📍पुणे, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सायबर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करत, भक्तांच्या मोबाइलमधून खासगी क्षण चित्रीत करणाऱ्या एका भोंदूबाबाचा पर्दाफाश झाला असून बावधन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (२९, रा. सुसगाव, मुळशी) असे अटकेत असलेल्या बाबाचे नाव आहे.
‘मृत्यू अटळ’ म्हणून भीती दाखवत फसवणूक
‘दिव्य शक्तीची आत्मभूती मिळाली आहे’, असा दावा करणारा हा भोंदूबाबा भक्तांना “तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यांत अटळ आहे,” अशी भीती दाखवत असे. त्यावर उपाय म्हणून मंत्र जप व साधना करायला सांगत एकांतात बसवत असे. त्या दरम्यान तो भक्तांचा मोबाइल हातात घेऊन पासवर्ड मागून ‘एअर ड्रॉइड कीड’ हे छुपे अॅप डाऊनलोड करत असे.
मोबाइलवरून थेट नजर
हे अॅप एकदा डाऊनलोड झाले की, बाबा संबंधित भक्ताचा कॅमेरा, आवाज व लोकेशन या सर्वांवर नियंत्रण मिळवत असे. तो फोन करून, “सध्या कुठे आहेस?”, “काय कपडे घातले आहेत?”, “दिवसभरात काय केलं?” अशा प्रश्नांतून आपला ‘अलौकिक’ ज्ञान असल्याचा भास निर्माण करत असे. काही भक्तांना तर शरीरसंबंधाच्या वेळी मोबाइल विशिष्ट कोनातून ठेवण्यास सांगून त्याचे चित्रीकरण करत होता.
फसवणुकीचा उलगडा
या प्रकरणाचा उलगडा एका ३९ वर्षीय भक्ताच्या सायबर क्षेत्रातील मित्रामुळे झाला. सतत गरम होणाऱ्या मोबाइलची तपासणी केल्यावर त्यात छुपा अॅप आढळला. मोबाईल बाहेरून नियंत्रित केला जात असल्याचे स्पष्ट झाले. तपासानंतर कळाले की, बाबाच त्यामागे होता.
पोलिसात गर्दी; गुन्हा दाखल
एकत्र आलेल्या भक्तांनी बाबाला जाब विचारताच त्याने तक्रार न करण्याची विनंती केली. मात्र, एका तरुणाने 112 वर कॉल करून पोलीसांची मदत घेतली. बावधन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले की, सायबर तज्ज्ञांच्या तपासात भक्तांच्या आरोपांमध्ये तथ्य आढळल्याने संबंधित भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘अंधश्रद्धा + तंत्रज्ञान = फसवणूक’
या घटनेतून दिसून येते की अंधश्रद्धेच्या आडून काही भोंदूबाबा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भक्तांची फसवणूक करत आहेत. ‘डिजिटल भोंदूबाबांच्या’ या नव्या जाळ्यापासून सावध राहण्याची गरज आहे.
📰 आपली सुरक्षा, आपले हक्क — सावध रहा, सजग राहा!
(संपूर्ण बातम्यांसाठी [www.irwintimes.com](http://www.irwintimes.com) ला भेट द्या)