारी रात्री १०:४८ वाजता तीन पुरुष आणि एक महिला असे चौघे रुग्णालयात दाखल झाले. “आमचा माणूस आजारी आहे, डॉक्टरांना भेटायचे आहे” असे सांगून त्यांनी कर्मचाऱ्याला दिशाभूल केली. त्यानंतर कर्मचाऱ्याच्या मागोमाग हे चौघे वरच्या मजल्यावर गेले.
दरवाजा उघडताच त्यांनी “आम्ही मुंबई आयकर कार्यालयाचे अधिकारी आहोत” अशी बतावणी करत घरात प्रवेश केला. बनावट ओळखपत्रे व कागदपत्रे दाखवून मोबाईल जप्त केले आणि “सर्च वॉरंट” दाखवत झडती सुरू केली. घरातील सोन्याचे दागिने व रोकड मुद्देमाल म्हणून घेण्याची मागणी केली.
संशय न आल्याने डॉ. म्हेत्रे यांनी स्वखुशीने दागिने आणि रोख रक्कम त्यांच्या हवाली केली. यात ८४ लाख ६० हजार रुपये किमतीचे १ किलो ४१० ग्रॅम सोन्याचे दागिने व १५ लाख ६० हजार रुपये रोकड यांचा समावेश होता. रात्री ११:४८ च्या सुमारास चौघे आलिशान राखाडी गाडीतून पसार झाले.
फसवणुकीचा उलगडा कसा झाला?
या वेळी डॉ. म्हेत्रे यांचे पुत्र डॉ. बसवेश्वर म्हेत्रे रुग्णालयात रुग्ण तपासत होते. घरी परतल्यावर त्यांना घटनेची माहिती मिळाली. तत्काळ वकील व सीए यांच्याशी संपर्क साधल्यावर, रात्री छापे टाकले जात नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यामुळे म्हेत्रे कुटुंबाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांचा तपास
कवठेमहांकाळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी)ही तपासात सहभागी झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे तपास सुरू आहे. संशयित तिघे पुरुष व एक महिला साधारण २५-२८ वर्षे वयोगटातील असून, सर्वजण राखाडी रंगाच्या आलिशान गाडीतून आले होते.
* पुरुषांचा पेहराव व वैशिष्ट्ये : उंची ५.७ फूट, सावळा रंग, गोल चेहरा, बारीक मिशी, काळी पँट, पांढरा शर्ट.
* महिलेचा पेहराव व वैशिष्ट्ये : उंची ५.३ फूट, निमगोरा रंग, गोल चेहरा, पसरट नाक, केस बांधलेले, फिकट निळी सलवार व पांढरी लेंगीज.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी पाच पथके रवाना केली आहेत. सोमवारी दिवसभर वरिष्ठ अधिकारी कवठेमहांकाळमध्ये ठाण मांडून होते.
* उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले,
* अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर,
* जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे

हे अधिकारी ठाण्यातून तपासाची सूत्रे हलवत होते. तसेच एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे व स्थानिक पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी करून डॉ. म्हेत्रे कुटुंबाची माहिती घेतली.
संशयितांचा शेवटचा संवाद
घरातून बाहेर पडताना संशयितांनी डॉक्टरांना “उद्या तुम्ही सांगली न्यायालयात या” अशी सूचना केली. डॉक्टरांनी न्यायालय कुठे आहे? असा प्रश्न विचारल्यावर, त्यांनी उपरोधिकपणे “आम्ही मुंबईहून आलो असूनही सांगली न्यायालय माहिती आहे, आणि तुम्हाला इथले असूनही माहीत नाही?” असा सवाल केला. यानंतर ते मुद्देमाल घेऊन निघून गेले.
शहरात खळबळ, पोलिसांचा विश्वास
या घटनेमुळे कवठेमहांकाळ शहरात भीती व संतापाचे वातावरण आहे. नामांकित डॉक्टरांच्या घरात असा प्रकार घडल्याने सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मात्र पोलिसांनी तपास जलद गतीने सुरू असून, आरोपींचा लवकरच पर्दाफाश केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.