आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह

🔹 महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १ कोटी ५० लाखांहून अधिक नागरिकांची मधुमेह तपासणी पूर्ण झाली आहे. १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह” या घोषवाक्याखाली राज्यभर आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत.

मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
राज्यातील नागरिकांच्या आरोग्य जपण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या तपासणी मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दि. १ जानेवारी ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत तब्बल १ कोटी ५० लाख ७९ हजार ८५२ नागरिकांची मधुमेह तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २८ लाख ५५ हजार ७०९ नागरिकांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह

राज्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी आणि उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर दि. १४ नोव्हेंबर रोजी राज्यभर जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात येणार असून, विविध जनजागृती कार्यक्रमांतून नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला जाणार आहे.

या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेले घोषवाक्य आहे — “आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मधुमेह”. या निमित्ताने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

मधुमेह हा आजार केवळ वयस्करांपुरता मर्यादित नसून तो बाल्यावस्था, प्रजननकाळ, कार्यक्षम प्रौढ वय आणि वृद्धत्व या सर्व टप्प्यांवर परिणाम करू शकतो. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रतिबंध, तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत, असे आरोग्य तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

हेदेखील वाचा: Suicide News: तरुण वकिलाचा राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा धक्कादायक प्रकार; सुसाईड नोटमध्ये आईला कडक शिक्षा व्हावी, असे नमूद

आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, ताणतणाव नियंत्रण आणि वेळेवर तपासणी हे मधुमेह नियंत्रणाचे प्रमुख स्तंभ असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.

जागतिक मधुमेह दिनानिमित्त राज्यभर विविध आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा, व्याख्याने आणि आरोग्य परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. या उपक्रमांमधून नागरिकांना मधुमेहाविषयी अधिक माहिती मिळावी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक ते उपाय समजावून सांगितले जाणार आहेत.

मधुमेह ही आयुष्यभराची जबाबदारी असल्याने, नागरिकांनी एकत्रितपणे या आजाराला प्रतिबंध करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.
राज्यभर आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारून “मधुमेहमुक्त महाराष्ट्र” घडविण्याचा संकल्प नागरिकांनी घ्यावा, असा संदेश यानिमित्त देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *