एम्स्टर्डमची अनोखी सायकल संस्कृती

नेदरलँडची राजधानी एम्स्टर्डम ही फक्त आपल्या नयनरम्य कालव्यांमुळे किंवा ऐतिहासिक वास्तूंमुळेच नाही, तर तिच्या ‘अनोख्या सायकल संस्कृती’मुळे देखील जगभर प्रसिद्ध आहे. या शहरात आज जेवढी लोकसंख्या आहे, त्याहून अधिक सायकली आहेत—हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. या शहरातील तब्बल साठ टक्क्यांहून अधिक नागरिक दररोजच्या दैनंदिन प्रवासासाठी सायकलचा वापर करतात. एम्स्टर्डममध्ये सायकल ही केवळ एक पर्याय नसून, एक जीवनशैली बनली आहे.

सायकल म्हणजे प्रतिष्ठा!

इतर अनेक देशांमध्ये सायकलला गरिबीचं किंवा मागासलेपणाचं प्रतिक समजलं जातं. मात्र एम्स्टर्डममध्ये उलट चित्र दिसतं — येथे सायकल ही ‘स्टेटस सिंबल’ म्हणून गौरवली जाते. शहरातील रस्ते, फूटपाथ्स, गल्लीबोळ अगदीच सायकलस्वारांच्या सोयीसाठी आखले गेले आहेत. हे शहर म्हणजे एक चालत्या-बोलत्या सायकल संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे.

एम्स्टर्डमची अनोखी सायकल संस्कृती

इतिहासातील वळणं आणि एक जागृत परिवर्तन

१८९० च्या दशकात जेव्हा सायकल पहिल्यांदा एम्स्टर्डमच्या रस्त्यांवर दिसू लागली, तेव्हा ती केवळ करमणुकीसाठी वापरली जायची. पण त्यानंतरच्या दशकांत जगात जे काही घडलं, त्याचा सायकल संस्कृतीवर मोठा प्रभाव पडला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंधन टंचाईमुळे लोक सायकलकडे वळले, पण युद्ध संपताच मोटारींचा जोर वाढू लागला. १९५० ते ६० च्या दशकात चारचाकी वाहनांनी शहर व्यापलं, आणि सायकलस्वारांना धोक्याची घंटा वाटू लागली.

मात्र १९७३ मध्ये आलेल्या तेल संकटाने या सगळ्या चित्रात अमूलाग्र बदल घडवून आणला. अरब देशांनी नेदरलँडसह अनेक पाश्चिमात्य राष्ट्रांवर तेल निर्यातीवर बंदी घातली. यामुळे इंधनाचे दर चारपट झाले. यावेळी डच पंतप्रधान जूप डेन उइल यांनी नागरिकांना आवाहन केलं—”जीवनशैली बदला, ऊर्जा वाचवा.” आणि नेदरलँडच्या जनतेनं हे आवाहन हृदयाशी घेतलं. लोक सायकल वापरण्याकडे वळले आणि कालांतराने हीच ‘सायकल संस्कृती’ म्हणून रूढ झाली.

हेदेखील वाचा: अतिवृष्टी, पुर व हवामान बिघाड : निसर्गाच्या रौद्रतेपुढे हतबल माणूस

आजचं एम्स्टर्डम – सायकलींचं शहर

आज एम्स्टर्डममध्ये सायकलींची संख्या तब्बल ८.५ लाखांवर आहे, तर लोकसंख्या अंदाजे ८ लाख. म्हणजे दर माणसामागे एक सायकल! एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकलींचा वापर केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी फारशी होत नाही, वायुप्रदूषण कमी झालं आहे, आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व देखील घटलं आहे.

या सायकल संस्कृतीमुळे एम्स्टर्डमला २०५० पर्यंत “नेट झिरो कार्बन उत्सर्जन” साध्य करण्याच्या दिशेने पुढे जाणं सहज शक्य झालं आहे. त्याचबरोबर नागरिकांचं आरोग्य सुधारलं आहे आणि प्रवासावरील खर्चही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.

एम्स्टर्डमची अनोखी सायकल संस्कृती

भारतासाठी धडा

आजच्या भारतात, विशेषतः शहरी भागात, सायकल वापरणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. आपण जीवाश्म इंधनावर अवलंबून आहोत आणि त्यामुळे आपला मोठा हिस्सा परकीय चलनात खर्च होतो. सायकल किंवा ई-बाईकसारख्या पर्यावरणस्नेही आणि किफायतशीर पर्यायांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. काही वर्षांपूर्वी पुणे शहरात सायकल शेअरिंगसाठी प्रयत्न झाले, पण ते फार काळ टिकले नाहीत.

आपल्याला चीनच्या काही शहरांकडून आणि एम्स्टर्डमकडून शिकण्याची गरज आहे. चीनमध्ये ‘पब्लिक सायकल शेअरिंग’ सुविधा कार्यरत आहेत. विशेष सायकल स्टँड उभारले आहेत जिथून कुणीही ऑनलाईन पेमेंट करून सायकल घेऊ शकतो आणि काम झाल्यावर कुठल्याही स्टँडवर सोडू शकतो.

भारतासारख्या विकसनशील देशात अशी शहरे निर्माण करण्याची ही योग्य वेळ आहे. सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक यांची एकत्रित इच्छाशक्ती असेल, तर ‘सायकल संस्कृती’ रुजवणं अशक्य नाही. यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि दीर्घकालीन दृष्टिकोन हवा आहे.

एम्स्टर्डमची अनोखी सायकल संस्कृती

सायकल ही केवळ एक वाहन नाही, ती एक सशक्त सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक क्रांती घडवू शकते—हे एम्स्टर्डमने जगाला दाखवून दिलं आहे. सायकल वापरणं म्हणजे केवळ पैशांची बचत नाही, तर पर्यावरणाशी एक नातं जपण्याचा प्रयत्न आहे.

आज जिथे ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, ट्राफिक कोंडी यासारख्या समस्यांनी जग होरपळत आहे, तिथे ‘एम्स्टर्डम मॉडेल’ हे एक आदर्श ठरू शकते. आपल्या देशातील प्रत्येक शहरात ही संस्कृती रुजावी, अशी अपेक्षा ठेवूया. आणि आपल्याही जीवनात सायकलचा एक टप्पा असावा, हीच खरी काळाची गरज आहे.
-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि.सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *