सांगलीतील 2021 अत्याचारप्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या चंद्रकांत लोंढे या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षे सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली. 12 साक्षीदार, पक्के पुरावे आणि पोलिस तपासाच्या आधारे निर्णय.
सांगली (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
अल्पवयीन विद्यार्थिनीला मध्यरात्री उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास सांगली न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली आहे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. ४ जे. ए. मोहंती यांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
आरोपीचे नाव चंद्रकांत मधुकर लोंढे (वय २६, रा. सोनी, ता. मिरज) असे आहे. सरकारी पक्षाची बाजू अधिकारी आरती देशपांडे-साटवलीकर यांनी प्रभावीपणे मांडली.

घटना कशी घडली?
ही घटना 2021 मध्ये घडली. आरोपी चंद्रकांत लोंढे आणि पीडित विद्यार्थिनी यांचा परिचय होता. आरोपीने रात्री उशिरा मोबाईलवरून विद्यार्थिनीला बाहेर बोलावले. घराबाहेर आलेल्या पीडितेला तो कुमठे फाटा परिसरातील उसाच्या शेतात घेऊन गेला व तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला.
सकाळी विद्यार्थिनी घरात नसल्याचे लक्षात आल्यावर तिच्या आईने मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी आरोपीच्या काकाने पीडितेला घरी आणून सोडले. त्यानंतर तिच्या भावाने तिला घेऊन पोलिस ठाण्यात दाखल होऊन संपूर्ण हकीकत सांगितली.
पोलिसांचा तपास आणि पुरावे
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी आणि पीडितेचे कपडे जप्त केले. तपासात विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने सक्तीने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला असल्याचेही पुराव्यांवरून सिद्ध झाले.
या प्रकरणात सरकारी पक्षाकडून १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडिता आणि तिच्या आईची साक्ष निर्णायक ठरली. तपासी अधिकाऱ्यांच्या संयमी व शिस्तबद्ध तपासामुळे प्रकरण अधिक बळकट झाले.
न्यायालयाचा निर्णय
सर्व पुरावे, साक्षी आणि कायदेशीर बाबींचा विचार करून न्यायाधीशांनी आरोपीला दोषी धरले. त्यास दहा वर्षे सक्तमजुरी, १०,००० रुपयांचा दंड व पीडितेस योग्य नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले.
या तपासात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे शामकुमार साळुंखे, रेखा खोत, सुनीता आवळे, वंदना मिसाळ आदी अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
