मुंबई,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
राज्यातील गरजू रुग्णांना वेळेत, दर्जेदार व कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत दक्ष राहावे, अशा स्पष्ट शब्दांत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संकेत दिले आहेत. कोणत्याही गैरप्रकारास सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वरळी येथील राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी डॉ. ओमप्रकाश शेटे, अण्णासाहेब चव्हाण, डॉ. दयानंद जगताप, अशोक आत्राम यांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.
🏥 अंगीकृत रुग्णालयांची संख्या ४१८० वर!
राज्यातील रुग्णांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून तब्बल ४१८० वर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
🚑 अपघातग्रस्त रुग्णांना तातडीने उपचार
योजनेत १ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार अपघातग्रस्तांसाठी मिळावेत यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
📱 स्वतंत्र मोबाईल अॅप आणि माहितीप्रसार
रुग्णालयांची माहिती, बेड उपलब्धता व तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दर महिन्याला आरोग्य शिबिर घेऊन किमान ५ रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, अशा सूचना मंत्री आबिटकर यांनी दिल्या आहेत.
🔄 गरजूंना कार्ड मिळण्यासाठी गती
आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेला गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार, CSC सेंटर यांच्या माध्यमातून कार्ड वाटप करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
💰 १३०० कोटींचा निधी रुग्णालयांना वितरित
मार्चपासून रुग्णालयांना सुमारे १३०० कोटी रुपये वितरित करण्यात आले असून, भविष्यातही आवश्यक निधी वेळेवर दिला जाईल. योजना पूर्णतः पारदर्शक आणि प्रभावी रितीने अंमलात आणावी, असे मंत्री आबिटकर यांनी ठणकावून सांगितले.