जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
लग्नाचे आमिष दाखवून जत तालुक्यातील एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. २२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ही घटना घडली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. चार जणांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयित आरोपी सोन्या ऊर्फ सुनील लक्ष्मण निंबाळकर याने बलात्कार केल्याप्रकरणी व त्याला सहाकार्य करणाऱ्या बहीण अनिता संतोष निंबाळकर, संतोष वामन निंबाळकर, सुरेश आण्णाप्पा चव्हाण (सर्व रा. सोनंद ता. सांगोला, जि. सोलापूर) या चार जणांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पीडित मुलगीचे नातेवाईक हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. कर्नाटकातील व्हनवाड ता. तिकोटा येथील एका शेतकऱ्याकडे पीडित मुलगीसह त्यांचे नातेवाईक ऊसतोडणी मजूर म्हणून काम करत असताना शेजारी राहत असलेल्या संशयित आरोपी सुनील निंबाळकर याची बहीण अनिता हिने माझ्या मावस भावाबरोबर लग्न कर म्हणून सांगितले.
शिवाय, त्याच्यासोबत दुचाकीवर बसवून पाठवून दिले. यानंतर सुनील याने त्याच्या मित्राच्या खोलीवर तिच्यावर अत्याचार केले. यानंतर त्या पीडित मुलीला बसमध्ये बसवून जतला पाठवून दिले. तिच्या कुटुंबातील लोकांनी लगेचच जत पोलिस ठाणे गाठत संबंधित चार जणांविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.